जावळीतून घाटमाथ्यावर.....पायपीट महाबळेश्वर ते भोर डोंगररांगेची (Trek to Chandragad to Arthur seat, Kamalgad, Rayreshwar, Rohida)
हा हिवाळा थोडा गार पडायला लागला की ट्रेककऱ्यांना वेध लागतात ते लिंक/रेंज ट्रेकचे. आम्हीही त्यातलेच. खूप खलबतांनंतर कोकणातून घाटमाथ्यावरची वारी ठरली....चंद्रगड ते आर्थरसीट पॉईंट (महाबळेश्वर), जोर धरण, किंजळगड, कमळगड, रायरेश्वर, रोहिडा.... म्हणजेच रायगड जिल्हा, सातारा आणि शेवट पुण्यात.
'WE DID IT'....हाच तो मॅसेज, जो प्रविणच्या टीशर्टवर पण होता आणि आमच्या मनातही...जेव्हा आम्ही 'बाजारवाडी' गावात एस.टी. ची वाट पाहत होतो. परतीच्या प्रवासानंतर, मुंबईच्या शो-श्या मध्ये उठून दिसण्याचा हा त्याचा प्रयत्न असला तरी या नविन टीशर्टने '४ दिवसाच्या आमच्या प्रवासात, अंगापासून दूर न झालेल्या एका टीशर्टची जागा घेतली होती'. बाकी, आम्हा तिघांचे टीशर्ट अजूनही सॅगमध्ये तातकळत होते.
आमचा प्रवास सुरु झाला तो, परेल एसटि डिपोवरून २४ डिसेंबरच्या रात्री. एसटिच्या शेवटच्या सिटमुळे, कोकणातील त्या 'राष्ट्रीय महामार्गावरील' मुबलक प्रमाणातील खड्डयांची जाणीव शरीरातील ज्या भागांना व्हायला नको होती तिथेही होत होती. मजल-दरमजल करत एसटी सकाळी ५ च्या सुमारास 'पोलादपूर' डेपोत शिरली. आमच्या सॅगचा आकार पाहून, तिकीट चेक करताना, कंडक्टरने मुंबईत विचारलेल्या त्या प्रश्नाने आमचा प्रवास हसत हसत गेला,....."काही घाबरण्यासारखं नाही ना यात??". पहाटे ५ हि जरी न्याहारीची वेळ नसली तरी गाडीवरचे 'बुर्जी-पाव' अक्षरशः हासडून आम्ही 'ढवळे' गावासाठी एक टम्म-टम्म ठरवली, हा होता चंद्रगडाचा पायथा, प्राचीन ढवळे घाटमार्गाची सुरवात. थोडी वाट वाकडी करून 'ऊमरठ'; नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळाला मुजरा करून आम्ही ढवळे गाव गाठल. प्रातंविधी आटपून, गावातील एका वाटाड्याला बरोबर घेऊन आम्ही ८ वाजता आमची पायपीट सुरु केली.
चंद्रगड(ढवळगड)-
(किल्ल्याची ऊंची : 2337 श्रेणी : मध्यम)
(किल्ल्याची ऊंची : 2337 श्रेणी : मध्यम)
१५-२० मिनिटाच्या मॉर्निंग वॉक नंतर चंद्रगडाच्या पायथ्यापाशी आलो. गड चढाईला एकूण २.३० लागतात. इथून पुढे आम्ही निघालो 'बहिरीची घुमटी' साठी.
