भास्करगड/बसगडाच्या पायऱ्या...(Trek to Bhaskar gad/Basbad)
- 31st चा काय प्लॅन??...कुठे बसायचं??
- खरंच यार, जवळजवळ एक महिना झाला...चल प्लॅन करू काहीतरी!!!
आणि...
रविवार; 31st Dec; आंग्लवर्षाचा शेवट....
सुवर्णकांचंन योग...
सकाळी, ७ वाजता, घाटणदेवी मंदिरात हात जोडून, थंडीत कुडकुडत आम्ही उभे!!...खरंच, डोक्यावर पडलोयत का आम्ही???
आमच्या महाराष्ट्रात-सह्याद्रीत, गड-किल्ल्यांची कमी नाही! आणि त्यात भटकणाऱ्या मावळ्यांचीही!...काही गड नावाजलेले/फेमस....आणि खूप सारे...दुर्लक्षित!
'हरिहर' असाच एक नावाजलेला आणि बाजूचा 'भास्करगड' दुर्लक्षित...कॉलेजातल्या अगणित सुंदर बालांमध्ये...एखादी फार देखणी नाही पण सावळी-नीटस-सुबक-ठेंगणी असते, अगदी तसंच... आणि आम्हीही.....तिथेच भुलतो!!!
31st कोणत्यातरी गडावरच करायचं ठरलं; शनिवारी रात्री उशिरा 'भास्करगड' फिक्स झाला. नाशिकाच्या पश्चिमेकडे आणि इगतपुरीच्या उत्तरेला 'त्रंबक डोंगररांगेच्या दक्षिण टोकाला भास्करगड उभा आहे. लोकल नाव 'बसगड'..का ते त्याचा घेरा पाहून कळलं! कल्याण-कसारा-इगतपुरी वरून त्रंबकेश्वरकडे जाणाऱ्या वाटेवर 'निरगुडपाडा' हे गडाच्या पायथ्याचं गाव आम्ही गाठलं आणि सकाळी ८.३०ला ट्रेक सुरू केला. गड समोर अगदी स्पस्ट दिसत होता; वाटलं एका तासात टॉप वर जाऊ पण खूप फिरवलं आम्हाला. गावाच्या डाव्या बाजूने एक कच्चा रस्ता जातो, हा रस्ता मधेच तोडून डावीकडे डोंगराची सोंड आम्ही धरली. नुकत्याच लागून गेलेल्या वणव्याने ही पूर्ण सोंड काळी पडली होती. ही लांबलचक आणि वर चढत नेऊन थकवणारी वाट १ तास तुडवून आम्ही बसगडाच्या कातळकड्यासमोर आलो. दम काढला होता आमच्या या चढईने. इथून उजव्याबाजूने जाणारी पायवाट कातळकड्याला वळसा घालून कातळात खोदलेल्या पायर्यांपाशी गेली. वाटेत दोन-तीन गुफा, पाण्याची टाकी लागली. ही वाट ४५ मिनिटात संपली आणि आम्ही पोहोचलो या गडाच्या वैशिष्ट्यासमोर. काताळात खोदून काढलेला सर्पिलाकार जिना. ढोपर उंचीच्या पायर्या असलेल्या या जिन्याच्या दोन्ही बाजूला १० फूट उंचीच्या कातळभिंती आहेत. बुरुजवरची तटबंदीचे दगड पडून काही जिने झाकले गेलेले होते. जिन्याचा मार्ग आम्हाला प्रवेशद्वारासमोर घेऊन गेला. प्रवेशद्वार अर्धअधिक मातीत गाडल गेलेल आहे. यातून वाकून किल्ल्यात प्रवेश केला आम्ही. प्रवेशद्वाराला लागूनच पहारेकर्यांसाठी देवड्या दिसल्या. आजून काही पायऱ्या चढून आम्ही गडावर प्रवेश केला. गडाच्या डाव्या हाताला दोन पाण्याची टाकी दिसली आणि समोर त्रंबक रांगेतील फणीचा डोंगर, हरिहर पलीकडे ब्रह्मगिरी दिसत होता. बसलो इथे काही वेळ, डोळे भिडवत त्या डोंगरांना. एका बाजूला वैतरणा जलाशय दिसत होता पण त्यामागचे AMK, कळसुबाई ठळकपणे दिसत नव्हते. परत मागे फिरून उजवीकडे मारुतीची मूर्ती, पावसाळी तलाव, वाड्याचे अवशेष पाहून घेतले आणि परतलो निरगुडपाड्यात. एका घराच्या अंगणात बसून काही गप्पा मारल्या गावकऱ्यांबरोबर, फ्रेश झालो आणि निघालो डोंबिवलीला. उरलेला 31st साजरा करायला.
इतिहासात हा किल्ला जास्त नावाजलेला नाही. इ.स १२७१ ते १३०८ पर्यंत हा किल्ला देवगिरीच्या अधिपत्याखाली होता. नंतर बहामनी पुढे निजामशाही यांच्याकडे किल्ला आला. निजामशाहीच्या अंतकाळात इ.स १६२९ मध्ये शहाजी राजांनी बंड केले, तेव्हा भास्करगड त्यांच्या ताब्यात गेला. १६३३ मध्ये शहाजी राजांकडून हा किल्ला मोगलांकडे गेला १६७० मध्ये शिवरायांचा पेशवा मोरोपंत पिंगळे याने हा किल्ला जिंकून घेतला.१६८८ मध्ये मोगलांनी भास्करगड जिंकून घेतला. इ.स १७३० मध्ये कोळ्यांनी बंड करुन तो घेतला पूढे १८१८ पर्यंत हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात होता.
हरिहर खूप वेळा केला म्हणून बसगड निवडला या वेळेला. भास्करगडाचा माथा बेसॉल्ट खडकाचा बनलेला आहे. याचे मुख्य आकर्षण म्हणजे काताळात खोदून काढलेला सर्पिलाकार जिना. एका दिवसाचा ट्रेक म्हणून हा उत्तम पण २-२.३० तास दमवणारा पर्याय आहे ज्यांना हरिहर पुन्हा करायचा नाही त्यांसाठी.
जरूर जा आणि अनुभवा!
x
This comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteमी सदर माहिती माझा व्हिडीओ मध्ये शेअर करु इच्छितो जर आपली काही हरकत नसेल तर... माझं स्वतःचं असं एक youtube चॅनेल आहे आणि त्या व्हिडीओ मधे माला सदर इतिहास सांगायचा आहे, कृपया reply द्या...
ReplyDelete