स्वराज्यतोरण..पुन्हा एकदा अंधुक (Trek to Torna Fort)

४ - ४.३० वाजले होते; बुधला माचीच्या मागे, सोंडेवरच डॉक्टरचा पाय मुरगळला. आधीच डॉक्टर डाऊन झाली होती आणि त्यात पाय मुरगळला; नाहीच जमणार म्हणत होती. मंदिरात तिचं मोरल बुस्टिंग सेशन झालं, आमच्यातल्या काही डॉक्टरांकडून; अंधार पण पडायला लागला होता. 

ठरलं, काहींना घेऊन सचिन पुढे गेला, गाडी मिळाली तर अरेंज करायला, कारण कमिटमेंट होती; घेवून आलेल्या ग्रुपसाठी, रात्री मुंबईत पोहचवायाची.
आम्ही काही मोजकेच म्हणायला जरा धष्टपुष्ठ गडी डॉक्टर बरोबर तिच्या स्पीडने चालत राहिलो अंधारात लहान टॉर्चच्या उजेडात. नीटसं आठवत नाही आता, पण एका काठीवर, सिटिंग स्ट्रेचरवर डॉक्टरना बसवून, आम्ही दोघे-दोघे खांदे बदलत वेल्हे गाठलं.
राहिला किल्ला पहायचा !

२०१०, दोन दिवसांचा ट्रेक, राजगड-तोरणा. रात्री राजगडावर, ऋषीच्या हातचा मस्त खिचडीभात, नंतर आमचं सगळ्यांचं बे-सुगम संगीत झालं. सकाळी संजीवनी माची आणि गडाची सोंड पकडून तोरणा करून, वेल्हातुन ७-७.३० ची एसटी पकडून ट्रेक संपवायचा होता, पण नाही झालं ठरल्याप्रमाणे.

२०१२, तोरणा ते रायगड, ट्रेक ठरला. अंधार पडायच्या आत लिंगणाच्या माचीवर पोहचायच होतं आणि  बोराट्याची नाळ खूप वेळ घेईल म्हणून मग घाई केली आणि पुन्हा वेळेअभावी तोरणा मनासारखा पहायचा राहून गेला.




दोन्ही वेळेला, रेंज ट्रेक मध्ये घेतला आणि किल्ला बघायचाच राहून गेला; म्हणून या वेळेस खास आणि फक्त तोरणाचा बेत केला पण पुन्हा गणित चुकलं. पावसाने घात केला. धुक्यात अंधुक, दिसेल तेवढा तोरणा पाहून मागे फिरावं लागलं.

पावसाला सुरवात झाली आणि आम्हला ओळखणारे लोकं विचारायला लागतात; 'ट्रेक वैगेरे बंद केले की काय?' आणि सध्या तसंच काहीतरी झालंय आमचं. बिझी शेड्युल मुळे ट्रेकचा मंथली रेशो डाउनवर्ड ट्रेंड घेऊन ३:१ वर आला आहे; जो बिफोर करोना १:१ होता. म्हणून मग आमची स्टेटजि (न केलेले किल्ले करण्याची) थोडी रिलॅक्स करून ट्रॅडिशनल अँप्रोच घेऊन 'तोरणा' फिक्स केला. अगोदरच मनामध्ये राहिलेला आणि १०-१२ वर्षांपूर्वी थोडाफार पाहिलेला किल्ला आता मात्र खूप बदललाय! 

