कोकणसफर....पूर्णगड, रत्नदुर्ग, जयगड आणि देवघळी, गणपतीपुळे (Visit to Purngad, Randurg, Jaigad and Devghali and Ganpatipule)
- नरेश बने (एक जीवश्य कंठश्च)
हाच प्रश्न खरंतर मलाही पडला होता कारण आपण पु.लं.च्या 'सखाराम आप्पाजी गटणे' यांचे अनुयायी; "उत्तेजक पेयांपासून पहील्यापासून अलिप्त !" पण गृहस्थाश्रमात, पुरुषवर्गातील प्रत्येकाला आपल्या गृहदेवतेला प्रसन्न ठेवण्यासाठी फक्त वर्षाअखेरीस नाही तर ३६५ दिवस अश्या तडजोडी कराव्याचं लागतात, इच्छेविरुद्ध असल्या तरीही !! असो, आपण विषयाकडे वळू सध्या; पुरुषजातीच्या व्यथा मांडण्यासाठी निवांत 'बसू' कधीतरी...
एक - अगवाडा किल्ला, "हा किल्ला; इथेच त्या 'दिल चाहता है' च्या त्या फेमस गाण्याची शुटिंग झालेली." गोव्यात जाणाऱ्या सगळ्या पर्यटकांना तिथल्या गाईडांनकडून दिली जाणारी अतिशय उपयुक्त अशी माहिती आणि बहुतेक यामुळेच इथे गर्दी जमते.
दोन - जयगड, विजपुरकरांनी १६व्या शतकात बांधलेला पण संगमेश्वर येथील नाईकांनी जिंकून खूप वर्ष पोर्तुगीज आणि विजापूर यांच्या स्वाऱ्या रोखून नेटाने राखलेला. सरतेशेवटी १८१८ मध्ये इंग्रजांनी काबीज केलेला. इथे फक्त आमच्यासारखी चार डोकी.
दोन किल्ले, सारखेच, नद्यांच्या खाडीवर समकालीन निर्माण केलेले; परकीय राजवटीत उभारलेले; पाठीशी अरब समुद्र एकसमानचं; पण एकाच्या नशिबी भरपूर प्रसिद्धी तर दुसरा जवळजवळ दुर्लक्षित आणि अज्ञातवासात; एकाला काल्पनिक वर्तमान आणि दुसऱ्याला प्रदिर्घ आणि लढवय्या इतिहास.
अवगाडा किल्ला, पोर्तुगीजांनी १६१२ मध्ये, डच आणि मराठी आरमारापासून रक्षण करण्यासाठी आणि व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला होता; असं जर सांगितलं तर कुत्रं सुद्धा फिरकणार नाही इकडेही.
फिलॉसॉफी जरा जास्त झाली, 'फील नॉट सो हॅपी' ....म्हणून बस करतो आता!
ऐन गर्दीत (जिथे मी कायम एकटा असतो) गोवा केला, अर्धांगिनी प्रसन्न! आजून एक दिवस काढुन कोकणातले तीन किल्ले केले, उरलेलं अर्धांग म्हणजे मी प्रसन्न!
आपल्या महाराष्ट्राला ७२० किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे आणि यामुळेच आपल्याकडे जलदुर्ग उभारण्याची गरज निर्माण झाली. जवळपास शंभरएक जलदुर्ग, काही उभ्या समुद्रात तर काही किनाऱ्यावर विसावलेले आहेत. यातलेच काही, एका दिवसात होतील तितके करून माझ्या मूळ गावी जाऊ असा तह मी गोवा मोहिमेवर असताना घरच्या किल्लेदाराबरोबर केला होता. माझ्या गावच्या भावाला, समीरला, गोव्याहूनच फोन करून प्लॅन सांगितला आणि तोही तयार झाला. रत्नागिरीत जयगड मुख्य आकर्षण, जोडीला पूर्णगड, विजयगड आणि गणपतीपुळे करू. समीर आला सकाळी लवकर आणि निघालो आम्ही ७च्या दरम्यान. विजयगड जास्त वेळ खाईल आणि काही अवशेष ही नाही आहेत किल्ल्याचे पहायला म्हणून गाडीत चर्चा करून त्यावर फुली मारली आणि वाटेतील रत्नदुर्ग आणि अजून एक नवीन प्रेक्षणीय स्थळ लिस्ट मध्ये ऍड केलं.
