सोनगड आणि पर्वतगड..अविनाश असं चैतन्य (Trek to Songad and Parvatgad)

पाऊस जरा रुजायला लागला की आपल्याकडे आळंबीसारखे अगणित ट्रेकर्स प्रत्येक शनिवार-रविवारी उगवतात. मुंबई-पुण्याच्या आसपास असलेल्या गड-किल्ल्यावर तर जत्रा भरते आणि मग काही ऐकू नये अश्या गोष्टी कानावर येतात. आम्ही या जत्रांमध्ये न बावरता, पावसाचा अंदाज घेऊन लहानमोठे आणि एकाकी ठिकाणं शोधतो.


यावेळी आम्ही सिन्नरची सोनगड आणि पर्वतगड ही जोडगोळी निवडली. गड लहान असल्याने मुलांनाही घेऊन जायचं ठरवलं आणि म्हणून मग गेल्या आठवड्यात पावसाने घातलेलं रेड-ऑरेंजच थैमान लक्षात घेवून चारचाकी घेऊन जाण्याचा बेत केला. एक जुना मित्र, अविनाश पण जॉईन झाला आम्हाला या वेळी. माझ्या मुलीने माघार घेतली, कारण आलेला वायरल आणि आईचा ताप! सकाचिनचा चैतन्य होता बरोबर. असे आम्ही चारजण, चारचाकीवर पहिल्यांदाच, दोन लहान किल्ले करायला निघालो. खरंतर गेल्या रविवारचा प्लॅन होता पण या दिवशी मी सहकुटुंब गटारीला प्राधान्य दिलं कारण आजच्या/पुढच्या रविवारी एकादशी होती! सचिनच्या शिव्या खाल्ल्या पण... असतात काही गोष्टी ट्रेकपेक्षा चविष्ट!!

शनिवारी रात्री ११.३० च्या दरम्यान गाडी गेटच्या बाहेर निघाली आणि नाशिकमार्गे सिन्नरच्या पुढे एका गावात सकाळी चारच्या सुमारास ब्रेक घेतला. पावसाने गाडीचे वायपर बंद करण्याची वेळ पूर्ण प्रवासात आणू दिली नव्हती. गाडीतच आम्ही दोन तास आराम केला आणि ६ ला निघालो 'सोनवाडी' साठी, सोनवाडी हे दोन्ही किल्ल्याच्या पायथ्याचे गाव. वाटेत एका ठिकाणी चहा घेतला, फक्त ५ रुपयात मावशींनी कप भरून चहा दिला आणि त्यात साखर मात्र शंभर-एक रुपयाची घातली. कपभर साखरेने गोड झालेलं तोंड घेऊन आम्ही सोनवाडी गावात, रस्त्याच्या कडेला एका कौलारू विठ्ठल मंदिरासमोर गाडी पार्क केली आणि गावातील शाळेसमोरील सिमेंटच्या रस्त्यावर पायपीट सुरू केली. सोनवाडी एक लहानसं गावं, गावात काही जुन्या बांधणीची घर आणि वाडे उध्वस्त अवस्थेत आहेत. ५-१ मिनिटात आम्ही गावच्या मागच्या टेकडीवर पोहोचलो. इथून उजव्या बाजूला असलेला डोंगर म्हणजे पर्वतगड आणि डावीकडे सोनगड. पुढे १५ मिनिटात आम्ही दोन्ही गडांच्या खिंडीत येऊन पोहोचलो. समोर एका लहानशा टेकडीच्या बाजूने वाट गडावर जाते पण ती वापरात नसल्याने सापडली नाही आणि आम्ही नेहमीच्या सवयीप्रमाणे चुकलो होतो. खिंडीच्या बाजूने गडाला अँप्रौच नव्हता म्हणून मग दुसऱ्या बाजूने वाट शोदायाचं ठरवलं. डोंगरउतारावर झाडीतून डावीकडे साधारण अर्धा तास चालल्यावर आम्हाला वाट सापडली. वाट काय गावकऱ्यांनी केलेला हमरास्ताच होता तो. या वाटेवर काही पावलं चालल्यावर काही दगडी पायऱ्या लागल्या. या वाटेवर मधेमधे खूप ठिकाणी कातळात पायऱ्या खोदलेल्या आहेत. वाट एका लहानश्या टेकाडावर घेऊन आली, समोर कातळ टोपीच्या आकाराचा सोनगड, त्यावर कोरलेल्या पायऱ्या आणि मागे सुंदर गडपरिसर पाहायला मिळाला. पायऱ्या चढायला सुरुवात केली आणि रिमझिम सुरू झाली पावसाची. आमच्यापैकी अविनाश तर गाडीतून उतरल्या पासूनच रेनकोट आणि हातात पाण्याची बाटली घेऊन तयारीत होता. आम्ही असे लाड करत नाही स्वतःचे, जेवढं भिजता येईल तेवढं भिजून घेतो. आम्हाला बघून त्यानेपण नंतर तो उतरवला होता. या सोप्या पायऱ्यांची वाट सर करायाला, नवीन पिढीच्या चैतन्यला पुढे केलं आम्ही म्हातारे त्याला फॉलो करायला लागलो, बारीक नजर ठेवून. पुढे वाटेत दोन पावले कोरलेले समाधीचे दगड आहेत. पुढे गेल्यावर काही आजून पायऱ्या सर करून डाव्या बाजूला तटबंदीचे अवशेष पाहायला मिळाले. इथे कातळाला पांढरा रंग दिलेला आहे आणि एक देव उभा केला आहे. बहुतेक इथे कधीकाळी प्रवेशद्वार असावे. या प्रवेशद्वारासमोरच एक खांबटाक आहे, बहुतेक गावकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी साफ केलं होतं हे. या टाक्याचा उल्लेख कुठे वाचला नव्हता आम्ही. आत उतरून पाहिलं तर त्यात आयताकृती ब्लॉक कोरलेले होते, कशासाठी माहीत नाही. याच टाक्याला लागून काही पायऱ्याही कोरलेल्या दिसल्या पण त्या कुठेही न जाता मधेच गायब झालेल्या होत्या. उभ्या कातळात असल्यामुळे जाऊन पाहताही आलं नाही. इथून मागे फिरून गडावर आलो. समोर खंडोबाच लहान मंदिर आहे आणि त्याच्यासमोर दगडी कासव आणि भांड उघड्यावर आहे. मंदिराच्या डाव्या बाजूने गेल्यावर एक मोठं पाण्याचं टाक आहे. इथून पूढे किल्ल्याचे पश्चिम टोक आहे आणि समोर पर्वतगड उभा आणि दूरवर आड किल्ला आहे. किल्ल्याच्या पूर्व टोकावरून भाटघर धरण परिसर हिरवागार झालेला होता. लहानसा गडमाथा पाहायला अर्धा तास पण लागला नाही. खाली उतरून परत झाडीतून वाट काढत खिंडीत आलो. गुर घेऊन आलेल्या काकांनी पर्वतगडासाठी वाट विचारली आणि निराशा पाडून घेतली पदरात. मळलेली वाट नाही म्हणाले. मागून लांबून फिरून जा म्हणाले. बहुतेक त्यांना पण माहिती नव्हती.