पुण्यातला तोरणा, एका दिवसात उरकायचा होता म्हणून मग पद्धतशीर प्लॅनिंग केली. रात्री कल्याणवरुन ट्रेन रिझरव्हशन करून ठेवल होत. पुण्यात जवळच्या नातेवाईकांनाकडून बाईक उसनी मागितली होती. ट्रेनने रात्री १.३० च्या दरम्यान पुणं गाठलं आणि आमच्या हैंसेपोटी, नातेवायकांची झोप खराब केली. पुण्यावरून कात्रज घाटातून, नसरापूर फाट्यावरून 'वेल्हे' ह्या पायथ्याच्या गावी पोहोचलो. वेल्हे फार बदललं होतं आणि रात्रीच्या अंधारात आम्हाला आठवत असलेले एकमेव हॉटेल आणि मंदिर काही दिसलं नाही. दरम्यान रात्री बाईकवर, २ तास पावसाने आम्हाला खूप झोडपलं आणि त्यात आम्ही झोपण्याच सामान विसरलो होतो. वेल्हे पोलीस चौकीच्या थोडं मागे एका बेकरीच्या दारात दोन खुर्च्या जणू आमच्यासाठीच ठेवल्या होत्या, तिथे टेकलो पण भिजलेले कपडे, पाऊस आणि गार हवा यामुळे काही डोळा लागला नाही. ६.३०च्या दरम्यान पुन्हा बाइक काढली आणि थोडंच पुढे ते हॉटेल दिसलं, मागेच मंदिरात आरतीची सुरू होती. हॉटेलात चहा टाकला आणि जरा थंडी आवरली आमची. 
"बाईक कुठपर्यंत जाते?" चहा घेत काकांना विचारलं. 
"चांगली दोन टेकाड पार जाते." काकांच उत्तर. 
चांगला सिमेंटचा रस्ता, २-१ किमीचा, पार्किंगची सोय, हॉटेल, सगळं एकदम सोईस्कर झालं आहे आता. पण या सोईमुळे; सुरवातीला दम काढून छातीचा भाता करणारी चढाई गमावली आहे आमच्यासारख्या जून ट्रेकर्सनी. या सोयीने, जवळपास ४५ मी ते १ तास वेळ वाचवला. १-२ कटाळटप्पे सोडले तर हा ट्रेक आता सोप्या श्रेणीत आला आहे. पूर्ण वाटेवर रेलिंग्ज लावून मजा घालवली आहे या ट्रेकची आता. 
ट्रेक चालू केला, आम्ही पावसात आणि किल्ला धुक्यात भाजलेला होता. थोडं चालून पहिल्या टेकडीवर आल्यावर मागे ऊन पावसाचा खेळ पाहण्यात थोडा वेळ घालवला. डोंगराच्या एका बाजूला पाऊस आणि ढगांचा नाच चालू होता तर दुसऱ्या बाजूला नदीच्या पाण्यावर ऊनं उघडली होती. पुढे काही ठिकाणी कातळात खोबणी करून पायऱ्या केल्या आहेत. पुढे गडाच्या पहील्या प्रवेशद्वाराअगोदार एक सुंदर धबधबा तयार झाला आहे. पावसाळी ट्रेकमध्ये असा निसर्ग पाहणं आणि अनुभवणं हेच खरं सुख असतं. म्हटलं जाताना डुंबू यात आणि निघालो पुढे. किल्ल्याचा पहिला दरवाजा लागला, 'बिन्नी' दरवाजा. दरवाज्याला लागून चांगल्या आणि कठीण पायऱ्या होत्या आता त्यांना रेलिंगची वेसण घातली आहे. दरवाज्याचे आणि गडाचे दगडुजीचे काम चालू आहे म्हणून हा दरवाजा आणि बुरुज अगदी नवीन वाटतं होते. पाऊसाची रिपरिप आजूनही चालू होती आणि ढगात-धुक्यात १० फुटावरही काही दिसत नव्हतं. आम्ही डाव्या बाजूने तटबंदीवरुन दिसेल तेवढा गड पहायला सुरवात केली. तटबंदी आणि बुरुज आजून बऱ्यापैकी शाबूत आहेत. हनुमान, भेल, साफेली, मालेचा, फुटका असे अनेक बुरूज आहेत या किल्ल्याला. झुंजार माचीला जाणारी वाट थोडी अवघड आहे. तटाला शिडी लावली आहे इथे, ती आणि एक लहान कातळटप्पा पार करावा लागतो या माचीला जायला. बुधला माचीकडून गडाकडे जाताना कोकण दरवाजा, महार टाके, टकमक बुरुज आणि शिवगंगा, पाताळगंगा हे पाण्याचे टाके दिसतात. याव्यतिरिक्त गडावर कोठी दरवाजा, तोरणजाई देवीचे मंदिर, मेंगाई देवीचे मंदिर, तोरणेश्वर महादेवाचे मंदिर आहे. आम्ही सकाळी ६.३० ला ट्रेक चालू केला तेव्हा कोणीच नव्हते गडावर, एक ग्रुप सोडून जो रात्री किल्ल्यावरच स्टे केला होता. पण उतरायला सुरुवात केली आणि वर जाणारी गर्दी डोळ्यात खुपु लागली. वॉटरफौलवर तर जत्रा लागली होती. काही टोळकी वर चढून आपली आणि खाली भिजणाऱ्यांची लाईफ रिस्क मध्ये टाकत होते. सचिन काळजीपोटी ओरडत होतो; 'अरे उतारा खाली, गरज नाही आहे एवढं करण्याची !!'; मी पण शांतपणे समजावण्याचा प्रयत्न करत होतो की एखादा दगड येईल खाली आणि कोनाचा कपाळमोक्ष होईल; पण ऐकतंय कोण ?

