प्रचिती प्रचितगडाची..(Trek to Prachitgad)
वन-वास सुरू झाला आमचा पुन्हा !!
ज्याची आम्ही वाट पहात होतो तो !
ज्याची आम्ही वाट पहात होतो तो !
तब्बल १० महिन्याची स्थानबद्धता आणि करडी नजरकैद संपवून आम्ही प्रचितगडाचा प्लॅन केला. लेंधी आणि एका दिवसात नाही करता येणारा म्हणून आमच्या गेल्या कोकण सफरीत राहून गेलेला किल्ला. सकाळी ६.३० च्या दरम्यान सुरू करून, ३ वाजेपर्यंत संपवून, ५ ला चिपळुनातून एसटी पकडण्याचा प्लॅन होता. प्लॅन के मुताबिक, पद्धतशीर एसटीची बुकिंग केली जी सकाळी ४.३० चिपळूण गाठेल; एका जवळच्या नातेवाईकाला बाईक घेऊन यायला सांगितलं. कट-टू-कट प्लॅन असल्यामुळे आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे वाट चुकून वेळ वाया जाऊ नये म्हणून, प्रकाश यांना गाईड म्हणून ६.३० येण्याची विनंती अगोदरच केली होती. पण जो एसटीवर विसंबला त्याच्या कार्यभाग बुडाला; या लाल परीने पनवेलला आम्हाला दोन तास झुरळत ठेवलं आणि आमचा ट्रेक लांबला.
चिपळुनातून बाईक घेऊन आम्ही संगमेश्वरच्या एक किलोमीटर मागे शास्त्री पूल पार करुन डाव्या बाजूला असलेलं कसबा आम्ही गाठलं. इथून प्रकाशना फोन केला कारण पुढे नेटवर्क हरवून जातो. प्रकाश सकाळी ६.३० नायरी फाट्यावर भेटणार होते. श्रींगारपुरातून जाताना लागणारी उभी चढण टाळण्यासाठी तीवरे गावातून थोडं फिरून जाण्याचा प्लॅन होता पण उशीर झाल्याने तो कॅन्सल करून आम्ही श्रुंगारपूरी पोहोचलो.
संगमेश्वर वरून १६ किमी वर असलेल्या श्रींगारपूर हे गडाच्या पायथ्याचं गाव. सुर्वे घराण्याकडे याची सरदारकी होती. प्रचितगडबरोबर मंडणगड, पालगड हे किल्ले पण आदिलशाही सरदार सुर्वे यांच्याकडे होते. शिवाजी राज्यांनी उंबरखिंडीत कर्तालाबखनाचा पराभव केला आणि दाभोळकडे कूच केली. मंडणगड सोडून, घाबरून सुर्व्यांनी आपल्या जहागिरीतला अभेद्य किल्ला प्रचितगड गाठला. महाराजांनी इथे सुर्व्यांचा पराभव करून श्रुंगारपूर आणि हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला. सुर्व्यांचे कारभारी पिलाजी शिर्के यांना महाराज्यानी आपल्याबरोबर सामील करुन घेतले, पुढे यांचीच मुलगी मुलगी जिऊबाई उर्फ़ राजसबाई (येसुबाई) यांच्यांशी संभाजी महाराजांचा विवाह झाला.
शिवाजी महाराज जेव्हा दक्षिण विजयाला निघाले तेव्हा त्यांनी शृंगारपूरची सुभेदारी संभाजी महाराजांना दिली, अर्थात याची राजकीय आणि कौटुंबिक कारण सगळ्यांना ज्ञात आहेत. याच वास्तव्यात संभाजी राज्यांनी बुधभूषणम" हा संस्कृत ग्रंथ लिहिला. "नायिकाभेद", "नखशिक", "सातसतक" हे ब्रज भाषेतील तीन ग्रंथ लिहिले. मुकर्बखानाने संगमेश्वरला संभाजी राजाना पकडले आणि घाटावर न्यायचे ठरविले. त्यावेळी प्रचितगड मराठ्यांच्या ताब्यात होता, म्हणून मग शेजारच्या मळे घाटाने संभाजी राजाना कराड-वडूज मार्गे पेडगावला नेले. ही करूण घटना प्रचितगडला व मराठ्यांना हताशपणे पाहत राहवे लागली.
