Trek to Trambakgad aan Durgbhandar - कोरलेल्या कातळाच्या पोटात....

सहजच फेसबुकवर फेरफटका मारताना एक पोस्ट वाचनात आली. 'दुर्ग भांडार' नावाच्या; त्र्यंबकगडाच्या जवळच्या; बऱ्याच जणांना माहिती नसेल अश्या एका गडाबाबत होती ती. मी पण याच 'बऱ्याच जणांमध्ये' होतो. मग काय!... अरे सचिन, रविवारी काय करतोयस??....नेहमीचा फोन नंबर आणि सध्या नेहमीचाच झालेला प्रश्न....आणि उत्तर हि नेहमीचच.

ती लहानशी पोस्ट वाचून वाढलेली उत्कंठा घेऊन आम्ही त्र्यंबकगडाच्या पायथ्याशी सकाळी ८.३० वाजता पोहोचलो. डोंबिवलीतून निघताना चेक केलेला नाशिकचा ६ डिग्री पारा इथे पोहचता-पोहचता -६ डिग्री झाल्यासारखा वाटत होता. हातातील बाइक आणि नाकातुन वाहणार पाणी, दोघांनाही मोठ्या शिताफीने कंट्रोल करत आम्ही पूर्ण प्रवास अक्षरशः संपवला.

सकाळी ५ च्या सुमारास निघून २ तासात आम्ही पहिला ब्रेक घेतला तो 'घाटणदेवीला'. आजपर्यंत या रेंज मध्ये केलेल्या सर्व ट्रेकमध्ये अंगवळणी पडलेली एक सवय म्हणजे, 'कसारा घाटातील घाटणदेवीला नचुकता केलेला नमस्कार'. पुढचा प्रवास १.३० तासात संपवून आम्ही त्र्यंबकेश्वर मंदिरापाशी पोहचलो आणि त्या तिर्थक्षेत्री स्व:आत्मास वडाउसळीचा नैवेद्य दाखवून त्र्यंबकगडच्या पायऱ्यांना लागलो.

त्र्यंबकगड/ब्रम्हगिरी आणि दुर्गभांडार -
(४२४८ फूट)
आपल्या पायथ्याशी, १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र बाळगलेला गड म्हणजे 'त्र्यंबकगड'. गोदावरीचा उगम याच गडावरून होतो. गौतम ऋषींचे गोहत्येचे पापक्षमन करण्यासाठी भगवान शंकराने इथे जटा आपटल्या अशीही एक आख्यायिका आहे. अनेक ऋषीमुनींनी इथे तपस्याहि केल्या आहेत. अश्या पौराणिक महात्म्यापुढे ब्रम्हगिरीचे ऐतिहासिक महत्व थोड कमी पडल्याच जाणवतं ते वर चढून जाणाऱ्या अध्यात्मिकांच्या गर्दीमुळे. देवगिरीच्या यादवांनी बांधलेला, मुघलानी १६३६ च्या दरम्यान  जिंकून घेतलेला व पुढे इंग्रजांनी १८१८ ला मराठ्यांकडून घेऊन उध्वस्त केलेला हा गड. गडाची एकूण रचना आणि ठिकाण पाहता हे एक टेहळणीच ठाण असावं. डावीकडे त्र्यंबकेश्वर आणि बरोबर जव्हार-मोखाडा प्रांतावर करडी नजर ठेवून हा गड उभा असल्यामुळे याचाही महत्व थोड नसाव आपल्या इतिहासात.

आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली व नजरेस पडू लागल्या त्या निरनिराळ्या देव-देवता, पायऱ्यांच्या दोन्ही बाजुस वसलेल्या. या मुर्त्या, मुबलक प्रमाणात आलेल्या तिर्थक्षेत्रींसाठी जरी पूजनीय असल्या तरी आम्हाला मात्र कंटाळा आणत होत्या. एक दोनदा मला तर इथे येण्याचं डिसीजन चुकल्यासारख पण वाटल.




