केंजळगड/मोहनगड, १० वर्षांपूर्वी राहून गेलेला (Trek to Kenjalgadh)

डंपर थांबला अचानक एका घरासमोर. 

- मामी... ए मामेय... हा घे! मस्त झणझणीत रस्सा कर, येतोच बघ परतून।.... सोडवून घे शिवा कडून!

सीटच्या मागचा, दोन-एक किलोचा कोंबडा खिडकीतून बाहेर देऊन ड्रायव्हर, घरातून धावत बाहेर आलेल्या म्हातारीला म्हणाला.

- मी करत नसते आता, उगाच....शिवा हाय व्हय इथं?
- कायबी बोलतेस व्हय, स्वतः बघितला त्याला इथं मागचं. बोलऊन घे त्याला, येतोय बघ मी परतून..

डपंर निघाला.
- आजोळ हाय माझं, आईच-मामाचं घर! एकाच गावात दोन्ही आहे बघा माझं, हे इथं माझं घर, ते माझं पोरगं!

रस्त्याच्या कडेला असलेल्या दुसऱ्या एका घराकडे इशारा करून साहेब म्हणाले.

- उतरा इथंच! गणपतीचं दर्शन घ्या, लय फेमस हाय, ऐकलं असेल 'वाईचा गणपती' म्हणून! मागून जुन्या पुलावरून जावा एसटी स्टँड वर, जवळ पडल. ३.३०/४ च्या दरम्यान निघतात गाड्या मुंबईकडे...का येताय परत, कोंबडं दिलंयच घरी.

रस्त्याने चालत राहायचं, येणाऱ्या गाड्यांना हात दाखवायचा, भेटेल त्या गाडीने, टेम्पो/ट्रकच्या मागे, वडाप गाड्यांना लटकून प्रवास करायचा, खूप वर्षांनी असा ट्रेक केला, एक वेगळीच मजा असते याची. केंजळ उतरून खावली गावातून चालताना हे महाशय थांबले आम्हाला वाई पर्यंत न्यायला. जोर धरणातून गाळ काढायच्या कामावर रुजू होते हे आणि डंपर दोघेही. वाटेत गोळा केलेल्या, होलटे भिरकावून पाडलेल्या, आंब्याच्या बिटक्यांनी पिवळे झालेले हात, लहानपणी पुसायचो अगदी तशेच ब्रोच्याला पुसून पटकन डंपरस्वार झालो आम्ही. 

काय साला सॉलीड रसायनं असतात ही गावाकडची माणसं! इथे आपण रोज एकाच लोकलने, एकाच सीटवर बसून प्रवास करूनपण, बाजूच्याशी २/४ महिने बोलत नाही आणि हे? अर्ध्या तासात जवळपास सगळं, म्हणजे अगदी नाव, गाव, काम, धंदा, दिवस कसा घालवतो पासून त्याच्या नजरेतून जगण्याचं काय गमक आहे ते पण सांगून जातात.


१०-१ वर्षांपूर्वी एक रेंज ट्रेक केलेला. कोकणातील पोलादपूरवरून सुरू करून भोर-सातारा पर्यंतची पायपीट आणि चंद्रगड ते अर्थरशीट-महाबळेश्वर, जोर धरण, किंजळगड, कमळगड, रायरेश्वर, रोहिडा असा भक्कम प्लॅन होता पण जरा गणित चुकलं आणि किंजळ पहायचा राहून गेला. इतकी वर्ष मनात राहिलेला किंजळ आम्ही काल डोळ्यात भरून घेतला. (त्या ट्रेकचा अनुभव - https://treklikevaibhavsachin.blogspot.com/2017/01/chandragad-to-arthur-seat-kamalgad.html)