हा झाला इतिहास, आता पुन्हा आमच्या स्वारीकडे वळू. प्रकाश बरोबर सकाळी ९ च्या दरम्यान आमची सफर सुरू झाली. श्रुंगारपूर गावच्या लहानश्या नदीच्या बाजूने जाणारी वाट गडावर घेऊन जाते. या पायवाटेने अर्धा तास दाट जंगलातून चालल्या नंतर ही नदी क्रॉस करावी लागते. पलिकडे गेल्यावर गावाच्या आणि किल्ल्याच्या मधे असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी आपण पोहोचतो. डोंगराची झाडीतली अंगावरची चढण चढुन पठारावर पोहोचायला जवळपास १ तास लागतो. पठारा वरुन १० मिनिटे चालल्यावर पुन्हा खडा चढ लागतो. साधारणपणे पाउण तासात आपण सुकलेल्या धबधब्या जवळ येतो. इथे एका गिर्यारोहकाची स्मृती शिळा बसवलेली आहे. पुढच्या टप्प्यात ठिकठिकाणी ८ शिड्या बसवलेल्या आहेत. त्यातील दोन मोठ्या शिड्यांवरुन चढताना छोटे छोटे दगड निसटुन खाली येतात त्यामुळे सांभाळून चढावे लागते. शिड्यांचा टप्पा पार केल्यावर आपण गडाच्या दक्षिण टोकाजवळ पोहोचलेलो असतो. येथून गडाच्या दक्षिण टोका खालुन उत्तर टोकाकडील दरवाजा खालील शिडी पर्यंत आडवी चढत जाणारी वाट पार करायला १ तास लागतो. या वाटेवर खूप घसारा (स्क्री) असल्याने खूप जपून चढाव आणि उतराव लागते.
किल्ल्याच्या दरवाजाखाली लावलेल्या शिडीवरुन चढल्यावर आपण उत्तराभिमुख उध्वस्त प्रवेशद्वारा समोर उभे राहातो. या शिडीची तब्बेत इतकी खराब आहे की बाजूला लावलेल्या दोरीच्या आधार घ्यावा लागतो. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला एक बुरूज आहे. किल्ला चढतांना हा बुरुज आपल्याला खालूनही दिसतो. इथून गडफेरी सुरू केल्यावर डाव्या बाजूला पाण्याचे मोठे टाक आहे. पाणी पिण्यायोग्य नाही इथलं. टाक्याच्या बाजूने वर चढून आपण प्रकेशव्दाराच्या पुढे असलेल्या डोंगराच्या नाकावर पोहोचतो. किल्ल्याचा उत्तर दक्षिण पसरलेला डोंगर आणि बाजुचा डोंगर यामधे खिंड तयार झालेली आहे. या खिंडीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि प्रवेशद्वारावर येणाऱ्या शत्रूवर मारा करण्यासाठी येथे बुरुजाची योजना केलेली आहे. उत्तर टोकाकडील हा बुरूज पाहून परत टाक्या जवळ येउन किल्ल्याच्या दक्षिणेला जाताना एक वाट वर चढत जाताना दिसते. या वाटेने जाण्या अगोदर डाव्या बाजुला असलेल्या कारवीच्या झाडीत थोडे अंतर चालुन गेल्यावर एक पाण्याचे टाक पाहायला मिळते. याठिकाणी दरीच्या बाजुला तटबंदीचे अवशेषही आहेत. टाक पाहून परत पायवाटेवर येउन छोटासा चढ चढुन दक्षिणेस चालत गेल्यावर आपण पत्र्याच्या शेड मध्ये बांधलेल्या भैरी भवानीच्या देवळापाशी येतो. देवळाच्या परिसरात ५ तोफा ठेवलेल्या आहेत. देवळात तीन मूर्ती आहेत. मधली मुर्ती भैरी भवानीची