Trek to Khanderi and Underi fort - सफर खान्देरी आणि उंदेरीची

अगोदर ते घाणेरडे मातीचे कपडे वेगळे ठेव! आदिवासी कुठचा!...घरी आल्या आल्या मिळणारा धमकीवजा आदेश नेहमीच कानावर पडतो. पण सध्या, आमच्या अंगा-खांद्यावरून घरात येणाऱ्या मातीची जागा समुद्राच्या वाळूने घेतलीय आणि आज ती 'उंदेरी-खान्देरी' या जोडगळीची होती.

या किल्ल्याना भेट द्यायची म्हणजे स्पेशल बोट करावी लागते आणि नावाड्याला आपला दिवस मोडून यावं लागत असल्याने पैसेही तसेच लागतात. यात काही वावग नाही; साधासुधा व्यवहार. या आमच्या सफरीतला हा पोर्शन पार पडायला मदत केली ती सचिनच्या (आणि आता माझ्याही) एका मित्राने...अमित शिंदे, दुर्गवीर....या सह्याद्रीत रमणाऱ्या अनेक दुर्गविरांसारखाच पण आपल्या संस्थेचं नाव लावणारा...'दुर्गवीर प्रतिष्ठान'.

हा रविवार, सचिन आणि माझ्यासाठीही तसा मोकळाच होता म्हणून 'पद्मदुर्ग' साठी प्लॅन करत होतो पण तो शनिवारी फसला. दिवस सार्थकी लावावा म्हणून रात्री ९.३०ला फन अँड फिट जिमच्या ट्रेडमिलवर 'खान्देरी-उंदेरी' चा 'प्लॅन बी' आखला. अमितची हि मोहीम ठरलेली होती. आम्ही त्याला जॉईन करण्यासाठी विचारल आणि ठरल. आमच्या सवडीप्रमाणे म्हणा किंवा त्याची गाडी फुल होती म्हणून म्हणा, आम्ही बाईक घेऊन, रात्री ठरल्याप्रमाणे १२च्या सुमारास पनवेल डेपो बाहेर अमित ला भेटलो. त्यांची गाडी आली आणि आम्ही निघालो अलिबागच्या दिशेने १.३०च्या सुमारास. पनवेल संपल्यावर कर्नाळाच्या खूप अगोदर बेकार ट्रॅफिक जाम लागला, जवळजवळ ३-१ किमीचा असेल. बहुतेक माझ्या लहानपणापासून सुरु झालेल रस्त्याच काम आणि आजूनहि प्रत्येक किलोमीटरच्या आतमधे दिसणारे 'Use Diversion' चे बोर्ड हे या ट्रॅफिकच कारण होत. कोकणवासीयांची 'दशा', राजकारण्यांचा 'दशावतार' आणि हा चौपद्रीकरणाच्या 'नमनाचा' कार्यक्रम आजून किती वर्षे चालेल याचा काही ठाव नाही. इतकी वर्षे या खेळाची 'गण-गवळण' च सुरु असल्याच वाटत, 'वगनाट्य' च्या सुखद शेवटची पहाट कधी उगवेल माहित नाही. असो, आमची बाईक रिकाम्या जागेत भरून आम्ही वडखळ नाक्यावर चहा घेत आणि अमितच्या गाडीची वाट बघत थांबलो. गाडी आली आणि आम्ही तिला फॉलो करायला सुरुवात केली. अलिबागच्या १०-१ किलोमीटर अगोदर 'थळ' गावासाठी उजवीकडे आम्ही वळलो. २-३ किमीच्या एस्सेल वल्ड राईड नंतर आम्ही एका सुंदर कोळीवाड्यात थांबलो तेव्हा ४ वाजले होते. दुर्गविरच्या एका सदस्याच घर होत इथे. अंगणात चटई टाकून निवांत पडलो आम्ही २ तास. सकाळी ६ ला जाग आली ती पक्ष्यांच्या श्रवणीय किलबिलाटाने, डोळे बंद करून असाच पडून राहिलो थोडा वेळ ती भूपाळी ऐकत. सकाळी ७.३०ला पोटभर पोहे खाऊन आम्ही निघालो समुद्राच्या दिशेने.

समुद्राच्या किनाऱ्याला एका मासळी बाजारात आम्ही पोहचलो तेव्हा कळले की आम्ही आता 'थळ किंवा खुबलढा' किल्ल्यावर उभे आहोत. किल्ल्याचा पूर्ण परिसर सध्या मासे सुकविण्यासाठी वापरला जातोय. किल्ल्याचे रक्षण करणे कठीण जाऊ लागल्यावर मराठयानींच हा किल्ला मोडून काढला होता. खान्देरी-उंदेरीच्या उभारणीत या किल्ल्याचा फार मोलाचा वाटा होता. या किल्ल्यांच्या बांधकामदरम्यान आणि नंतरही मजुर आणि सैनिकांना रसद आणि संरक्षण करण्याची जबादारी थळच्या किल्लाने नेटाने पार पाडली होती. या जमिनीवर पसरलेल्या 'जवळा' आणि बांबूच्या साह्याने वाळत घातलेली 'वाफटी' (सुकवलेल्या मच्छीचे प्रकार) यातून वाट काढत आम्ही एका धक्क्यावर पोहोचलो. इथे एक लहान होडी आणि नावाडी आमची वाट बघत उभे होते, आम्हाला उंदेरीला घेऊन जायला.



