चुकलेला अंदाज..अन घाई ! (Trek to Anghai)

फसतात काही प्रयत्न ! चुकतात काही अंदाज ! आमचाही चुकला यावेळी. सहाएक महिन्यााचा उपास सोडण्यासाठी आपण एखादा आडवाटेवरचा राकट गड निवडतो, पूर्ण तयारी करतो, मिळेल ती तुटपुंजी माहीती गोळा करतो पण निसर्गापुढे आपलं काहीचं चालत नाही आणि आपण माघार घेतो अगदी शेवटच्या टप्प्यावर. सध्या आमचा जास्त वेळ अश्या एखाद्या गडाला शोधण्यात जातो जो आम्ही पहिले कधी पहिला नसेल आणि आमच्या रविवारच्या एका दिवसाच्या सुट्टीत तो पूर्ण करून आम्ही घरी येऊ शकू; अर्थातच सोमवारी स्वतःला 'गडाऐवजी गाड्याला' जुंपून देण्यासाठी. अनघाई वरून आमचं दोघांचं थोडं दुमत होतचं; कारण पावसात कोणी करत नाही हा; पण दुसरा कोणता पर्याय शनिवार पर्यंत सापडला नाही, म्हणून मग पावसाने आठवडाभर घेतलेली उसंत आणि रविवारची वेदर फॉरकास्ट यांच्या जुजबी भरवश्यावर आमचं ठरलं. रायगड जिल्ह्यातील मृगगड करुन झाला होता, बाजूचा अनघाई राहून गेलेला. नेहमीप्रमाणे सकाळी ५ ला डोंबिवलीतून निघून खोपोली - जांभुळपाड्यामार्गे 'कळंब' गाव गाठलं ८ च्या दरम्यान. बाईकवरून उतरताच, नळावर पाणि भरणाऱ्या काका-काकूंनी आमची घालमेल वाढवल...