रत्नागिरीच्या पूर्वेला एक समांतर वाट गेलेली आहे, भाट्येची खाडी, पावस, गणपतीपुळे आणि शेवट पूर्णगड. सकाळी ८च्या दरम्यान आम्ही पूर्णगड गाठलं. रत्नागिरीवरून जवपास ३१ किमीवर हा किल्ला आहे. मुचकुंदि नदीच्या खाडीच्या उत्तर टोकावर असणाऱ्या टेकडीवर, खाडीतून होणाऱ्या व्यापारावर नजर ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला आहे. आमची गाडी थेट गावाच्या मंदिरापर्यंत पोहोचली इथून किल्ल्याच्या पायऱ्या चालू होतात या आम्हला ५ मिनीटात किल्ल्यापर्यंत घेऊन गेल्या. पायर्याच्या शेवटी दोन भक्कम बुरुज नजरेस पडतात. डाव्या बुरुजासमोर मारुती एका छोटेखानी मंदीरात वसवलेला आहे तर दुसऱ्या बुरुजास लागून एक पाण्याचं मोठं बांधीव टाक किंवा विहीर आहे. मंदीर, पाणि टाक आणि बाकी किल्ल्याची नुकतीच डागडुजी केलेली दिसत होती पुरातत्व खात्याकडून. दोन बुरुजांमध्ये प्रवेशद्वार दडवलेले आहे जेणेकरून बाहेरून शत्रूला फक्त बुरुजच दिसावेत. प्रेवेशद्वारावर मध्यभागी गणपती मांगल्याचे आणि बाजूला चन्द्र-सूर्य अखंड स्थैर्याचे प्रतीक म्हणून कोरलेले आहेत. मुख्य लाकडी दरवाजा अगदी अलिकडे बनवलेला होता आणि वर मोठं कुलुप पुरातत्त्व खत्याच. बाजुच्या घरांमध्ये विचारपूस केली आणि कळलं की ९ च्या नंतर रत्नागिरी वरून खात्याची माणसं येतात आणि किल्ला उघडतात. या एका तासाची चैन आम्हाला परवणारी नव्हती म्हणून तटबंदीला धरुन गडफेरी सुरू करून आता जाण्यासाठी कोणती दुसरी वाट आहेत का पाहायचं ठरवलं पण पूर्ण तटबंदी व्यवस्थित डागडुजी करून नवीन केली आहे. किल्ल्याला सहा बुरुज आहेत पैकी समुद्राकडे असणाऱ्या बुरुजास लागून लहान दरवाजा होता पण तोही कुलुपात. हा किल्ला तसा आटोपशीर. आयतकृती किल्ल्यात सदरेच्या इमारतीचे जोते, किल्लेदाराचा वाडा, धान्य व दारुकोठर यांचे अवशेष आहेत पण ते आम्ही पाहू शकलो नाही. १८३६ च्या एका अहवालात या किल्ल्यावर ७ तोफा आणि ७० तोफगोळे आढल्याची नोंद आहे पण आता ते कुठे दिसत नाहीत, सगळाच इतिहास वर्तमानात पोहोचतोच असे नाही.
पूवर्णगड हे एक अगदीच छोटसं गाव, उतरत्या घराचं, आंबा, फणस, काजू, नारळी पोफळीच्या बागांच्या सावलीत शांत विसावलेल. परत उतरताना अनेक जुन्या पडक्या घराचे अवशेष दिसले. गाडी लावली होती तिथल्या पुरातन मंदिराला भेट देऊन आम्ही निघालो.
