सप्तेश्वर आणि सोमेश्वर... आपलं कोकण (Sapteshwar and Someshwar, places to visit near Sangmeshwar)
- हे कधी बांधलेले आहे?
- काय म्हायती रे बावा, मी पन या गावात सासरवासीन आलेली हाय
मंदिरात कुठलातरी औषधी पाला शोदायला आलेल्या पंचाहत्तरीच्या जवळपासच्या आजीने दिलेलं हे उत्तर. आम्ही दोघेही इथले 'माहेरवासीन' असूनसुद्धा आम्हाला कुठे माहीत होतं. माझं मूळ गाव तर इथून फक्त वीस-एक किलोमीटरवर आहे, कॉलेजपर्यंत सगळी उन्हाळ्याची सुट्टी याच गावात घालवली आहे मी, तालुका पण तोच, या रस्तावरून जवळपास हजार एकवेळा येजा केली असेल; तरीही नावसुद्धा ऐकलं नव्हत या सुंदर ठिकाणांचं...सप्तेश्वर आणि सोमेश्वर!
मुंबईचा चाकरमानी गणपतीसाठी कोकणात कसातरी पोहोचतोच. मुंबई-गोवा हायवेची चांद्रमोहिम, चतुर्थीच्या आदल्या दिवशीच्या टेरिफिक ट्राफिक प्रवासाचा अनुभव आणि न मिळणाऱ्या सुट्टीच्या कारणास्तव, शनिवारी प्रवास केला. रविवार जरा सार्थकी लावावा म्हणून जवळची ठिकाण शोधत होतो तेव्हा या दोन ठिकाणांची महिती मिळाली. तीन-एक किमी ऑफरोड असल्यामुळे बाईक घेऊन येण्यासाठी भूषण यांना आग्रह केला आणि निघालो.
शास्त्री पूल पार करून संगमेश्वरकडे जाताना, मुळये हॉस्पिटलच्या विरुध्द दिशेला एक कच्चा रस्ता जाताना दिसतो. हाच उभ्या चढणीचा, कच्चा-पक्का, वेडा-वाकडा ३ किमीचा रस्ता एका ओढ्यापाशी दुभंगतो. दुतर्फा गर्द झाडीने इंटर दि जंगल झाल्यावर, डावीकडे सप्तेश्वर आणि उजवीकडचा देवपाट वस्तीकडे जातो. ओढ्याच्या शेजारीच जांभ्या दगडाच्या कुंपणामध्ये हे मंदिर वसवलेले आहे. आत प्रवेश केल्यावर प्रथम मंदिर लागतं. मंदिर आणि सभामंडप बऱ्यापैकी मोठं आहे. सभामंडपात नंदी आणि जुना गणपती दारावर आहे. आतली शंकराची पिंड तीच्या पुरणतेची जाणीव करून जाते. लिंग नव्हतं पिंडीवर. बाहेर लिंगाच्या आकाराचं तांब्याचं पात्र होत बहुतेक हेच लिंग असावं. मंदिराच्या उजव्या बाजूला वैजनाथाच लहानसं मंदिर आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला सात कमानी आहेत, याच समोर दोन कुंड आहेत. जांभ्या दगडात चुन्याचा वापर करून ही सुंदर वास्तू उभारली आहे. सहसा गड-किल्ल्यांवर दिसणारं, चुन्याचं घाण्याचा चाक पहिल्यांदाच एका मंदिराच्या प्रांगणात पाहिलं मी. या कामानीचं बांधकाम मला सातवाहन काळातील वाटलं, प्रत्येक कमानीवर शरभशिल्प आणि कमळपुष्प कोरलेलं आहे अगदी गडांच्या प्रवेशद्वारावर असतात तशी. दोन बाजूच्या कमानी मोठया आणि मधल्या पाच आकाराने लहान आहेत. कमानीच्या आतमध्ये जाऊन पाहिलं की जलव्यवस्थापनाचं उत्कृष्ठ उदाहरण पाहता येत. या सातही कमानीच्या मागे सात पाण्याचे झरे अगदी एका रांगेत बांधले आहेत. एकमेकांना विशिष्ठ पध्दतीने जोडलेल्या आयताकृती जलवाहिन्यांनमधून पाणि मधल्या कामानीमध्ये येत आणि इथून कुंडात गोमुखातून प्रवाहित होत. डोंगरात झिरपनाऱ्या सात झऱ्यांना एकत्र आणणारा म्हणून तो 'सप्तेश्वर' ! हे ठिकाण म्हणजे स्थापत्यकलेचा उत्तम नमुना. या कुंडाचे पाणि बारमाही असते. मंदिराच्या समोरून एक ओढा खाली गावांमध्ये जातो. याच डोंगरात अलकनंदा नदीचा उगम आहे कुठंतरी.