केंजळगड, वाई ते रायरेश्वर पर्यंत गेलेल्या महादेव डोंगररांगेतील हा एक रांगडा किल्ला. सव्वाचार हजार फूट उंचीचा, रायरेश्वराच्या नैऋत्येला असलेला एक आडवाटेवरचा किल्ला. मुंबई ते भोर गाड्या कमी आहेत म्हणून मग वाईमार्गे जायचं ठरवलं आणि एस्टीचं बुकिंग केलं. शिवशाही आली पनवेल ला ११ वाजता पण अर्ध्यापेक्षा खाली. गाडी रस्त्याला लागली आणि मी शेवटच्या सीटवर आडवा झालो, सचिनला मात्र झोप लागली नाही कारण; एसटीचे रंग आणि नाव बदलले असतील तरीही गाड्यांची परिस्थिती अजूनही तशीच आहे. आमची गाडी लास्ट टाइम कधी साफ केली होती/सर्व्हिसिंग केली होती माहीत नाही. सकाळी ४ च्या दरम्यान वाईला पोहोचलो पण 'खावली' गावी जाण्यासाठी पहिली एसटी ६.३०ची होती. स्टँडबाहेर एकच हॉटेल चालू होतं तिथे चहाबरोबर थोडी विचारपूस केली आणि कळलं की ४.३० च्या दरम्यान दोन प्रायव्हेट बसेस येतात त्या त्याच मार्गाला जातात पण या गाड्या पण आज नेमक्या लेट झाल्या. एक गाडी आली ४.४५ च्या दरम्यान आणि ड्रायव्हर चहा घेऊन निघेपर्यंत ५.१५ झाले. प्रत्येक ५ मिनिटांवर एक एक प्रवासी उतरताना गाडी 'खावली' गावी ६.४५ ला पोहोचली. खवलीच्या मंदिराच्या पुढे ५-१ मिनिट चालल्यावर एक रस्ता उजवीकडे जातो. इथे रायरेश्वर आणि केंजळगड अशी पाटी लावली आहे. मागे कमळगड, समोर केंजळ असा निसर्गरम्य देखावा काही मिनिट पाहत उभे राहिलो. इथे आम्ही आणि एक कुटुंब उतरलं. त्या काकांनी सांगितलं एक दुधाची गाडी येईल ती रायरेश्वराच्या खिंडीपर्यंत घेऊन जाऊ शकते. आम्ही ऐकलं पण वेळ कमी होता म्हणून चालत जाऊ ठरवलं. वळणावळणाचा डांबरी रस्ता जास्त वेळ घेईल मग मधली वाट घेतली. जरा चढून गेल्यावर मागे कमळगड आणि धोम धरणाचा सुंदर निसर्ग, समोर ढगांच्या मागे लपंडाव करणारा केंजळ पाहण्यात रमून गेलो. तो नजरा कॅमेऱ्यात कैद करताना एक गाडी आमच्या नजरेसमोरून निघून गेली. आम्ही आशा टेकाडावर होतो की त्याला आवाजही देऊ शकत नव्हतो. आमच्या या चुकीची किंमत आम्हाला जवळपास २ तासाची पायपीट करून द्यावी लागली. डांबरी रस्ता सोडून उभी चढण घेतल्याने आम्ही अर्धा तासात 'घेरा किंजळ' या वस्तीत पोहोचलो. बैलांची सफेद खिल्लारी जोडी मालकाची वाट बघत वाड्याच्या बाहेर उभी होती. इथून एक उभी चढणीची वाट दिसत होती पण नक्की ती मळलेली आहे की नाही याची खात्री नव्हती म्हणून मग अंगणात काम करणाऱ्या काकांना विचारलं आणि ती छातीवरची चढण पार केली. वाटलं होतं की ही पार करून खिंडीत पोहोचू पण पुन्हा रस्तावर आलो. पुढे याच रस्ताने 'वाडकर वाडी' लागली. गावगाडा चालू झाला होता इथे, ताई पाणि भरत होत्या, काकू म्हशी सोडत होत्या, लहान मूल शेळ्या मेंढ्या घेऊन निघाली होती. आजून अर्धा पाऊण तासांनी आम्ही रायरेश्वराच्या खिंडीत पोहोचलो आणि पाणि पिण्यासाठी ब्रेक घेतला. इथेच, दहा वर्षांपुर्वी एके दिवशी केंजळ सोडून द्यावा लागला होता आम्हाला. इथून उजव्या बाजूला खाली उतरून पुन्हा पायपीट चालू झाली. थोडा वेळ चालून गेल्यावर, मुख्य रस्त्याला उजव्या बाजूला मातीचा एक रस्ता 'ओव्हरी' या ५-७ घरांच्या वस्तीत घेऊन जातो. वस्तीच्या सुरवातीला 'केंजळाई' देवीचं नवीन बांधलेलं मंदिर आणि लागूनच शाळा आहे. मागे गर्द माजलेल्या रानातून डोकं वर काढून उभा केंजळगडाचा भक्कम कातळकडा दिसतो. शाळेच्या मागून एक वाट या रानातून उभी घेऊन जाते. वाट चांगलीच मळलेली असली तरी अनेक ढोरवाटा फुटलेल्या आहेत. मार्किंग आहे मधेमधे, या वाटेने गडाचा कातळ उजवीकडे ठेवून चालत राहिल्यास अर्धा तासात आपण किल्ल्याच्या एका टेकाडावर येऊन पोहोचतो. ५ मिनिटं थबकलो इथे, ३६० डिग्री का काय म्हणतात तो व्हिव नजरेत भरून घेण्यासारखा अप्रतीम. उजव्या बाजूला धोम धरण, कमळगड, महाबळेश्वर, दूर दिसणारा रोहिड आणि त्याचा परिसर, या बाजूला धरणाचं बॅकवॉटर, पाठीवर केंजळचा ठोशिव कातळ, वर येजा करणारे ढग आणि लपणारा सुर्यप्रकाश, सगळं कमालच!

