रवळ्या-जवळ्या जोडकिल्ले (Trek to Ravlya Javlya)

१० किमीचा वॉर्मअप; ट्रेकच्या आधी; म्हणजे कहरच !

वणी वरून दर अर्ध्या तासाने कळवण साठी बसेस आहेत! सहाच्या दरम्यान ट्रेक सुरू करू आणि दोन्ही एका दिवसात उडवू; संध्याकाळी सहा पर्यंत घरी परत!!

असा मास्टरप्लॅन होता पण...
ठाण्यालाच, सुमारे दीड तास लेट झाली आमची नाशिक एसटी. वणीला पोहचायलाच ६ वाजले आणि कहर म्हणजे बाबापूर-मुळाणे मार्गे कळवण एसटी करोना काळात बंद झाली ती आजून चालू झालीचं नव्हती. एसटीस्टँड बाहेर चहावाल्याने सांगितलं म्हणून मग १ किमीवर वणी बाजारपेठेत जाऊन काही मिळतं का पाहिलं आणि इथे आजून एक सरप्राईज; रस्त्याचं काम चालु होतं आणि लोकल गाड्याही बंद. च्यायला; सगळा प्लॅन बोंबलला !


आता दोन काय एकतरी होईल का याची चर्चा आम्ही करत ११ नंबरच्या बसने (पायी) चालू लागलो. जास्त नाही फक्त १० किमी अंतर आहे बाबापूर खिंडीपर्यंत पण आता ऑप्शन नव्हतं; करो या मरो या धर्तीवर चालता-चालता आम्ही वेळेची गणितं मांडत होतो. मागे जाऊन पुन्हा घरी परतावं; अस पण आलं आमच्या मनात पण तो विचार मागे टाकून चालत राहिलो. दोघांपैकी एक उरकून पठारावर किती वाजता येतो यांवर दुसऱ्याचं काय करायचं ते ठरवू ! गाड्या खूपच कमी आहेत या रस्त्याला, एखादी बाईक दिसत होती अधून मधून, दूध घेऊन वणी बाजारपेठेत जाणारी. बाबापूर कडे जाणारी गाडी नाहीच आली. मुळाने फाट्यावर आलो आणि बाबापूर कडे वळलो. समोर डाव्या बाजूला मार्केण्डेय डोंगर, त्याच्यामागे डोंगरावर वणीचं मंदिर, खिंडीच्या उजव्या बाजूला पठार आणि रवळ्या दिसत होता. या रस्त्यावर एक-दोन टेम्पो मुळाणेकडे जात होते पण हात दाखवूनही थांबले नाहीत, पुढे गेल्यावर पाहिलं आणि कारण कळलं; ड्रायवर सोडला तर पूर्ण टेम्पो भरलेला होता, शेतावर काम करण्यासाठी जाणाऱ्या महिला वर्गाने ! ड्राईवरचा नव्हे तर तो आमच्या एकूण रूपाचा किंवा कुरुपतेचा तो दोष असावा..असो! एकूण काय तर ट्रेक आधी १० किलोमीटरचा २ तासाचा वार्मअप म्हणजे कहरचं  !!

बाबापूर खिंडीत आलो तेव्हा ९ वाजले होते. इथे पुन्हा विचारविनिमय; घड्याळाकडे बघता मार्केण्डेय करून परत फिरावं आणि रवळ्या-जावळ्या पुन्हा कधीतरी प्लॅन करावा असं सचिनचं मत. रेलिंग्जने सजवलेली मार्केडेयाची वाट पाहून माझं विरुद्ध मत पडलं. त्यात या खिंडीत लहानसं दुकान थाटलेल्या आजोबांनी आम्हाला जवान संबोधून, "दोन तासात दोन्ही गड उडवालं" असा जोश भरला. बाबापूर वरून ३ किमीवर या खिंडीत डाव्या हाताला शंकराची मूर्ती आहे ती मार्केण्डेयची बाजू आणि उजव्या हाताला हनुमानाची मूर्ती आहे ती वाट रवळ्या-जवळ्याकडे घेऊन जाते. या वाटेने जवळपास एक तास चालावं लागत, जवळ्या नाकासमोर ठेवून आम्ही चालत होतो पण वाट मळलेली नसल्यामुळे आणि सवयीप्रमाणे चुकलो आणि थोडा अजून वेळ वाया घालवून वाटेला लागलो. समोर जवळ्या दिसत होता. साधारण पाऊण तासात आम्ही गर्द झाडी समोर आलो, समोरच्या गवतावर ३०-१ गुरं चरत होती त्यांची मान आणि शिंग दोन्हीही वर झाली आमची चाहूल लागताच ! एका म्हैशिने तिची शेपुट वर करून पवित्रा घेतला मग आम्हीपण आमची मागे घालून जंगलात रस्ता शोधायला लागलो. त्या दाट जंगलात थोडा वेळ भटकल्यानंतर एक गुराखी भेटला त्याने वाट दाखवली. या वाटेने थोडं पुढं जाऊन खुल्या पठारावर आल्यावर समोर काही थडगी आहेत आणि वस्तीजवळ पाण्याचे दोन दगडी स्रोत ही आहेत. तिवारी वस्ती म्हणजेच दोन-तीन मोठी झापं. इथे दुधापासून खवा बनवला जातो. किल्ल्यावरून हे पठार आणि ही वस्ती बघायला अप्रतिम वाटत, अगदी आपण लहानपणी चित्रात काढायचो तसंच. वस्तीवर काही गाईंचे पाडे आणि काही कुत्रे सोडून कोणीच नव्हतं. जवळ्या करून मग रवळ्या करण्याचं ठरलं.