चंद्रगड ते आर्थरसीट पॉईंट-
(किल्ल्याची ऊंची : 4127 श्रेणी : अत्यंत कठीण)
(किल्ल्याची ऊंची : 4127 श्रेणी : अत्यंत कठीण)
चंद्रगड उजवीकडे ठेवून एका नळीच्या (ओढ्याच्या) वाटेवरुन उजवीकडे वळल्यावर बहिरीच्या घुमटीची चढाई चालू झाली. ही वाट पूर्णपणे जंगलातून जाणारी होतीे, त्यामुळे उन्ह अस काही जाणवताच नव्हत. दरी डाव्या बाजूला ठेवत आम्ही वर चढत जात होतो. जंगलाची वाट एका घळीत संपली आणि पुन्हा खड्या चढाईला सुरवात झाली. हि चढाई एका माळरानावर संपली. इथून चंद्रगड खुजा वाटत होता... सततच्या उभ्या चढाईमुळे खूप कमी वेळात जास्त हाईट गेन केल्यामुळे असेल बहुतेक. चंद्रगड मागच्या बाजूस ठेवून आम्ही या माळरानावरून पुढे चालत होतो, हि वाट संपवून एक छोटी दगडांची रेंज पार केल्यावर समोरच 'बहिरीची घुमटी' दिसली. अश्या देव-देवतांच्या जुन्या दगडात कोरलेल्या मुर्त्या पाहून, आपल्या पूर्वजांच्या बद्दलचा आदर आजून वाढतो. पुढे डाव्या बाजूने थोड्या अंतरावर एक वाट आम्हाला पाण्याच्या टाक्याकडे घेऊन गेली. गाईडने सांगितल्याप्रमाणे, या जागेला 'जोरच पाणी' म्हणतात कारण इथून एक वाट जोर गावात उतरते. या थंडगार पाण्याने आमची पोटं आणि बाटल्या फुल करून आम्ही सगळ्यांनीच समोरच्या कातळावर पाठ टेकवली आणि डोळे आपोआप बंद झाले. 'चंद्रगड ते बहिरीची घुमटी' हि ५-६ तासाची उभी चढाई आमच्या जरा जास्तच अंगावर आली होती. इथून आमचा गाईड आणि त्याने बरोबर आणलेला त्याचा साथीदार (परत ढवाळ्यात उतरताना जंगलातल्या भीतीमुळे त्याने बरोबर आणलेला) आम्हाला हात दाखवून गेला. "आर्थरसीट येथून अर्धा तासात पोहोचाल तुम्ही, वाट पण मळलेली हाय चांगलीच!!", अस म्हणून हा पठठ्या आमच्याकडून पूर्ण पैसे घेवून निघाला, वास्तविक सकाळी आम्ही त्याला आर्थरसीट पर्यंतच्या बोलीवर आणाल होत. आतापर्यंतच्या रूट मध्ये आमच्यात चांगलाच घुळल्यामुळे आम्ही पण विश्वास ठेवला आणि फसलो. या पठ्ठाचं, अर्धा तसाच डिस्टन्स पार करायला आम्हा पामरांना तब्बल २ तास लागले.
'जोरचे पाणीवरून' उजवीकडील वाट पकडून आम्ही एका माळावर पोहचलो. वाट थोडी जंगलाची आणि सोप्या चढाची होती. ही वळणाची वाट २५-३० मिनिटात पार करून आम्ही माळावर आलो होतोे आणि समोरच दिसत होत 'आर्थरसीट पॉईंट आणि महाबळेश्वर, जवळजवळ ९०% महाराष्ट्रीयांच उगमस्थान!'. वाटेवरच जंगल आणि माळरान पार करत शेवटचा १०-१५ फुटाचा रॉक पॅच चढून आम्ही आर्थर सीटच्या फोटो पॉइंटवर पोहोचलो. आतापर्यंत आम्हाला खालच्या दरीतून वर येताना पाहणाऱ्या पर्यटकांच्या डोळ्यांत जणू परग्रही पहिल्याच आश्चर्य दिसत होत. काहींनी तर आम्हाला पाणी पाजण्याचाही प्रयत्न करून पहिला.
सकाळी ८ वाजता सुरु केलेली ही परेड आर्थरसीटच्या फोटो पॉइंटवर संपली तेव्हा हातातल घड्यालात ५ वाजले होते.
