किल्ले कुंजरगड सफर (Trek to Kunjargad)
आपल्या आयुष्यात काही गोष्टी आपण कमवतो तर काही आपल्याला फक्त नशिबाने मिळतातं आणि त्यात आपलं काहीच कर्तृत्व नसतं. आशा गोष्टींचा दुर्दम्य अभिमान बाळगावा असं मला स्वतःला तरी वाटत नाही. आपला जन्म हा यांपैकीच एक; पण तरीही तो महाराष्ट्रात झाला आणि तोही मराठी म्हणून, हे एकचं मी माझे अहोभाग्य समजतो.
स्वराज्य कसे मिळवावे, त्याचं सुराज्य कसे करावे याचा प्रत्यय देणारा एकमेव राजा छत्रपती इथे, या मातीतचं झाला आणि आपण त्यांचेच अनुयायी आहोत.
इथला सह्याद्री आणि त्यावरचे गडकिल्ले हे फक्त दगड-मातीच्या इमारतींचे अवशेष नसून, ते राज्यांच्या पदस्पर्शाने आणि त्यांच्या मावळ्यांच्या शौर्याने, त्यागाने पवित्र झालेले यज्ञकुंडच आहेत. म्हणूनच हे गड किल्ले म्हणजे पर्यटनक्षेत्र नसून रणक्षेत्र आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेऊन या किल्ल्याचे जतन आणि संगोपन आपण केले पाहिजे.
कुंजरगड! लोहगडासारखा विंचूकाटा आहे या गडाला; पण या काट्यावर लोखंडी रेलिंगची तोरण लावून त्याची पार लया घालवलीय आता! तटबंदी बर्यापैकी शिल्लक आहे, यावर, दोन-तीन दगड लावून डागडुजी करून गडाचं गडपण राखून ठेवता आलं असतं पण...असो..१६७० मध्ये राजे दिंडोरीची लढाई लढून इथे आले होते. गडावर मावळ्यांची मलमपट्टी आणि विश्रांती झाली होती.
कल्याण मुरबाड मार्गे माळशेज घाट ओलांडल्यावर एक डोंगरावर सतत अंगावर येत असते, बालाघाट डोंगररांग. हरिशचंद्रगडापासून सुरु होणारी ही रांग बीड जिल्हापर्यंत जाऊन संपते. पुणे आणि अहमदनगर जिल्हाची सीमा माळशेज घाटात हीच डोंगररांग ठरवते. हा किल्लाही तसाच जवळपास दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवर आहे पण नकाशावर तो अहमदनगरच्या अकोले तालुक्यात येतो. हरिशचंद्राच्या मागच्या बाजूस असणाऱ्या या डोंगररांगेत कलाडगड, दोन भैरव (कोलथे आणि शिरपुंजे), कुंजरगड इत्यादी किल्ले येतात. बाकी सर्व किल्ले पाहून झाले होते, कुंजर सोडून म्हणून मग ही रेंज पूर्ण करण्यासाठी आम्ही दिवाळी संपण्याची वाट पाहत होतो.'
कुंज' म्हणजे हत्ती, पायथ्याच्या विहीर गावातून हत्तीसारखा दिसतो म्हणून 'कुंजरगड' हे नाव. कोंबडकिल्ला हे या गडाचं इकडंच स्थानिक नाव.
'कुंजर' आडवाटेवर असणारा दुलक्षित किल्ला म्हणून मग, सायटिका या माझ्या पाठीशी लागलेल्या आजाराला थोडी बगल देऊन पुन्हा आमच्या दोनचाकी घोड्यावर टांग मारली. जुन्या शेड्युलप्रमाणे भल्या पहाटे सकाळी ४ ला निघून मुरबाड-माळशेज घाट मार्गे खुबी फाट्याच्या थोड्या अलीकडे पहिला ब्रेक घेतला तेव्हा ६ वाजले होते. डोंबिवलीपासून आतापर्यंत अपेक्षित थंडी काही जाणवत नव्हती तरी प्रथेप्रमाणे कटिंग मारून पुन्हा दोन तासाचा प्रवास सूरु केला. त्या उफळत्या चहा बरोबर समोरच्या डोंगररांगेतून उगवत्या सूर्याचं देखणं रूप...अहाहा...दिन बन गया!! पुन्हा बाईकवर बसलो आणि आणि थोडा गारवा जाणवायला लागला, हाच अनुभवण्यासाठी आमच्यासारखे अनेक फिरस्ते निघतात या सिजनमध्ये. पुढे ओतूर गाठायचा अगोदर 'उदापुर' जवळून एक फाटा 'फोपसंडी' साठी जातो. कुंजरगडावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत एक विहीर गावातून तर दुसरी फोपसंडी मधून, आम्ही दुसरी वाट निवडली. उदापुर मार्गे अनेक लहान डोंगरी गावांतून वाट फोपसंडिला जाते. रस्ता अतिशय खराब, कोपरे गावातून पुढे तर कच्चा आणि खडतर रस्ता आहे. त्या निमित्ताने आमची ऑफरोड बायकिंगची हौस पण पूर्ण झाली ट्रेकिंग बरोबर. या वाटेवर अनेक धबधबे आहेत आणि तेच बघण्याचा मोहापायी मी सचिनला या वाटेने जाण्याचा आग्रह केला होता पण थोडं लेट झालो आम्ही आणि फक्त डोंगर-दऱ्या पहिल्या मिळाल्या.