आम्ही उजव्या बाजूचा डोंगर चढायला सुरुवात केली. वाट दाट माजलेल्या करवीतून उभी चढवत नेते आणि एका कातळकड्याला लागते. या कड्याला एक खप लहान चौकोनी अरुंद पण लांब आत जाणारी गुहा आहे. घळीतून थोडं पुढे आल्यावर एक चिंचोळी घळ लागते. या घळीतून क्लाइम करून आपण किल्ल्याच्या एका लहानश्या पठारावर येतो. इथून रवळ्या आणि मागचा परिसर त्याची खोली डोळ्यात भरून घेण्यासारखीच होती. इथेच किल्ल्याचा लहानसा रॉकप्याच आहे. इथे एक दोर अगोदरच लावलेला होता पण तो फक्त आधार घेण्यासाठीच आहे. इथून आम्ही किल्ल्यावर आलो. किल्ल्यावर पाहण्यासाठी खास काही नाही आहे. एका विस्तीर्ण गडपठारावर काही पाण्याची टाकी आहेत. या गडावरून, वातावरण क्लिअर असेल तर दूरपर्यंतचे गड पहता येतात पण आमचं नशिब आणि नजर फक्त सप्तश्रृंगी गडापर्यंतच होती कारण धुक्याने भरलेला परिसर. वेळ कमी असल्याने जवळपास धावतच आम्ही खाली उतरलो. तसं बघायला गेलं तर सकाळी सहापासून आम्ही धावतच होतो. आणलेली अंडी, फळ सुद्धा आम्ही गड उतरताना खात होतो.
रवळ्या राहिला होता आणि दुपार झाली होती पण पुन्हा या एका गडासाठी एवढा प्रवास करून येण्यापेक्षा घरी थोड्या शिव्या खाव्या लागल्या तरी चालेल अस ठरलं.

पुन्हा तिवारी वस्तीवर येऊन आम्ही रवळ्याकडे वळलो. तिवारी वस्तीच्या समोरून एक वाट फिरून रवळ्यावर घेऊन जाते. वस्तीतल्या काही काकू वाटेत सरपणासाठी राबताना दिसल्या त्यांना वाट विचारून आम्ही चालत राहिलो. गडाला उजव्या बाजूला ठेवून, एक लाकडी गेट पार करून आम्ही जंगलात चढायला सुरुवात केली. एक अस्सल जनावर अगदी पायाजवळून सरसरत कड्यात गायब झालं. थोडं चढून गेल्यावर आपण किल्ल्याच्या कातळाला लागतो. एक पाण्याचं टाकं लागत इथून उजवीकडून कातळात खोदलेल्या पण आता पुर्ण नष्ट केलल्या पायऱ्या लागतात. या सांभाळून चढून जाऊन आम्ही या गडाच्या खऱ्या वैशिष्ट्य असलेल्या कातळात खोदलेल्या प्रवेशद्वारापाशी आलो. हा दरवाजा कातळात एका लहानश्या चौकोनी आकारात खोदला आहे. उजव्या बाजूला फारशी भाषेत एक शिलालेख कोरलेला आहे. या दरवाज्यातून आत गेल्यावर वर जाणारी एक वाट गडाच्या माथ्यावर घेऊन जाते तर डावीकडील वाट गुफेकडे घेऊन जाते त्यात आता पाणि साठलं आहे. वर जाणारी वाट गडाच्या माथ्यावर घेऊन जाते. इथे पण बघण्यासाठी फक्त काही पाण्याची टाकी आहेत. गडावरून धोडप पासून इंद्राइ पर्यंतचे किल्ले दिसतात पण आज ते धुक्यात झाकले गेले होते.