उजव्या बाजूला कातळभिंत ठवून दगडात उभ्या कोरलेल्या या पायऱ्या चढताना जास्त स्ट्रेंथ लागत होती. जवळ जवळ ४५ मिनिट चढून गेल्यावर आम्ही दगडातच कोरलेल्या एका दरवाज्या समोर येऊन पोहोचलो. काहीच कोरीवकाम नसलेला कातळातच कोरलेल्या या दरवाज्याचा साधेपणा मनात भरला. दरवाज्या मागच्या दोन देवड्या या गडावर आपल्या उमेदीच्या काळात चांगलाच राबता असेल याची ग्वाही देत होत्या. थोडं पुढे जाऊन दुसरा दरवाजा लागला, तो पार करून आम्ही ब्राम्हगिरच्या पठारावर पोहचलो.




समोरची एक छोटी टेकडी पार करून पलीकडे 'जटेश्वर आणि मूळगंगा उगमस्थान' हि श्रद्धास्थानं होती पण आमची पावल निघाली ती आमच्या श्रद्धास्थानाच्या शोधात. येताना, वेळ मिळाला तर, हि दोन्ही ठिकाण पाहू अस ठरवून, याच टेकडीच्या पायथ्यापासून उजवीकडे वळून आम्ही लागलो 'दुर्गभांडार' च्या वाटेला. सुकलेल्या गवतात हरवलेली व मध्ये-मध्ये तुटलेली वाट, उजव्या बाजूला खोल दरी आणि डाव्या बाजूला डोंगर ठेवून आम्ही तुडवायला सुरवात केली. सकाळपासून कंटाळवाणी वाटलेली तीर्थयात्रा आता खऱ्या अर्थी ट्रेक वाटू लागली होती.



या वाटेने २०-१ मिनिटं चालल्यावर एक खराब पाण्याच टाक लागलं. जटेश्वर मंदिरापासून येणारी वाट इथेच मिळत होती. हि वाट पाठमोरी ठेवून आम्ही सरळ चालत राहिलो; समोर दिसत होता तो काळ्याक्षार कातळकडा, 'दुर्गभांडार'. ते रौद्र रूप खरंच शंकराच्या जटांसारखं वाटत होत.




गड आणि त्याला जोडणारा पूल तर समोर दिसत होता पण अप्रोच कुठून दिसत नव्हता, थोड पुढ गेल्यावर डाव्या बाजूला एक खंदक दिसला आणि उत्तर मिळालं. थोड जवळ जाऊन पाहिल्यावर नजरेस पडल ते दुर्गभांडारच खरं आश्चर्य, वेगळेपण, उभ्या कातळात कोरलेल्या, पाताळात नेणारा तोशिव जिना. हे खंदक जर व्यवस्तीत झाकलं तर कोणत्याही शत्रूला गडावर जाण्याचा मार्ग मिळणार नाही अशी याची रचना होती. या ५०-१ दगडी पायऱ्या आणि इथे वास्तव्य करणाऱ्या मार्कटांचा थरारक अनुभव घेऊन आम्ही पोहोचलो पहिल्या दरवाज्यापाशी. फक्त २ फूट उरलेला हा दरवाजा, सुरक्षा म्हणून खरंच तसा बांधलाय कि जमिनीत गडाला गेलाय हे कळत नव्हतं. इथे आम्ही खरंच गुडघ्यावर आलो, रांगत तो पार करण्यासाठी. दरवाज्यावरच ठाण मांडून बसलेल्या माकडांनी आमचं 'सिक्युरिटी चेक अक्षरशः आमच्याच खांदयावर बसून केलं'.



दरवाज्यातून बाहेर पडताच समोर तो दगडी पूल दिसत होता, दुर्गभांडरला जोडणारा. काय विव्ह होता!...दोन्ही बाजूला अंदाजे १००० फूट खोल दरी आणि समोर कातळकडा. हा २५० फुट लांब आणि ५-१ फूट रुंद पूल पार करून आम्ही आजून एका २ फुटी दरवाज्याजवळ पोहचलो.