मागे फिरून गडाचा सरळसोट कातळकडा दिसत होता. डाव्या बाजूला एक गुफा दिसत होती पण तिला असलेली वाट खूपच रिस्की होती म्हणून प्रयत्न केला नाही. गडावर एक मोठी गुफा आहे पण ती ही नव्हे. इथून उजवीकडे कातळात खोदलेल्या पायऱ्या आणि त्याला लागूनच मोठी गुफा आहे हिला काळ्या कोळ्यांची गुफा म्हणून देखील ओळखतात पण आम्हला कुठे दिसले नाहीत ते. या गुहेला लागूनच गडाचे अवशेष दिसायला लागतात, एक पडकी भिंत इथे पूर्वी देवड्या असाव्यात असे भासवून जाते. आपल्या सह्याद्रीतील बेलाग कातळ कोरून पायऱ्या बांधून गड राबता केल्याची खूप उदाहरण आहेत त्यातल एक म्हणजे केंजळ. जवळपास ५५ पायऱ्या उभ्या कळ्याभिन्न कातळात कोरल्या, काय मेहनत आणि वास्तुशास्त्र आभ्यास लागला असेल. या पायऱ्या पूर्ण पडलेल्या गडाच्या प्रवेशद्वारावर घेऊन जातात. आत शिरल्यावर आजून काही बांधलेल्या पायऱ्या चढून गडाच्या माथ्यावर आलो. डावीकडून गड पाहायला सुरवात केली. एक सुकलेलं पाण्याचं तळ पार करून पुढे पहिला बुरुज लागला किल्ल्याचा. किल्ल्याची तटबंदी आता अगदीच जमिनीला टेकली आहे. तटबंदीवरुन चालत कमळगड, महाबळेश्वर आणि जोर धरणाचा परिसर न्हाहाळत, उतरलेले ढग आणि त्यांना लोटणारा गार वारा अंगावर घेत उभे राहिलो काही मिनिट शांत त्या बुरुजावर. मध्ये एक पाण्याचं टाक आहे यातलं पाणी पिण्यायोग्य आहे. पुढे तटबंदी सोडून गडावर आलो. एका वास्तूचे अवशेष आणि पुढे चुन्याचा पहिला घाणा लागला. चुन्याचे दोन घाणे आहेत या किल्ल्यावर यावरून तटबंदी काय मजबूत असेल उमेदीच्या काळात याचा अंदाज येतो. इथून पुढे रायरेश्वरकडच्या टोकावर गेलो, आताशा ढगांनी गर्दी केली होती त्यामुळे तो काही दिसला नाही समोर. सहज घड्याळाकडे लक्ष गेलं आणि घाई करावी लागेल म्हणून मग धावाधाव सुरू केली आम्ही. मागे फिरून प्रवेशासाठी निघालो. वाटेल एक कोठार आहे, काही लोक याला भिमाच मंदिर म्हणतात, का? माहीत नाही. याचाच मागे दुसरा चुन्याचा घाणा आणि देवीचं पडझड झालेल्या मंदिराचे अवशेष पाहून, हात जोडून आम्ही आमची गडफेरी पूर्ण केली. 

