न्हावीगड...बागलाणचा रतनगड (Trek to Hnavigad))
साला, वेळ कधी बदलली कळलंच नाही ! एक वेळ अशी होती की आम्ही कुठल्याही वेळी ट्रेकसाठी तयार असायचो; एका फोनवर बॅग उचलून निघायचो. नंतर, गेले काही वर्षे; वेळ काढावा लागायचा आणि आता अशी हालत आहे की वेळ काढायला वेळ मिळत नाही.
हा, 'बागलाणचा रतनगड'; म्हणजेच 'न्हावीगड' गेले ४ वर्ष आम्ही डिस्कस करत होतो पण वेळ आली नव्हती; कारण ट्रावलिंगसाठी लागणारा एकूण वेळ! जवळपास २७० किमी वर आहे डोंबिवलीहून. आता आजून किती वेळ मारून न्यायाची अशीचं, म्हणून मग गेल्या शनिवारी रात्री ११ची वेळ ठरली.
नाशिक जिल्ह्यातील बागलाण प्रांत म्हणजे आमच्यासारख्या फिरस्तांसाठी चैनचं ! सह्याद्रीच्या उत्तर-दक्षिण जाणाऱ्या डोंगररांगेला सेलबारी आणि डोलबारी रांग म्हणतात. सेलबारी डोंगररांगेत मांगीतुंगी, तांबोळ्या, ह्नावीगड तर डोलबारी रांगेत साल्हेर, सालोटा मुल्हेर, मोरा, हरगड असे किल्ले आहेत. एकापेक्षा एक उर भरून दम काढणारे गड ! गुजरात बॉर्डरवर असल्याने यांना गाठण्यासाठी खुपचं वेळ काढावा लागतो आमच्या सारख्यांना !
न्हावीगड, शिवकालीन कागदपत्रानुसार नाहवागड किंवा रतनगड, बागलाणचा! ४१०० फूट उंच आणि नाशकातल्या बाकी किल्ल्यांसारखाच उघडा; १.३० ते २ तासांची उभी चढण आणि कातळात खोदलेल्या निसरड्या पायऱ्या. ज्यांनी हरिहर, कलावंतीण केला असेल त्यांना हा अनुभव एक लेवल वर वाटेल.
इ.स. १४३१ मध्ये या किल्ल्याच्या पायथ्याशी अहमदशहा बहमनी आणि गुजरातचा सुलतान यांमध्ये युद्ध झालं. पुढे राजांनी हा गड आपल्या ताब्यात घेतला. व्यंकोजिराजांना इ.स. १६८० मध्ये राजे लिहितात; "दुसरा नाहवागड बागलाणच्या दरम्यान मुलुखात आहे. तो कठीण तोही घेतला. हे दोन्ही किल्ले (अहिवंत आणि नाहवा) नामोशाचे पुरातन जागे कबजा केले. त्या किल्ल्यावरही बहुत मालमत्ता सापडला त्याच बरोबर जमेत होती ते मुलकात पाठवून धामधूम केली."
आम्ही डोंबिवलीतून रात्री ११ वाजता गाडीला टांग मारली. ६ तासाचा प्रवास होता. प्लॅन होता मांगीतुंगी आणि न्हावीगड दोन्ही करायचा पण ट्रॅफिक आणि खराब रस्ता, दोनदा टायर पंचर....पाताळवाडी गाठली तेव्हा ८.३० वाजले होते.
नाशिक पार करून सटाणा साठी बाईक पळवत होतो तेव्हा पहिल्यांदा टायर पंचर झाला. सकाळी ४ वाजले होते जवळपास आणि थंडी अंगाला झोंबत होती. एका पेट्रोलपंपवाल्याची आणि पंचरवाल्याची झोप मोड करून, आता आपणही थोडी झोप काढू म्हणून त्यांना आसरा देण्यासाठी विनंती केली पण त्यां माणसांनी थंडपणे नकार दिला. नाईलाजाने पुढे ताहाराबद गाठण्यासाठी चालत राहिलो देवाला शोधत आणि एका कांद्याच्या शेतात देव पावला. मी त्या शेंदरी मारुतीच्या मागे आणि सचिन डावीकडे असे आश्रस्त झालो. सकाळी ६.३० च्या दरम्यान, दररोज येणारे दोन कुमारवयाचे भाऊ मारुतिची पुजा करायला आले तेव्हा जाग आली, आम्हीपण मारुतीला हात जोडून, पाय गाडीकडे वळवले. ताहराबाद-पिंपळनेर रस्तावर मांगीतुंगी मार्गे भिलवड - वडाखेळ गाठले. वाटेत सूर्योदय झाला, एका बाजूला लाल भडक सूर्य वर येत होता तर दुसरीकडे चंद्र आपली शिफ्ट संपवत होता. वडाखेळ इथे थोड उदरभरण करून आम्ही पाताळवाडी गाव गाठलं, हेच न्हावीगडाच्या पायथ्याचे गाव. तसा रस्ता आहे इथे पोहोचायला पण फक्त नावापुरता, बाईकच टायर परत एकदा बसलं होतं.