आमची होडी उंदेरीच्या दिशेने निघाली. उंदेरीला होडी नांगरण्यासाठी धक्का नसल्यामुळे आम्हाला पाण्यातच उतराव लागलं. या किल्ल्याला भेट द्यायची असेल तर ओहोटीची वेळ साधूनच जाव लागत. आम्ही पाण्यात उतरून भग्न प्रवेशद्वारातून आत शिरलो. इथे आमचे इन्ट्रोडक्शन सेशन झाले, १७-१८ जण होतो आम्ही. आज पहिल्यांदाच आम्ही 'participant' म्हणून स्वतःला इन्ट्रोडुस करत होतो, हाही एक वेगळाच अनुभव होता आमच्यासाठी. तोंडओळख झाल्यावर आम्ही डावीकडून किल्ला पाहायला सुरवात केली. किल्ल्यावर पाण्याची व्यवस्था नसल्याने, पावसाचे पाणी साठवण्यासाठी ३ हौद बांधले आहेत, पैकी एक हौद खूप मोठा असून दोन बाजूला पायऱ्या आहेत. ह्या हौदाच्या पुढे राजवाड्याचे अवशेष तटबंदीला लागूनच आहेत. समोर एक तुळशी वृंदावन देखील आहे आणि त्याच्या जवळच बुरुजावर ३ तोफा निवांत पडलेल्या आहेत. किल्ल्याच्या चार बाजूला ४ भक्कम बुरुज आहेत आणि लहान बुरुज मिळून एकूण १२ बुरुज आहेत. या बुरुजांवर मिळून १३-१ तोफा आहेत. किल्ल्याची बरीचशी तटबंदी पडलेल्या अवस्थेत आहे. किल्ला पाहण्याची आवड असणाऱ्यांसाठी हा एक सुंदर अनुभव देऊन जातो.
राजांनी बांधलेल्या खान्देरी किल्ल्यावर मारा करण्यासाठी आणि मराठी आरमारावर वचक ठेवण्यासाठी १६८० ला या बेटावर सिद्दीने हा किल्ला बांधायला सुरवात केली. मराठ्यांनी अनेक हल्ले केले या किल्ल्यावर, स्वतः संभाजी राज्यांच्या काळात २ मोहीम आखल्या गेल्या पण त्या सफल झाल्या नाहीत. जानेवारी १७६० मध्ये नारो त्रिंबकनी हा किल्ला जिंकून त्याला 'जयदुर्ग' नाव दिले. नंतरच्या काळात हा किल्ला 'आंग्रांकडून इंग्रजांच्या ताब्यात गेला. एक तासात किल्ला पाहून आम्ही पुन्हा त्या होडीत स्वार झालो आणि निघालो खान्देरी च्या दिशेने.