तोरणा, शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेऊन, वयाच्या १६ व्या वर्षी लढून स्वराज्यात सामील केलेला पहिला किल्ला. फार जुना इतिहास आहे या किल्ल्याला. अगदी १४७० साली इथे बहमनी राजवट होती. पुढे निजामशाही नंतर आदिलशाहीच्या ताब्यात होता. १६४७ मध्ये महाराजांनी जिंकला. किल्ल्याच्या नावबाबत दोन आख्यायिका आहेत, राजांनी हा गड जिंकून हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून किंवा या गडावर तोरण जातीची खूप झाडं आहेत म्हणून 'तोरणा'. पहिली आख्यायिका मनाला पटते कारण या गडावर मिळालेल्या खजिन्यातून राजांनी समोरच्या मुरूमदेवच्या डोंगरावर 'राजगड' उभा केला, हीच स्वराज्याची पहिली राजधानी. पुरंदरच्या तहात हा किल्ला महाराज्यांकडे राहिला. आग्र्याच्या सुटकेनंतर राजांनी अनेक गडांचा जीर्णोद्धार केला तेव्हा पाच हजार होन या गडावर खर्च केले. संभाजी महाराजांच्या निधनानंतर मोगलांनी हा किल्ला घेतला पण शंकराजी नारायण सचिवांनी पुन्हा स्वराज्यात आणला. पुढे दस्तुरखुद्द औरंगजेबाने वेढा देऊन १७०४ मध्ये पुन्हा जिकला व 'फुतुल्गैब' म्हणजेच 'दैवी विजय' असं नामकरण केलं. औरंगजेबाने लढाई करून जिंकलेला हा एकमेव किल्ला. पुन्हा ४ वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी पुन्हा स्वराज्यात आणला. 

असा गौरवशाली इतिहास असणारा किल्ला. अशा वास्तू म्हणजे आपल्या सांस्कृतिक धरोहर आणि यांच जतन करून पुढच्या पिढीपर्यंत या वारशाची माहिती पोहोचवण्याची जबाबदारी आपलीच आहे. पण बारा-एक वर्षांनी पुन्हा हा किल्ला बघताना आम्हाला हे थोडं कठीण वाटलं.

तोरणाच्या या बिकट गडवाटेवर लावलेले रेलिंग्ज, अगदी पायथ्याशी जाणारे रस्ते अशाने सहज उपलब्धता वाढते पण किंमत कमी होते. एका हातात कर्णकर्कश वाजणारे स्पिकर, दुसऱ्या हातात पाण्याची प्लास्टिक बाटली जी गडावरच कुठेतरी टाकून देणार, अंगावर शिवलेस टीशर्ट, विभस्त नाच, आरडाओरड. बहुतेकशे पुण्याच्या आयटी पार्कमधेल हे हिंदी भाषिक ज्यांना ना शिवाजीराजे माहीत; ना या गड-किल्ल्यांचा इतिहास ! अशी ही गर्दी या किल्ल्यावर येवून यांचे पावित्र्य नष्ट करणार असतील तर ह्या सुविधा आम्हाला बिलकुल नकोत. 

- वैभव आणि सचिन.

युट्युबवर पहा - https://youtu.be/J2J22aAWT98









Comments