भरभर उतरून खाली खावली गाव गाठायला आम्हाला २ वाजले. वाटेत इतकी आंब्याची झाड पिवळी पडली होती की आमची तोंड पिवळी करून घेण्याचा मोह आवरला नाही आम्हाला. प्लॅनिंग प्रमाणे वेळेत होतो आम्ही. मंदिरापर्यंत चालत जाताना हे डंपरवाले भेटले. वाईच्या गणपतीचं दर्शन घेतलं. पाण्यात बागडणारी, आंब्यानी तोंड भरलेली मुलं पाहून लहानपण आठवलं. वयाचा फरक नसता तर आमचीही तोंड अशीच असती वाटेत आंबे चोखताना. वाई एसटी डेपोतुन मुंबईत जाणाऱ्या खूप बसेस आहेत. प्रायवेट गाड्या रात्री ८ नंतर चालू होतात. यायची बुकिंग केली न्हवती आणि नशिबाने ३.३० वाजता कल्याण एसटी मिळाली, हिने डोंबिवलीत पोहोचलो तेव्हा ९ वाजले होते. 

केंजळगड, केळंजा किंवा शिवरायांनी दिलेलं 'मोहनगड' ही नावं. १६७४ मध्ये शिवरायांनी वाई आणि परिसरातील सारे किल्ले घेतले आणि केंजळगड घेण्यासाठी मराठी फौजा पाठवल्या. तेव्हाचा आदिलशाही किल्लेदार 'गंगाजी विश्वनाथ किरदत' याने कडवी लढत दिली पण तो मारला गेला आणि गड २४ एप्रिल १६७४ मध्ये पडला. १७०१ मध्ये मुघलांकडे आणि लगेच १७०२ मध्ये परत मराठ्यांकडे आला. पुढे १८०८ मध्ये केंजळ इंग्रज जनरल प्रिझलर याने ताब्यात घेतला. बाराव्या शतकात भोज राज्यांनी बांधलेला हा किल्ला अजूनही पाहण्यासारखा आहे. लोकल ट्रान्सपोर्ट ने करायचा असेल तर प्रापर प्लॅनिंग करावी लागेल कारण वर्दळ खूप कमी असते या वाटेवर पण ३-१ तासाचा चांगला ट्रेक होतो. प्रायवेट गाडी अगदी पायाशी घेऊन जाते आणि ट्रेक फक्त एक तासात होतो मग. हे झालं मुंबईकरांसाठी, पुणेकरांनी भोर वरून करता येतो हा किल्ला. भोर-आंबेवाडी-कोर्ले मार्गे. स्वारगेट वरून बसेस आहेत भोर साठी.

एका बाजूने महाबळेश्वरची शिखरे, पाचगणी टेबललँड, कमळगड, , समोर रोहिडा, पुढे पांडवगड, मांढरदेव, मागे रायरेश्वरचे विस्तीर्ण पठार आणि अशा भारदस्त डोंगरदाऱ्यांमध्ये अडवलेले चमकणारे धोमचे पाणि असं अप्रतिम निसर्गसौंदर्य आहे या किल्ल्याच!


- वैभव आणि सचिन.

व्हिडीओ पहा आणि आमचं युट्यूब चॅनेल Subscribe नक्की करा https://youtu.be/Rdt-S0GS7Y0





















Comments