बहुतेक हे दुर्गभांडार च प्रवेशद्वार असावं. पुन्हा रंगून आत गेल्यावर, पायऱ्या लागल्या, अगदी तशाच. २-२ फुटाची एक-एक पायरी चढून गेल्यावर आम्ही पोहचलो गडावर. थोड्याच अंतरावर दोन पाण्याची टाकी होती पण पाणी पिण्याजोग नव्हत. इथून मागे पाहिल्यावर ब्रम्हगिरी ठामपणे उभा दिसत होता. गंगाद्वार आणि गोरक्षनाथांची गुहा असलेल्या कातळकड्याच्या शिरावर आता आम्ही उभे होतो. इथून पुढे उत्तरेकडे एक वाट आम्हाला गडाच्या शेवटच्या टोकाकडे घेऊन गेली. समोर कातळातच नीटस कोरलेला एक चिलखती बुरुज होता. या बुरुजाच्या टोकावरून दिसणार दृश्य डोळ्यांचं पारणं फेडणार होत. उजव्या बाजूला तिर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर, कुशावार्ता तलाव, समोर आणि डाव्या बाजूला हवाहवासा वाटणारा सह्यपरीसर. बुरुजावर बसून थोडा वारा अंगावर घेऊन आम्ही गडाला रामराम ठोकला.


परत येतानाच्या वाटेवर, पहिल्या लागलेल्या पाण्याच्या टाक्यापासून सरळ जात आम्ही जटेश्वर मंदिर गाठलं. मंदिरात एक लहानस पाण्याचा झरा दिसत होता आणि एक 'पुरो'हीत, भाविकांना 'मम्' म्हणायला लावून शंकराच्या पिंडीवर ठेवलेली १०-२० रुपयांची आचमनं ग्रहण करताना दिसला. याच पिंडीला नमस्कार करून आम्ही बाहेर आलो. मंदिराच्या बाजूलाच एक न पिण्याच्या पाण्याचा टाक होत. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरून आम्ही निघालो मुळगंगा म्हणजे गोदावरी उगमस्थानाकडे. वाटेत एक छप्पर नसलेल दगडी बांधकाम होत या मंदिराच्या कळसावर 'ब्रम्हगिरी मुख्यदर्शन' अस लिहल होत. आतमधील भाविकांची गर्दी टाळण्यासाठी आम्ही वरूनच हि वास्तू पहिली आणि पोहोचलो गोदावरी उगमस्थानाकडे. इथेही पौरोहित्य जोरात चालू होत. या कुंडातलं पाणी मनसोक्त पिऊन आम्ही आमची तहान भागवली. मी जास्त अध्यात्मिक नाही, पण खरंच एक वेगळीच चव आणि तृप्ती होती त्या पाण्यात!....





काळ्या कातळाच्या गढी रचून तटबंदीचे चिलखत उभे केलेले किल्ले आतापर्यंत खूप पाहिलेत, पण दुर्गभांडार हा बहुतेक एकमेव असेल जिथे कातळ उभा कोरून पायऱ्या, दरवाजे, बुरुज बांधले गेलेत.
एक वेगळीच गडबांधणी पाहिल्याचा आनंद मनात भरून, सकाळी ९ ला सुरु केलेली पायपीट संपवून आम्ही १.३०च्या सुमारास मुंबईच्या रस्ताला लागलो.

वास्तुशास्त्राचा सर्वोत्कृष्ट नमुना म्हणजे 'त्र्यंबकगड आणि दुर्गभांडार' पाहून त्या पाथरवटांना मनापासून सॅल्युट कारावासा वाटतो.....

टीप-
# गडावर खूप माकड असून सुट्टे सामान हातात ठेवू नये. माकडांना इजा पोहचनार नाही याची काळजी घ्या. त्यांना खायला घालणं टाळा नाहीतर ते तुमचा पिच्छा सोडणार नाहीत.

# दुर्गभांडरचा ट्रेक हा मध्यम श्रेणीत मोडणारा आहे.



- वैभव आणि सचिन

Comments