फोपसंडी गावातून ट्रेक सोपा आणि लहान आहे साधारण १ ते १.३० तासांचा. गावात बाईक पार्क करून आम्ही गडाची वाट धरली. गावातून गाद दिसत नाही तो एका टेकडाच्या मागे आहे. भाताच्या, वालाच्या मळ्यांतून आणि उतारावर लावलेल्या नाचणीतून वाट काढत आम्ही पुढे जात होतो. आणि समोरच्या डोंगरावर किल्ल्याच्या बुरुजाची तटबंदी स्पष्टपणे दिसायला लागली. वाटेत एका झापात एक कुटुंब विसावल होतं, घराची म्हातारी ऊन खात बसली होती. लहान चिऊ आणि एक दादा मचाणाला बांधलेल्या झोक्याला झुलत होते, घरचा मोठा दादा समोरच्या डोंगरावर गुरं घेऊन गेला होता. आमचा आवाज ऐकुन घराचा कर्ता पण बाहेर आला. गडाची तटबंदी समोर दिसत होती पण आमच्या माहितीप्रमाणे वाट फिरुन जात होती. वेळ वाचवा म्हणून तटबंदीला लागून असणारा कातळटप्पा चढून जाता येईल का याची चौकशी केली. थोडं आढवेढ घेऊन आणि आमच्याकडे निरखून पाहून म्हणाला, हाय, पण जरा अवघड हाय, जमेल वाटत तूम्हाला. मग काय, ती तटबंदी नजरेसमोर ठेवून आम्ही चालू लागलो. तटावर पोहोचल्यावर इशारा द्या, असे बजावले या बाजीप्रभूने आम्हला आणि त्या झापाच्या दारातून वर पोहोचेपर्यंत तो आम्हाला पाहत आणि आवाज देत होता. इथून एक टेकडी पार करून आम्ही एका पठारावर आलो इथे संपुर्ण भारतभर दिसणारे असे कॉमन दृश्य दिसले, एका झाडाखाली एक थडगे होते आणि त्यावर भगवा झेंडा लावलेला होता. या पठारावरून उजवीकडून वाट फिरून गडाच्या प्रवेशद्वारापाशी जाते पण आम्ही काही सरळमार्गी नव्हतो. समोरची लहानशी चढण पार करुन तटाला लागून असलेल्या कातळाला लागलो. सचिनने सुरवात केली आणि सहज पार केला, मागून मी तो लहानसा कातळटप्पा पार केला. खालून दिसणाऱ्या त्या तटबंदीला पोहोचलो. ही गडाची डावी बाजू, याच तटबंदीला पाणि वाहून जाण्यासाठी एक नलिका बनवली आहे. वर तटबंदीवर पोहोचताच त्या बजीप्रभुची आरोळी आम्हाला आली तिला हुंकार देऊन आम्ही आमची गडफेरी सूरु केली.