आमच्या प्लॅनिंगपमाणे, आमचा डे हॉल्ट हा 'केट्स पॉईंट' होता जो इथून ११ किमी होता आणि दुसऱ्या दिवशी 'नांदवणे' गावाला जाऊन 'किंजळगड' करायचा होता. पण या 'टाइम क्रायसेस' मूळे, दुसऱ्या दिवशी सकाळी 'जोर' गावात जायच ठरल. आर्थरसीट वर जोरसाठी जाण्याचा मार्ग विचारात असता तिथल्या एका फोटोग्राफरने आम्हाला आमच्या दुसऱ्या गाईडची गाठ घालून दिली; 'बाळू यादव'; हा जोरवाडी गावाचा रहिवासी आणि रोज महाबळेश्वरला ये-जा करणारा पोटापाण्यासाठी. "वाट जंगलाची आहे आणि एकटे जाऊ नका; सकाळीच मी स्वतः एक जनावर पाहिलंय! एक करू, मी माझ काम संपवतो आणि मग आपण एकत्रच जाऊ की!!" असे म्हणून बाळू निघून गेला. जवळजवळ १० तासांच्या पहिल्याच थकावणाऱ्या दिवासमुळे आम्ही थोडा आराम केला आर्थरसीट वर. बाळू जेव्हा परत आला तेव्हा ६ वाजले होते; त्याने आम्हाला चहाचा आग्रह केला ज्यासाठी फक्त ऋषी तयार झाला. बाळू आणि ऋषींचा चहा होत असताना आम्ही दूर उभे राहून 'हा हि कसे पैसे उकळले' यावर आमचा सकाळचा अनुभव गाठीशी धरून गप्पा करत होतो. दोन्ही चहाचे पैसे बाळूनेच दिले तेही आग्रहाने. बाळू स्वतःबरोबर आम्हाला एका मित्राच्या टेम्पोमधून महाबळेश्वर मंदिरापर्यंत घेवून गेला आणि इथेही पैसे विचारल्यावर नाही म्हणाला. मंदिराजवळ बाळूने आम्हाला त्याच्या दुसऱ्या एका मित्राच्या हवाली केल आणि स्वतः आपल्या रोजनादारीच्या कामासाठी एका बंगल्यावर निघून गेला. २ तासांच्या जंगलवाटेने आम्ही 'जोर धरणाजवळ' पोहोचलो आणि तिथल्या ओल्या मातीत आम्ही त्या जनावराच (वाघाचेे/बिबट्याचे) 'फुटप्रिंट्स' पहिले, आयुष्यात पहिल्यांदा. या वाटेवर एका ठिकाणी, अंधारातून चालताना एका लूझ रॉकवरून पडून माझ्या लोवर बॅकला चांगलाच मर लागला. त्या बाळूमित्राने जोरवाडीच्या शाळेच्या एका खोलीत आमची व्यवस्था केली आणि आम्ही दिलेले थोडे पैसे घेऊन तो निघून गेला. जेव्हा आम्ही आमची सॅग पाठीवरून उतरवली तेव्हा ८.३० वाजले होते. आम्ही जेवण उरकून झोपायची तयारी करताना बाळू आला आणि आम्हाला काय हव नको याची चौकशी करू लागला. आम्ही त्याचे आभार मानून त्याला थोडे पैसे ऑफर केले ते त्याने नम्रपणे नाकारल आणि म्हणाला..."मी हे पैसे घेतले तर काय माणुसकी राहिली!!". वास्तविक पाहता, जी रक्कम आम्ही त्याला देवू पाहत होतो ती त्याच्या एका ग्रुपचा गाईड म्हणून मिळणाऱ्या रुपयांपेक्षा जास्त होती. बाळूने आम्हाला, सगळीच बोट सारखी नसतात' याची जाणीव करून दिली आणि तो निघून गेला.
थकलेल शरीर आणि आमचा त्या दिवशीचा 'डॉक्टर सचिन' याच्या 'पाय' गुणामूळे आम्ही सगळे पडल्या पडल्याच झोपलो. दोन तीन तासांच्या सुस्त झोपेनंतर उघड्या खिडक्यांमधून येणाऱ्या बोचऱ्या गार वाऱ्याने आम्हाला जग केल. बाळूने सुचवल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी ७ ची प्रायव्हेट गाडी पकडण्यासाठी आम्ही ६ लाच आवराआवर करून रेडी होतो. त्या धुक्यात, सुर्योदयाच्या वेळी थोड फोटो सेशन केल आणि थांब्यावर जाऊन उभे राहिलो. गाडी आली ८ ला आणि महाबळेश्वरला कामानिमित्त जाणाऱ्या एका कुटुंबाचा संसार त्यात भरायला काही लोकांनी सुरवात केली. बाळू, तिथेहि येऊन जबरदस्तीने आम्हाला त्याच्या घरी चहा साठी घेऊन गेला. त्याच्या गृहदेवतेने तेव्हढ्याच आपुलकीने आम्हाला चुलीजवळ बसवून चहा दिला. तो गोड चहा गळ्याखाली उतरत होता आणि एक वेगळीच ऊब देत होता. बाळू सारख्या या माणसांच्या घराची गरिबी आणि मनातली श्रीमंती यामधला जमीन-अस्मानाचा फरक कुठेतरी आत बोचून गेला.