पुढचा बेत होता कशेळी गावाजवळील पर्यटकांसाठी अलीकडेच खुल्या केलेल्या 'देवघळी' चा. बांधून सुंदर केली आहे ही जागा; वरून अफाट समुद्र आणि एका बाजूला एक लहानसा किनारा, उभ्या उंच कातळात समुद्राने स्वतः तयार केलेला. इथून लगेच निघून आम्हाला आता रत्नदुर्ग गाठायचा होता. वाटेत 'कनकादीत्य मंदिराला' भेट दिली. मीच काय पण समीरनेही पाहिलेल कोकणातलं दुसरचं प्राचीन विष्णू मंदिर असेल. कोकणाला परशुरामभूमी जरी म्हणत असले तरी इकडचे डोंगर-दऱ्या-कडे-कपारे-कडे-कपारे-कपारे राकट महादेवाचे पूजक. या कनकादित्य मंदिरात आम्ही हापूस आंब्याचं 'नवं' करायला मिळाल. आमच्याकडे वर्षाचा पहिला हापूस चाखणे याला 'नवं' करणं म्हणतात. सुंदर आणि प्राचीन मंदिर पाहून आम्ही रत्नागिरीच्या दिशेने निघालो, रत्नदुर्ग पाहायला.
रत्नदुर्ग किल्ल्याची निर्मिती फार पूर्वी बहमनी राजवटीत झाली. १६७० साली राजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. किल्याचा नाळेच्या आकाराचा असून तो अंदाजे १२० एकर मध्ये पसरलेला आहे. तीन बाजूनी समुद्र आणि एका बाजूने जमीन असा हा किल्ला रत्नागिरी बंदरात होणाऱ्या व्यापारावर नजर ठेवण्यासाठी बांधण्यात आला होता. आता या किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत गाडी जाते आणि आशा मांसाळलेल्या किल्यांची जी गत होते तीच याची झाली आहे. ऑईलपेंट मारलेले बुरुज, प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांना टाईल्स, दोन हत्ती आणि तरुणांचा हँगिंग पॉईंट. प्रवेशद्वारातून आत जाताच भगवती देवीचे मंदिर लागते समोरच कान्होजी आंग्रे यांची मूर्ती. या किल्ल्याच आकर्षण म्हणजे भुयारी मार्ग. भागवती देवीचे दर्शन घेऊन पुढे गेल्यावर चारही बाजूने बंदीस्त केलेली एक जागा दिसते हाच तो तीन तोंडाचा भुयारी मार्ग. हा मार्ग जरी आता वापरात नसला तरी या भुयाराच एक टोक असलेली गुफा खालून सामुद्रातून दिसते. इथुन पुढे तटबंदीवरुन चालत जाताना अनेक बुरुज लागतात आणि या बुरुजावरून समुद्राचे विहंगमय दृश्य दिसते. किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या दिपगृहवरून पूर्ण रत्नागिरी शहर दिसते. हा किल्ला मी २००१ मध्ये पाहिलेला पण आता तो एक पिकनिक पॉईंट बनला आहे. पुढे जयगड गाठले आम्ही.
जयगड, १६ व्या शतकात विजपुरकरांनी बांधला पण फार काळ ते या किल्ल्याचा ताबा ठेवू शकले नाहीत आणि हा किल्ला संगमेश्वर येथील नाईक यांनी हा जिंकून घेतला. पुढे पोर्तुगीज आणि विजपुरकरांनी सतत चढाया केल्या पण हा किल्ला १८१८ मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गेला. खाडीतून होणाऱ्या व्यापारावर नजर ठेवण्यासाठी, शास्त्री नदी जिथे समुद्राला मिळते त्या जयगड खाडीवर दोन किल्ले बांधण्यात आले, दक्षिण तीरावर जयगड आणि उत्तर तीरावर विजयगड. जयगड हा किल्ला पठारावर वसलेला आहे म्हणून याच्या तटबंदीला लागून खंदक खोदले आहेत जेणेकरून शत्रू थेट किल्ल्याच्या भिंतींना भिडू शकत नाही.
किल्ल्यासमोर गडी लावून आम्ही आमची गडफेरी सुरू केली. दोन भक्कम बुरुज समोर दिसले पैकी एक सिमेंट ने मुलामा दिलेला होता तर दुसरा अजूनही लाल जांभ्यात होता. या बुरुजात ब्रिटिश काळात कार्यालये उभारल्यामुळे बुरुजांची अवस्था तिकीट काऊंटर सारखी शोभा गेलेली झाली आहे. किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार या दोन बुरुजांनी झाकलेले होते म्हणजे शत्रूला समोरून थेट मारा दरवाजावर करता येऊ नये.