असून बाजूच्या दोन्ही मूर्ती भैरोबाच्या आहेत. ही भवानीमाता पंचक्रोशीतील लोकांची कुलदेवता आहे. इथे प्रकाशने नारळ वाढवला आणि खोबऱ्याचा प्रसाद आम्ही वाटून खल्ला. मंदिर पाहून पुढे गेल्यावर कारवीच्या झाडीत लपलेले घरांचे चौथरे पाहायला मिळतात. या चौथऱ्या मधून जाणाऱ्या वाटेने पुढे गेल्यावर पायऱ्या लागतात. पायऱ्यांनी खाली उतरल्यावर उजव्या बाजूला कातळात खोदलेल खांब टाक पाहायला मिळत. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. हे टाक २ खांबावर तोललेल असून टाक्यात उतरण्यासाठी पायऱ्या कोरलेल्या आहेत . याठिकाणी एकूण पाण्याची ५ टाक असुन त्यापैकी ३ टाक पायऱ्यांच्या उजव्या बाजूला व २ टाक डाव्या बाजूला आहेत. टाक पाहून पुढे गेल्यावर डाव्या बाजूला (दरीच्या बाजूला) तटबंदी आणि बुरुजांचे अवशेष पाहायला मिळातात. पुढे गडमाथ्यावर एकमेव उंबराचे झाड आहे. इथे थोडा वेळ रेस्ट घेउन समोर दिसणाऱ्या वाड्याच्या दिशेने गेलो. या उध्वस्त वाड्याच्या उजवीकडून वळसा घालून गेल्यावर तटबंदी आणि फांजीचे अवशेष पाहायला मिळतात. वाड्या मागील उतार उतरुन समोर दिसणाऱ्या उंचवट्यावर चढून गेल्यावर आपण किल्ल्याचा दक्षिण टोकावर पोहोचतो. येथे पश्चिमेला (शृंगारपूरच्या दिशेला) कातळात खोदलेला एक खड्डा आहे . त्यात टेहळ्यांना बसण्यासाठी दोन स्टुला सारखे दोन उंचवटेही कोरलेले आहेत. टेहळ्या उन , गडावरचा भन्नाट वारा यापासून संरक्षण मिळण्यासाठी अशा प्रकारचा खड्डा खोदला असावा.
किल्ल्याच्या दक्षिण टोका वरुन बाजूचा वानर टोक डोंगर आणि त्यावरचे छोटे सुळके सुंदर दिसतात. हे पाहून आल्या वाटेने परत प्रवेशद्वारापाशी पोहोचल्यावर आपली गड प्रदक्षिणा पूर्ण होते.
प्रचितगड, उचितगड, राग्वा अशी अनेक नावाने ओळखला जाणारा हा किल्ला रत्नागिरी, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या चारी जिल्ह्याच्या सीमेवर टेहळणीसाठी उभा आहे. या किल्ल्यावर जाणाऱ्या अनेक वाटा आता चांदोली सह्याद्री व्याघ्रप्रकल्पामधे गेल्यामुळे फक्त शृंगारपुरातून खडी वाट उरली आहे. ही खडी चढाई लॉकडाऊन मध्ये आमच्या वाढलेल्या वजनाची आणि पोटाची जाणीव करून देऊन गेली.
- वैभव आणि सचिन.
खूप छान आहे सफर तुमची. खरच safar करायला आवडेल
ReplyDeleteधन्यवाद,वाचल्याबद्दल आणि अभिप्राय दिल्याबद्दल. नक्की करू सफर एकत्र कधीतरी......
ReplyDeleteखूप दिवसापासून वाट बघत होतो तुमच्या ब्लॉग ची आणि शेवटी 10 महिने च्या प्रतीक्षा नंतर तो योग आला. नेहमी प्रमाणे अतिशय माहितीपूर्ण आणि दर्जेदार लिखाण 🙏🙏
ReplyDeleteधन्यवाद.आपण सर्वच अडकून पडलोय म्हणून वेळ लागतोय.उशिरा उत्तर देण्यासाठी क्षमस्व..
Delete