कमळगड -
(किल्ल्याची ऊंची : 4200 श्रेणी : मध्यम)
(किल्ल्याची ऊंची : 4200 श्रेणी : मध्यम)
दुसऱ्यादिवशी सकाळी त्या प्रायव्हेट गाडीने अक्षरशः लटकत आम्ही 'बालकवाडी' गावी पोहोचलो. इथून पुढे थोडं चालत आम्ही 'नांदवाने' गावातून आम्ही कमळगड चढायला सुरुवात केली. अडीच तासाच्या चढाईनंतर आम्ही 'गोरक्षयनाथांच्या मंदिरापाशी' पोहोचलो. वाटेत आजूबाजूचा परिसर पाहताना मन तृप्त होत होत. पुढे धनगराच्या घरा जवळूनच लगेच अर्धा तासात गड गाठला. गडाच मुख्य आकर्षण म्हणजे 'गेरूची किंवा कावेची विहीर', उंच अशा या ५० ते ५५ पायर्या उतरत जाऊन डोंगराच्या पोटात गेल्यासारख वाटल. आतल्या रंगामुळे जणू आपण जमिनीत कोरलेल्या 'लाल महालात' आहोत असं वाटाव. आम्ही ४ वाजताच्या सुमारास उतरायला सुरुवात केली ते दुसर गाव 'वासोळे' गाठण्यासाठी. गोरक्षनाथांच्या मंदिराजवळून, थोडं मागे येऊन, एका उमराच्या झाडापासून, उजवीकडून, एक वाट वासोळ्यात उतरते, येथून आम्हाला ६ ची बस पकडून 'खावली' गाव गाठायचं होत. हे होत 'केंजळगडाच्या पायथ्याचे गाव'. बस आली ६.३० ला आणि जेव्हा आम्ही 'खावलीत' पोहोचलो तेव्हा ७.१५ वाजले होते आणि अंधारून आलं होत. जवळच्या 'नवलाई देवीच्या' मंदिराला भेट देऊन आम्ही पुन्हा सल्लामसलत करू लागलो. आमच्या ठरलेल्या शेड्युल प्रमाणे, आमचा दुसऱ्या दिवसाचा हॉल्ट होता 'किंजळगडाचा माथा' जो गाठण आता ३ तासाची चढाई आणि होणारा अंधार यामुळे अशक्य होत. मग किंजलगड बाजूला ठेवून 'रायरेश्वर' ला कूच करायच ठरल.
रायरेश्वर -
(किल्ल्याची ऊंची : 4000 श्रेणी : मध्यम)
(किल्ल्याची ऊंची : 4000 श्रेणी : मध्यम)
प्रायव्हेट गाडीने आम्ही जेव्हा रायरेश्वराच्या पायथ्याला पोहचलो तेव्हा ८ वाजले होते. वाट अगदी चांगली असल्यामुळे, हि चढाई आम्ही टॉर्चच्या प्रकाशातच करायच ठरवल आणि सुरु केली. अंदाजे १.३० तासांनी आम्ही किल्ल्यावरील मंदिराजवळची 'जंगमवाडी' गाठली. एका घरात आम्ही आसरा घेतला आणि त्या रात्री पोटभर जेवण करून आम्ही झोपेच्या आहारी कधी गेलो कळलंच नाही. रात्रभर मिळालेल्या निवांत झोपेमूळे, सकाळी एकदम फ्रेश वाटत होत. सगळी आवश्यक काम आटपल्यानंतर आम्ही निघण्याच्या तयारीत असताना त्या घराच्या शेंडेफळाने आम्हाला एक तांब्या भरून धारोष्ण दूध ऑफर केल; काय टेस्ट होती त्याची, अप्रतिम. त्यांना ठरलेल मानधन देवून आम्ही निघालो रायरेश्वराच्या दर्शनाला. छत्रपतींनी स्वराज्याची शपथ ज्या पिंडीवर हात ठेवून घेतली आणि ती पूर्ण केली, त्याच पिंडीला नमस्कार करताना उर अभिमानान भरून येत होता. जोडलेले हात आणि मनात शिवरायांना पुन्हा आठवत आम्ही गडाच्या उतरणीला लागलो. आमचे पुढचे ध्येय होते 'रोहिडा, नीरा नदीच्या खोऱ्यात वसलेला.