कोकणाला तसा निसर्गाचा वरदहस्त लागलेला आहेच आणि अशा ठिकाणी 'एकांत' नक्की काय असतो तो अनुभवायला मिळाला. कुंडाच्या थंड पाण्यात पाय बुडवून त्यातल्या माश्यांची फिश थेरेपी की काय म्हणतात ते घेत, आजूबाजूच्या पक्षांचे मधुर स्वर कानावर घेत काही क्षण घालवले.
आमच्या या कोकण पट्ट्यात ३०० हुन अधिक शंकराची पुरातन मंदिरे आहेत असं म्हणतात. सप्तेश्वर, बघून आम्ही 'कर्णेश्वर' पाहायला आलो. हे हेमाडपंथी मंदिर, काय बारीक कलाकुसर आहे या मंदिरावर. मी हे अगोदर पाहिलं होतं अगोदर पण भूषण यांनां पाहायचं होतं आणि पहाण्यासारखच आहे हे. कसब्यात छत्रपती समभाजींना मुजरा केला आणि पुढे चिपळूणच्या दिशेने निघालो आमच्या आजच्या तिसऱ्या 'श्वर' दर्शनाला, 'सोमेश्वर'.
संगमेश्वर ते चिपळूण या वाटेवर ३ गरम पाण्याचे कुंड आहेत. चिपळूणच्या दिशेनं तुरळ गावाच्या अगोदर 'राजवाडी' गाव लागतं, या गावात गरम पाण्याचं सुंदर कुंड आहे. चिराच्या आणि कौलारू बांधकाम करून बांधलेलं. या कुंडाच्या समोर एक कमान दिसते ती आपल्याला लाकडी बांधकाम असलेल्या पुरातन सोमेश्वर मंदिराच्या प्रांगणात घेऊन जाते. मंदिर अगदीच साधं, लाकडी सभामंडप, दगडी बैठक, शेणाने सारवरलेली जमीन. मंदिराच्या सभामंडपात कमानीवर पुराणातील गोष्टी लाकडी खांबावर कोरलेल्या आहेत, पैकी राम-लक्ष्मण-सीता यांचा वनवास, द्रौपदी वस्त्रहरण आम्ही ओळखू पाहिलो. इथून आत गेल्यावर नंदी आणि समोर एक मजली गाभारा आहे. दगडी पायऱ्या उतरून शंकराची पिंड आणि त्याच्या वरच्या मजल्यावर गणपतीची दगडी मूर्ती. एकमजली गाभारा, हे पण नवीन होत आमच्यासाठी. मंदिरासमोर पुरातन दीपमाळ एका चौथऱ्यावर उभी आहे. मंदिर, चारी बाजूनी जुन्या चिऱ्याच्या भिंतींनी बंदीस्त केलेलं असावं अगोदर आता काही अवशेष उरले आहेत. मंदिराच्या उजवीकडे आजून एक कमान आहे ती बाजूच्या नदीवर घेऊन जाते. नदीच्या काही भागात पण गरम पाण्याचे झरे आहेत हे ऐकलं होतं पण वाट सापडतच नव्हती माजलेल्या गवतावून खूप प्रयत्न केला शोधायचा पण फसला. परत कुंडाजवळ येऊन काही काकू होत्या त्यांना वाट विचारण्याचा प्रयत्न केला पण, 'वाट मुरली आता माजलेल्या गवतात' अस उत्तर मिळालं. थोडासा हिरमुस झाला पण निघालो परत.
सोमेश्वर, सुंदर असं नैसर्गिक गरम पाण्याचं आणि थंडगार अशा मनशांती घेण्याचं आजून एक ठिकाण.
पुढे चिपळूणच्या दिशेने रस्ताच्या कडेला आजून एक गरम पाण्याच कुंड आहे. या कुंडाचे पाणि जरा जास्तच उकळतं असल्याने थोडं खोल बांधलं आहे. मागे एका पाण्याच्या पऱ्यात एक कुटुंब आपल्या कामात गुंग होत. गृहिणी कपडे धुण्यात आणि गृहस्थ पऱ्याचे पाणी आपल्या मुलाच्या अंगा-खांद्यावर ओतत होता. त्या पाल्याचे ओरडने आणि पाणि पडल्यावर अंग चोरणे यावरून पाण्याची उष्णता कळून आली. या कुंडाजवळ, एका हेमाडपंथी मंदिराचे अवशेष आहेत. बाजूला एक नवीन मंदिर आणि काही ग्रामस्थ होते. मंदिर होत 'केदारेश्वराचे'.
पुढे आरवली इथे सुद्धा एक गरम पाण्याचे कुड आहे पण त्याची अवस्था आता बिकट झाली आहे, नको ताशा वापरामुळे.
कोकण म्हणजे खरंच स्वर्ग, एकांत पाहिजे असेल तर अशी हजारो ठिकाणं आहेत इथे, स्वतःशीच एकरूप होण्यासाठी!
- वैभव आणि भूषण.
युट्यूबवर अनुभवा - https://youtu.be/IW_oLw-Ec_Q
Comments
Post a Comment