खान्देरी किल्लीवरचा लाईट हाऊस लांबूनच स्पष्ट दिसत होत. इथे धक्क्याला होडी लागली आणि आम्ही उतरलो किल्ल्यावर. उतरल्यावर उजव्या बाजूला 'वेताळेेश्वर' मंदिरापासून आम्ही सुरवात केली. या लाकडी मंदिरात एक मोठा पंढरा दगड आहे, हाच वेतळेेश्वर नेहमी थोडा थोडा वाढत जातो असे म्हणतात. मंदिरात काही दुर्लभ माशांची हाडे पण पाहण्यासाठी ठेवली आहेत. मंदिराच्या समोरच किल्ल्याचा पहिला बुरुज दिसला. त्यावर लावलेले वेगवेगळे झेंडे फार सुंदर वाटत होते. या किल्ल्याच्या तटबंदीची दुरवस्था पाहून खूप वाईट वाटलं. प्रेमवेड्या वासु-सपना यांनी आपली नाव अक्षरशः ओईलपेंट ने लिहून ठेवली आहेत. तटबंदीचा एकही दगड यांनी सोडला नाही. या साल्यांचं प्रेम इतके तासही टिकलं नसेल जितके दिवस हि वास्तू उभी आहे. कीव येते या कपाळकरंट्यांची. साला, (आजून चांगल्या शिव्या इथे लिहू शकत नाही) आपल्या प्रेमाचे नाव लग्न पत्रिकेत लिहण्याची धमक जरी नसली तरी बापाची प्रॉपर्टी असल्यासारखी सगळीकडे लिहीत सुटतात. उजवीकडून पुढे तटबंदीने पहिल्या बुरुजावर पोहोचलो. याच बुरुजाखाली दारू कोठार आहे. पुढच्या बुरुजावर दोन इंग्रजी तोफा आहेत, चाकांवर फिरवता येणाऱ्या या तोफा कुलाबा किल्ल्यावरच्या तोफेनसारख्याच आहेत. पैकी एका तोफेची नळी आकाशाकडे फिरवून कोणीतरी त्यात भगवा फडकवला होता. आपल्या अचाट ताकतीचे असे पुचाट प्रयोग दाखवणार्यांना कोपरापासून हात जोडावेसे वाटतात. पुढे तटबंदीवरुन चालत गेल्यावर एक ह्यालिप्याड बनवले होते. याच्याच खाली समुद्रात उघडणारा एक दरवाजा आहे. इथून खाली उतरून खडकांतून चालत जाऊन, थोडा वेळ समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकत मी बसलो. आजून उजवीकडे, गोड्या पाण्याचे मोठे टाके आहे. सुंदर बांधकाम आहे या टाक्याचे. टाक्याच्या वर, टेकडीवर दीपस्तंभ आहे, तो पाहण्यासाठी आम्ही निघालो पण आम्हाला परमिशन मिळाली नाही. पुढे उजव्या बाजूने खाली उतरून आम्ही भांड्यांचा आवाज येणाऱ्या दगडाजवळ आलो, या दगडावर लहान दगड आपटल्यावर एक वेगळाच आवाज येतो. इथे थोडा वेळ बसलो आम्ही सगळे आणि दुर्गविरच्या एका सदस्याने या किल्ल्यांची माहिती आणि इतिहास संगलायला सुरवात केली.
सिद्दीला आणि इंग्रजांना जरब बसवण्यासाठी हा किल्ला राजांनी १६७२ मध्ये बांधायला सुरवात केली. इंग्रज व सिद्धी यांच्या अटकावामुळे राजांनी काही काळ काम थांबवले आणि १६७९ मध्ये मायनाक भंडारी यांच्या नेतृत्वाखाली भर पावसात बांधकाम पुन्हा सुरु केले. पुन्हा इंग्रजांनी काम थांबवण्यासाठी खूप हल्ले केले पण थळच्या किल्ल्यातून दौलतखान आणि खांदेरीवरून मायनाक भंडारी यांनी ते परतवून लावले. पुढे १६८० मध्ये इंग्रजांनी महाराज्यांशी तह केला. १८१७ मध्ये हा किल्ला पेशव्यांकडून पुन्हा आंग्रांकडे आला आणि १८१८ मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गेला.
आमची हि माहितीची देवाणघेवाण चालू असतानाच, काही वेळाने, बाजूलाच, फक्त वयाने प्रौढ वाटणारा एक ग्रुप खूप सार सामान घेऊन आला आणि चूल मांडू लागला. त्यांच्या बोलण्यावरून कळलं की ते इथलेच रहिवासी आहेत, आणि पार्टी करण्यासाठी आले आहेत, सर्व तयारीनिशी. एका बाजूला एक दुर्गवीर माहिती देत असताना दुसरीकडे '३ किलो मटणाला १ किलो कांदे कसे पुरतील' यावर वाद चालू होता. आधीच खच पडलेल्या बाटल्यांमध्ये आजून काहींची भर पडणार आज हे आम्ही ओळखल आणि आपण काहीच करू शकत नाही याची जाणीव झाली कारण ही माणस समजवण्यापलिकडची असतात. जिथे इथल्या राहिवास्यांना आपण काय हानी करतोय ते कळत नाही तिथे आमच्या सारख्या शहरी लोकांनी येऊन काय समजवाव. दुर्गवीर आपल्या सुवर्ण 'इतिहासाची' माहिती देत असताना हा चमू आपलं 'वर्तमान' मटण आणि दारूने रसरशीत करण्यात मशरुफ होता आणि आम्ही मात्र आपल्या 'भवीष्याचा' विचार करून मूग गिळून गप्प होतो. मुंबई पोर्ट ट्रस्ट सारख्या संस्थेच्या निगराणीत असूनही किल्ल्याची हि दुरवस्था पाहून मन अस्वस्थ झाल. हे सगळं पाहिल्यावर किल्ले दुर्गमच रहावे कारण लोकांना त्याची जाण नाही अस वाटून गेल कुठेतरी.


आमची हि सफर संपवून आम्ही पुन्हा त्या कोळीवाड्यात आलो. शेणाने सारवलेल्या अंगणात, झाडांच्या सावलीत, कैरी घालून केलेला जवळा, चुलीवर भाजलेली वापटी, तांदळाची भाकरी आणि डाळ-भात यांनी पोट तृप्त करून आम्ही मुंबईच्या दिशेला लागलो.
एक गोष्ट विचार करायला लावणारी मनात राहिली, शहरात राहून प्रभोधन करण, सुट्टीत एक दिवस किल्ल्यांना भेट देण, त्याची साफसफाई करणं सगळं ठीक पण उरलेल्या ६ दिवसात किल्ल्याचे हाल कारणाऱ्यांचं काय कराव लागेल आणि त्याचा कितपत उपयोग होईल? कारण माणसांचे स्वभाव बदलता येत नाहीत!

वैभव आणि सचिन


Comments