खिडीतुन उजवीकडे पर्वतगड दिसत होता पण वाट कुठेच नव्हती. थोडा वेळ विचारविनिमय केला आणि समोर दिसणाऱ्या घळीतून उभं चढून जाऊ ठरलं. पुन्हा आम्ही झाडीत घुसलो पण या वेळी गड बदलला होता, पर्वतगड. गावाच्या दिशेला तोंड करून तिरक चढायला सुरुवात केली. अर्धा एक तासात बाभळीचे वन पार करून काही काही कातळटप्प्यांशी येऊन पोहोचलो. ही थोडाशी अवगढ चढण पार करून एका तलावासमोर आलो. पुढे निवडुंगाच्या झाडीत लपलेली आजून दोन पाण्याची टाकी होती. आणि समोरच एम टेकाड. हे टेकाड म्हणजे गडाचा माथा होता.

सोनवाडी हे पायथ्याचे गाव या किल्ल्यांच्या. मुंबईहून घोटीमार्गे सिन्नर पुढे पुणे रस्त्यावर १० किमी गोदेवाडी फाटा आहे इथून अकोले रस्तावर दापुर - चापडगाव - सोनेवाडी हे १६ किमी आहे. सिन्नरवरून सोनेवाडीसाठी दर एका तासांनी बसेस आहेत.

सोनगड आणि पर्वतगड दोन्ही करण्यासाठी साधारण ५ तास लागतात. आम्ही सकाळी ७.३० ला सूरु करून ११ वाजता गाडीला स्टार्टर मारला होता. ट्रेकभर रुसलेला पाऊस नाशिकात शिरताच प्रेम ओतू लागला होता. आमचा आजचा ट्रेक थोडा वेगळा होता, एकतर आम्ही दोनाचे चार झालो होतो, म्हणजे चैतन्य आणि अविनाश ऍड झाले होते आणि त्यात पहिल्यांदा राजशाही गाडीने प्रवास केला. सहज सोपा ट्रेक, कोणीही करावा, गर्दी टाळून!

- वैभव आणि सचिन. 
 
युट्यूबवर पहा -

Comments