पाताळवाडीच्या मागे, न्हावीगड दिमाखात उभा आहे. पायवाटेबद्दल थोडी माहिती घेतली, एका घरात हेल्मेट ठवले आणि ९च्या दरम्यान ट्रेक सुरू केला. गड दक्षिण-उत्तर पसरलेला आहे आणि वाट गडाच्या उत्तर सोंडेवरून जाते. या वाटेने चढाई सुरू केली, पठारावर एक वाघदेवाचं ठाणं लागलं. एका लाकडी पट्टीवर वाघ, चंद्र, सुर्य कोरलेले दिसतात बाजूला एक शेंदूरी दगड आहे. इथून उत्तरेकडे उभी वाट चढायला लागलो. डाव्या हाताला चालत एका ठिकाणी झाडावर झेंडा लावलेला दिसतो. या झेंड्याच्या दिशेने चालत गेलो. इथे पाण्याची ३ सुकलेली टाकी आहेत पैकी मधल्या टाकीच्या दगडी भिंतीवर सप्तश्रृंगी मातेची मूर्ती कोरलेली आहे. इथून पुढे थोडं वर चढून गेल्यावर आजून दोन पाण्याची टाकी आहेत, वापरात नसल्याने जलपर्णीने भरून गेलेली. पुढे डाव्या हाताला एक वाट वर जाताना दिसली पण ती एकदम उभी आणि खूपच निसरडी झालेली होती. जवळपास २० मिनिट आम्ही एक उभा टप्पा पार करण्याचा प्रयत्नात घालवली पण कातळावर साचलेल्या निसरड्या मातीमुळे आणि खालच्या खोल दारीमुळे रिस्क न घेता दुसरी वाट शोधण्याचा निर्णय घेतला. परत फिरून सप्तश्रृंगीच्या मूर्तीपाशी आलो आणि उजवीकडे डोंगराच्या सोंडेवर वाट शोधायला लागलो. एक बर्यापैकी मळलेली वाट पायाखाली आली. या वाटेने पुन्हा डोंगर उजविजडे आणि दरी डावीकडे ठेऊन चालत गेल्यावर आजून ४ पाण्याची टाकी लागतात, त्यात एक खांबटाक आहे. इथून वर गडाचे बुरुज दिसत असतात आणि पायवाट दोन बुरुजांच्या मधून वर जाते. पुढे आजून दोन टाकी आहेत पण पाणि शेवाळे जमून हिरवे झाले आहे. पुढे आजून एका खांबटाक्याजवळुन कातळात खोदलेल्या पायऱ्यांची वाट सुरू होते. ही वाट उभी चढून गेल्यावर आजून दोन खांबटाकी आहेत. इथून खाली जी वाट आम्ही सोडली होती तिचा रिस्कीनेस दिसत होता, खालून दिसणाऱ्या बुरुजावर होतो आम्ही आता. उजवीकडे वळून डोंगरसोंडेवरून चालून गेल्यावर पुन्हा पायऱ्या लागतात. या पायऱ्या खूपच उभ्या आहेत आणि मातीमुळे निसरड्या झाल्या होत्या. खूप सांभाळून चढाव लागलं आम्हाला. चढताना एकचं डोक्यात होतं; उतरताना काय होणार ?
२० मिनिटांच्या खड्या चढाईनंतर आम्ही गडमाथ्यावर पोहोचलो. माथा तसा लहानच आहे, सुरुवातीला कातळात खोदलेले मोठं टाक लागलं, हे तीन लहान भागांमध्ये विभगलेलं आहे. पाणि वाहून न्यायला चर पण खोदली आहे काठावर. पुढे एका वाड्याचं जोत आहे, त्यामागे आजून एक पाण्याचं टाकं आणि आजून काही चौथरे आहेत. समोर किल्ल्याच्या दक्षिण टोकावर एक सुळका आहे या सुळक्याच्या डाव्या बाजुला आजून दोन पाण्याची टाकी आहेत. इथेच वर सुळक्यात नेढे आहे पण ते पाहण्यासाठी रोप कॅयमिंग करावी लागते. माथ्यावरून आजूबाजूचा परिसर इथे आल्याच चीझ करून देतो. पूर्वेला तांबोळ्या आणि मांगीतुंगी आणि दक्षिणेकडे डोलबरी रांगेचे शिलेदार म्हणजेच मुल्हेर, मोरा, हरगड, साल्हेर, सालोटा.
गडफेरी पूर्ण करायला अर्धा तास पुरला आणि आम्ही परत फिरलो. उतरताना निसरडे कातळ आणि पायऱ्या खूप सांभाळून उतरल्यात. १ वाजता ट्रेक संपवून बाईक वर सवार झालो आम्ही. पंचर टायर रीपेर करायला हायवे वर यावं लागलं. गाडीने साथ दिली आणि आम्ही ७ च्या दरम्यान घरी पोहोचलो.
हा गड तसा नावाजलेला नाही आणि त्यात कठीण त्यामुळे काही मोजकेच आमच्यासारखे इथे फिरकतात. मुख्य सुळक्यावर जाणारी वाट निमुळती आणि निसरडी असल्यामुळे आम्ही तो नाद सोडून दिला होता. या राकट सह्याद्रीत नाद फक्त निसर्गाचा चालतो आपण फक्त फिरस्ते बनून यायचं, झेपेल, जमेल तेवढ घ्यायचं आणि परत फिरायचं.
- वैभव आणि सचिन.
Comments
Post a Comment