प्रवेशद्वारावर दोन बाजुना कमळ कोरलेले आहेत पण मधले द्वारशिल्प तुटल्यामुळे नक्की कसली आहे ते कळत नाही. प्रवेशद्वाराला लागून देवड्या आहेत. पुढे प्रवेशद्वाराला लागूनच तटबंदीत दोन्ही बाजूला दोन कोठार आहेत, ही बहुतेक धान्य किंवा दारू कोठार असावीत. या कोठरावरील पायऱ्या चढून आम्ही तटबंदीवर प्रवेश केला. इथून बुरुज पहता येतात. एका बुरुजामध्येतर टाईल्स लावून प्रॉपर टॉयलेट्स बनवले आहेत इंग्रजांनी. हे बुरुज पाहून पाहून आम्ही तटबंदीवरुन गडफेरी सुरू केली. डाव्या वाजुच्या पहिल्या बुरुजावरून खाडी आणि बंदरावर नजर फिरवली. पुढील समुद्राकडील बुरूजावर इंग्रजांनी त्रिकोणी इमारत बांधली आहे. या बुरुजाच्या फांजी वरून खाली उतरून तटबंदीला लागलेल एक कोठार दिसतं, या कोठारातून किल्ल्याचा समुद्राकडील प्रवेशद्वार आहे. इथून किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या इमारतीकडे निघालो, मध्ये काही घरांसारखे अलीकडेच बांधलेल्या खोल्या दिसल्या. पुढे आम्ही वाड्याचा अवशेषांची पाहणी केली बहुतेक हा किल्लेदाराचा वाडा असावा. वाड्याच्या भिंती आणि कमानी बऱ्यापैकी पाहण्यासारख्या आहेत. ईथुन पुढे आम्ही किल्ल्याच्या मधोमध असलेली दोन मजली इमारत पहिली, बहुतेक ही इंग्रजांनी बांधली असावी. या इमारतीच्या बाजूला असलेले पाण्याचे दोन मोठे हौद पाहून दुसऱ्या बाजूच्या जुन्या गणपती मंदिरात आम्ही दर्शन घेतले. गणेशाचे दर्शन घेतल्यावर समोर जयबाचे मंदिर आणि समाधी आहे. किल्लेबांधणीच्या वेळी या जयबाचा बळी दिला गेला होता आणि म्हणूनच या किल्ल्याला जयगड नाव पडले अशी आख्यायिका आहे. पुढे प्रवेशद्वारापाशी येताना दोन विहिरी दिसल्या पण या कोणीतरी बांधून ठेवल्या होत्या म्हणून जवळून पाहता आल्या नाहीत. किल्ल्यातुन बाहेर पडून मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला एक दुसरे प्रवेशद्वार आहे ते आपल्याला गडाच्या पडकोटाकडे घेऊन जाते पण अंधार पडायला सुरुवात झलेली आणि आम्हाला गणपतीपुळे गाठायचं होतं म्हणून निघालो. या पडकोटातून आत गेल्यावर एक गुफेत मोहमाया देवीचे ठाणे आहे. या ठाण्याच्या आसपास दोन दगडी खांब आहेत पैकी एक खांब तटबंदीवरुन आम्ही पहिला होता. वेळेच्या अभावी आम्ही गणपतीपुळे गाठलं, दर्शन घेऊन सूर्यास्त अनुभवला आणि माझ्या गावी पोहोचलो.
गोव्याहून परतीच्या वाटेवर ३ किल्ले पाहिले आणि तेही फॅमिली सोबत पहिल्यांदाच. गणपतीपुळे करणाऱ्यांनी थोडी वाट वाकडी करून जयगड पहावा, किल्ला खरचं पाहण्यासारखा आहे.
- वैभव आणि सचिन (यावेळी समीर पण).
This comment has been removed by a blog administrator.
ReplyDelete