तटबंदीवरुन वर जाऊन आम्ही डाव्या बाजूने फिरायला सुरवात केली. तटबंदीच्या जवळच दोन बर्यापैकी मोठी पाण्याची टाकी आहेत. यांची रचना एका मागे एक आहे जेणेकरून एक टाक भरलं की पाणि दुसऱ्या टाक्यात जाईल आणि ते भरलं की तटबंदीला केलेल्या निचऱ्यातून बाहेर. पुढे समारोच्या डोंगराच्या आणि गडाच्या दरीमूळे किल्ल्याची खरी उंची कळत होती. पुढे ३ टाक्यांचा एक समूह लागतो. यालाच लागून मागे वाड्याचे काही अवशेष आहेत. हे वाड्याचे अवशेष पाहून पुढे आल्यावर आपण गडाच्या माचीवर पोहचतो. लोहगडाच्या विंचूकाट्या सारखी गडावरून दूर जाणारी माची आहे या गडाला. वाड्याच्या प्रवेशद्वारातुन बाहेर आल्यावर आजच्या बाजूला शंकराची पिंड, नंदी नुकतेच वसवले आहेत. या मंदिराच्या उजव्या बाजूला लागूनच दोन पाण्याची टाकी आहेत आणि डाव्या बाजूला पुढे पाण्याचं अजून एक टाक आहे. टाक्याला व्यवस्थित पायऱ्या कोरलेल्या आहेत. इथून पुढे माचीवर एका वाड्याचे अवशेष आहेत आणि त्यात एक मारुतीची मूर्ती आहेत. हा मारुती मस्त मिशी बाळगून आहे चेहऱ्यावर. पुढे या माचीच्या टोकापर्यंत जाऊन आलो. मध्ये आजून दोन पाण्याची टाकी आहेत माचीवर. एका टाक्याला तर भुयारी मार्गासारखे चौकोनी भुयार केले आहे, आत वाकून पाहिलं तर आत बऱ्यापैकी पाणि होतं, पाण्याचे बाष्पीभवन टाळण्यासाठी दगडाच्या आत टाकं खोदल असावं बहुतेक. लोखंडी रेलिंगने हीचा कणखरपणा बोथट केल्यासारखा वाटला. या माचीवरून डाव्या बाजूला मागे हरिशचंद्राची रांग, तारामती सुळका, त्याच्या पुढे, कलाड, भैरव अगदी स्पस्ट दिसत होते. पायथ्याचे विहीर गाव एका लहानश्याया वस्तीसारखे दिसत होते. मागे वळून आम्ही गडाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आलो. प्रवेशद्वाराचे अवशेष असे काही उरले नाही आहेत पण काही दगडी पायऱ्या आहेत इथे. दोन्ही गावांतून, फोपसंडी आणि विहीर, येणाऱ्या वाटा इथे येऊन मिळतात. याच वाटेवर दोन मोठया नैसर्गिक गुहा आहेत. आजून थोडं पुढे जाऊन या किल्ल्याच वैशिष्ट्य असलेली गुहा आहे, डोंगराच्या आरपार खोदलेली ही गुहा एका बाजूला विहीर आणि दुसऱ्या बाजूला फोपसंडी गावाकडे लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आली असावी. सचिनने प्रयत्न केला पण माझ्या शरीरयष्टीमुळे मला तोही करता आला नाही. खुपच अरुंद आहे ही, जवळजवळ सरपटत जावं लागतं. गुहेत अजुनही पाणि साठलेलं होत आणि त्या अरुंद बोळात पुढे चिखलही होता म्हणुन मग सचिनही मागे फिरला. गडफेरी पूर्ण करून आम्ही पुन्हा फोपसंडी गावाच्या वाटेला लागलो. वाटेत पुन्हा ते काका भेटले, गुरं राखताना, न पाहता आलेल्या गुहेच्या बद्दल विचारपूस केली आणि तेच उत्तर मिळालं, अर्ध्यापर्यंत सरपटत किंवा ओणव्याने जावं लागतं. पुढे एका ठिकाणी अंग तिरप करून कुशीवर सरकाव लागतं आणि मग आपण विहीर गावाच्या बाजूला बाहेर निघतो. माझ्याकडे पुन्हा पाहून काका म्हणाले, 'ह्यांना नसतं जमलं !!'....सचिन तर आपला एव्हरग्रीन आणि सडपातळ बांधा म्हणून माझा आदर्श आहेचं पण साला अश्यावेळी थोडी जळतेच !! फोपसंडी गावातून साधारण एकला निघून ६च्या दरम्यान आम्ही घरी परतलो.
कुंजरगड, पाण्याच्या टाक्यांचा किल्ला. जवळपास १० टाकी आहेत या किल्ल्यावर. तटबंदी, बुरुजही अजून बऱ्यापैकी शाबूत आहेत. गडांची उंची आणि उंचीवरचे गड कसे असतात, कसे राखले जायचे हे पाहायचं असेल तर वाट वाकडी करून जरूर पहावा असा एक किल्ला !!
खूप छान माहिती
ReplyDeleteधन्यवाद...
ReplyDelete