किल्ल्याच्या पठारावरून खाली मुळाने (कळवण) बाजूचे जांभूळपाडा गाव दिसत होतं. ३ वाजले होते, परत बाबापूर खिंडीत जायला ५ वाजणार होते आणि तिकडून वणी किंवा नाशिक गाठण्यासाठी लोकल ट्रान्सपोर्टचा सकाळचा अनुभव बघता मुळाने गाव गाठाव अस ठरलं पण वाट मध्येमध्ये पुसट दिसत होती म्हणून मग भटकण्याची भीती होती आणि ४ च्या दरम्यानचं अंधार होणार हे दिसत होतं  म्हणून रिस्क नको पुन्हा आली वाट पकडली. इथे आमचं नशीब थोडं जोरावर होत म्हणून पठारावर आम्हाला गुरांच्या बॅकग्राऊंड मध्ये गवतावर झोपून असलेला 'कृष्णा गावित' भेटला. त्याने आम्हाला जांभुळपाड्याच्या वाटेला लावलं. इथून दर एक तासाने कळवणसाठी बसेस आहेत मग काय आम्ही ४ च्या बसचं टार्गेट आम्ही घेतलं. बाळू आमच्याबरोबर एका टेकडपर्यंत आला आणि इथून तुम्हाला वाट दाखवतो म्हणाला. वाट मळलेली पण लांब आहे ही. पुन्हा आमची मॅरेथॉन सुरू झाली आणि नॉनस्टॉप १ तास धावत आम्ही ती उभी उतरण पार केली तरीही आमच्या नजरेसमोरून १० मिनीट अगोदरच गेली मग आम्ही पुन्हा त्याच रस्त्यावर बसून पुढच्या बसची वाट बघू लागलो. इथे मागेच एका डोंगरावर स्पस्ट तटबंदी दिसत होती. गावातल्या लोकांना नाव विचारलं तर ते 'पांढऱ्या' म्हणाले, खरं नाव अजुनही माहीत नाही आम्हाला, शोधू आणि पुन्हा येऊ पहायला ठरलं. आम्ही येणाऱ्या गाड्यांना हात दाखवत उभे होतो एक लहान टेम्पो थांबला आणि मागे बसून आम्ही निघालो. अश्या प्रवासात उगाच गाणी गाण्याची आमची जुनी सवय, आज गाणं होत, 'तुम्हावर केली मी मर्जी बहाल नका सोडून जाऊ रंग महाल' !! उगाचंच !! कळवण वरून एसटीने नाशिक तिथुन टॅक्सीने कसाऱ्याला येऊन ९.२०ची ट्रेन पकडुन १२ ला डोंबिवली गाठली.

रवळ्या-जवळ्या हे सातमाळ डोंगररांगेतील जोडकिल्ले, एकाच पठारावरील डोंगरावर हे किल्ले वसलेले आहेत.  रोला-जोला असं इतिहासातील नाव. १६३६ मध्ये अलवर्दीखानाने शहाजहानसाठी जिंकून घेतलेला, पुढे १६७० मध्ये शिवाजीराजांनी घेतला. १६७१ मध्ये दिलेरखानाने किल्ल्याला वेढा दिला पण तो मराठयांनी मोडून काढला. पुढे महाबतखानाने हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला, पेशव्यांनी पुन्हा जिंकला. १८१९ मध्ये कॅप्टन ब्रिग्ज या इंग्रज अधिकाऱ्याने इतर किल्ल्याप्रमाणे ह्या किल्ल्याच्या पायऱ्या देखील तोफा लावून उडवून दिल्या.

सहसा हे दोन्ही किल्ले एका दिवसाच्या मुक्कामात करता येतात पण खाजगी वाहनाने एका दिवसतही करू शकतो थोडं स्ट्रेच केलं तर. अनेक ढोरवाटा आहेत या गडांना म्हणून वेळेत पूर्ण करण्यासाठी गाईड घेऊन जाणं बर पडेल. तुम्ही 'कृष्णा गावित (मोबा 07030228430 ) यांना कनेक्ट करू शकता.

आमचं नशीब थोडं खराब होत म्हणून वातावरण धुकट होतं नाहीतर सातमाळा रांगेतील बहुतेक सगळे उंच सुळके दिसतात. आम्ही फक्त मार्कनडेय, सप्तशृंगी, धोडप हेच किल्ले पाहू शकलो. पण या गडांच्या उंचीची मजा काही औरच !!

- वैभव आणि सचिन.








Comments