रोहिडा -
(किल्ल्याची ऊंची : 3660 श्रेणी : मध्यम)
(किल्ल्याची ऊंची : 3660 श्रेणी : मध्यम)
'कोरले' गावात उतरून आम्हाला १२ वाजताची 'भोर' ला जाणारी एसटी पकडायची होती पण ती फक्त ५ मिनिटांनी चुकली. गावकाऱ्यांनी सुचवल्याप्रमाणे आम्ही त्या डांबरी रास्तवरून चालत एका जास्त व्यस्त फाट्याकडे निघालो जो जवळजवळ १.५ किमी होता. रस्तात एका पत्रकाराने चक्क आपल्या मोटरसायकल वरून उतरून आमची चौकशी केली, बहुतेक आमच्या एकूण अवतारावरून त्याला आम्ही 'चांगलेच भेटले' अस वाटल असावं. नंतर त्या गृहस्थाने आम्हाला तो चालवत असलेल्या सामाजिक चळवळीची माहिती दिली. विषय आवडीचा असल्याने आमचा थोडा वेळ इथेही खर्ची गेला आणि आम्ही जेव्हा त्या जंक्शनवर पोहोचलो तेव्हा पुन्हा शेवटची एसटी ५ मिनिट अगोदरच निघून गेली होती. दुसऱ्या गाडीची वाट बघत असताना तो पत्रकार मित्र आणि त्याचा एक भाऊ आपल्या गाडीने आले. पुन्हा या गृहस्थाने आम्हाला मदतीचा हात दिला व २ मोटारसायकल वर ६ गृहस्थ आणि त्यांच्या मोठ्या सॅग 'आंबेवाडी' गावाच्या दिशेने निघालो जे ४ किमी दूर होत. तिथे पोहचल्यावर, पत्रकार मित्राने सुचवल्याप्रमाणे आम्ही 'नागेश्वर मंदिर आणि झुलता पूल' या दोन ठिकाणांना भेट दिली. सर्व आटपून आम्ही जेव्हा 'भोर डेपोत' पोहचलो तेव्हा २ वाजले होते. चौकशीअंती कळल कि बाझारवाडीसाठी पुढची एसटी ४.३०ला आहे. आमच्याकडे वेळ कमी होता, शेवटी एका प्रायव्हेट वेहीकल 'बाझारवाडी' गाठली. रोहिडा बघून खाली यायला आम्हाला २ ते २.३० तास लागले. बाझारवाडीतून भोर साठी ७ ची एसटी पकडून आम्ही स्वारगेट-मुंबई असा आमचा प्रवास सुरु केला तो सह्याद्रीच्या निसर्गाने काठोकाठ भरलेल्या मनाने....
किंजळगड राहिल्याची खंत होतीच, पण, मनातल्या इच्छांना, ठरवलेल्या निर्णयांना, परिस्तिथी प्रमाणे मुरड घालण्याची आयुष्यभर पुरणारी लकब ट्रेकिंग नेहमीच शिकवते.
या चार दिवसांच्या प्रवासाच्या शेवटी लक्षात राहिले ते दोन गाईडस. एक, जो आपल्या सोयीसाठी, पूर्ण मोबदला घेऊन, फसवून निघून गेलेला. आणि दुसरा जो, बिनमोबादला, फक्त माणुसकी म्हणून, आपल्या ऐपतीच्या पुढे जाऊन मदत करणारा.
जाता जाता, एक प्रामाणिक विनंती. वाचणाऱ्यांपैकी जर कधी कोणी महाबळेश्वर आर्थरसीट पॉइंटवर गाईडच्या शोधात असाल तर नक्की चौकशी करा....बाळू यादव याच्या साठी.
धन्यवाद.
टिप -
# हा रेंज ट्रेक खूप कठीण श्रेणीतला आणि थकवणारा असून, चांगला अनुभव असल्यासच प्रयत्न करावा. पूर्ण तयारी आणि अभ्यास करूनच सुरवात करावी.
# हा रेंज ट्रेक खूप कठीण श्रेणीतला आणि थकवणारा असून, चांगला अनुभव असल्यासच प्रयत्न करावा. पूर्ण तयारी आणि अभ्यास करूनच सुरवात करावी.
# गाईड ठरवताना, पैसे व अटी वदवून घ्याव्या. गाईड घेतल्याशिवाय जाण्याचे उगाच धाडस करू नये.
Comments
Post a Comment