चुकलेला अंदाज..अन घाई ! (Trek to Anghai)
फसतात काही प्रयत्न ! चुकतात काही अंदाज ! आमचाही चुकला यावेळी. सहाएक महिन्यााचा उपास सोडण्यासाठी आपण एखादा आडवाटेवरचा राकट गड निवडतो, पूर्ण तयारी करतो, मिळेल ती तुटपुंजी माहीती गोळा करतो पण निसर्गापुढे आपलं काहीचं चालत नाही आणि आपण माघार घेतो अगदी शेवटच्या टप्प्यावर.
सध्या आमचा जास्त वेळ अश्या एखाद्या गडाला शोधण्यात जातो जो आम्ही पहिले कधी पहिला नसेल आणि आमच्या रविवारच्या एका दिवसाच्या सुट्टीत तो पूर्ण करून आम्ही घरी येऊ शकू; अर्थातच सोमवारी स्वतःला 'गडाऐवजी गाड्याला' जुंपून देण्यासाठी. अनघाई वरून आमचं दोघांचं थोडं दुमत होतचं; कारण पावसात कोणी करत नाही हा; पण दुसरा कोणता पर्याय शनिवार पर्यंत सापडला नाही, म्हणून मग पावसाने आठवडाभर घेतलेली उसंत आणि रविवारची वेदर फॉरकास्ट यांच्या जुजबी भरवश्यावर आमचं ठरलं.
रायगड जिल्ह्यातील मृगगड करुन झाला होता, बाजूचा अनघाई राहून गेलेला. नेहमीप्रमाणे सकाळी ५ ला डोंबिवलीतून निघून खोपोली - जांभुळपाड्यामार्गे 'कळंब' गाव गाठलं ८ च्या दरम्यान. बाईकवरून उतरताच, नळावर पाणि भरणाऱ्या काका-काकूंनी आमची घालमेल वाढवली. "नाही जाऊ शकणार तुम्ही, तीन-चार महिन्यांनी या परत. आम्ही गाववाले नाही जाऊ शकत आता त्या शेवाळ धरलेल्या कातळावरून; तुम्ही काय जाणार !". पाच मिनिटं पुन्हा विचारविनिमय केला आम्ही आणि जाऊन बघू ठरलं.
समोर दिसणारा गड आणि डोंगराची घळ डोळ्यासमोर ठेवून आम्ही पायपीट सुरू केली. वाट सुरू होताच शेतात चाललेली लावणीची लगबग पाहून, पडून गेलेल्या पावसाचा अंदाज आला, तरी मनातल्या मनात हसत आम्ही चालत राहिलो. १०/१५ मिनिटात आम्ही अंबा नदिवरच्या पुलावर येऊन पोहोचलो. इथून पुढे एक आमराई लागते, तिथल्या एका बंगल्याच्या डाव्या बाजूने वाट जंगलात शिरते. या वाटेने पुढे जाताना काही पांढऱ्या रंगाचे बाण दिसतात मध्ये मध्ये पण ते पण हरवतात या हिरव्या जंगलात. पुढे हे बाण पण हरवले आणि आमची वाटही. नळावर भेटलेल्या काकांनी सांगितल्या प्रमाणे बहुतेक कोणीही फिरकत नव्हतं या वाटेला. आम्ही नेहमीच्या सवयीप्रमाणे चुकलो होतो. मग वाढलेल्या रानात गुरांसारखे शिरून वाट शोधण्याचा प्रयत्न केला आणि उभी चढाई करून पहिल्या पठारावर आलो पण आमचा बराच वेळ यात निघून गेला होता. या पठारावरून मार्किंग पुन्हा नाहीशी झाली, अनेक ढोरवाटा आहेत इथे. समोर दिसणारी घळ नजरेसमोर ठेवून एक वाट आम्हाला जंगलात घेऊन गेली आणि पाऊस सुरू झाला. मान्सून ट्रेकला आलेल्या या पावसाने आयुष्यात पहिल्यांदाच खुष न होता हिरमुसलो. सुमारे तासाभरात आम्ही घळीच्या पायथ्याला येऊन उभे राहिलो. समोर पहिला कातळटप्पा आला आणि आम्ही थबकलो. जवळपास २० फुटाची कातळभिंत त्यात होल्ड्स बनवलेले आहेत पण पावसात शेवाळ धरलं होतं त्यावरून सरकलो तर खाली काही होल्डिंग न्हवते. एक-दोन अट्टेम्प केले आणि शूज स्लीप झाले. रिमझिम पाऊस सुरूच होता, त्यात जवळपास १० मिनिट आम्ही डिस्कशन केलं आणि सर्वात कठीण निर्णय घ्यावा लागला. हा आणि पुढे असेच अजून तीन निसरडे कातळ चढताना आणि उतरताना करावी लागणारी जोखमीची कसरत नजरेसमोर ठेवून पाय वळवले आम्ही. निसर्गापुढे तसेही आपण क्षुद्रचं आणि एक वेडं धाडस आपल्याला नाहीसं करू शकतं याची पूर्ण जाणीव ठेवूनच आम्ही इथूनच परत फिरण्याचा निर्णय घेतला; मनावर दगड ठेवुन.
जमा केलेली माहिती फक्त जमा राहिली आमच्याकडे; मंडतोय या ठिकाणी - या कतळभिंतीपुढे नळीची वाट लागते. हा नळीतला उभा चढ चढून आपण अर्ध्या वाटेत पोहोचलो की पुढे जाता येत नाही म्हणून डाव्या बाजूला दुसरा उभा कातळ लागतो तो जपून चढावा. पुढे ५/६ पायऱ्या लागतात आणि दोन लहान कातळटप्पे. पुढे १५ मिनिटात आपण अनघाई आणि बाजूच्या डोंगराच्या खिंडीत पोहोचतो. आजून एक लहान कातळटप्पा खोदलेल्या खोबन्यांच्या आधारे पार करून गडमाथ्यावर फोहोचता येते. गडावर पाण्याच्या तीन टाक्या आणि अनघई देवीचे मंदिर एवढंच आहे पाहण्यासारखं. तैलबैला आणि सुधागड या किल्ल्यावरून दिसतात जर वातावरण चांगलं असेल तर. तसा हा गड फक्त टेहळणी साठी वापरात होता. या भागातून जाणाऱ्या सब, निसणी या घाटवाटा आणि अंबा नदीच्या खोऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी मृगगड आणि अनघई हे उभे केले गेले होते.
गोळा केलेल्या माहितीप्रमाणे, हा गड करायचा बेस्ट वेळ म्हणजे ऑक्टोबर ते मार्च, पण मुंबईत दडी मारलेल्या पावसाच्या अंदाजावर ट्रेक रूट गेस केला आणि मन मारून परत आलो. असो, नाही म्हणायला चांगला २-२.३० तासांचा ट्रेक झाला मोठ्या गॅप नंतर; पावसातील सह्याद्री पुन्हा अनुभवला, गेल्या वर्षी राहून गेलेला आणि उरलेला वेळ अंबा नदीत मनसोक्त डुंबून जळमट काढून टाकली मानवरचीही.
परतलो घरी सांगून, 'पुन्हा येऊ उरलेली वाट मळायला !'
- वैभव आणि सचिन
युट्युबवर पहा -
https://youtu.be/faG8Kx-Yiq8
Comments
Post a Comment