प्रचिती प्रचितगडाची..(Trek to Prachitgad)

वन-वास सुरू झाला आमचा पुन्हा !! ज्याची आम्ही वाट पहात होतो तो ! तब्बल १० महिन्याची स्थानबद्धता आणि करडी नजरकैद संपवून आम्ही प्रचितगडाचा प्लॅन केला. लेंधी आणि एका दिवसात नाही करता येणारा म्हणून आमच्या गेल्या कोकण सफरीत राहून गेलेला किल्ला. सकाळी ६.३० च्या दरम्यान सुरू करून, ३ वाजेपर्यंत संपवून, ५ ला चिपळुनातून एसटी पकडण्याचा प्लॅन होता. प्लॅन के मुताबिक, पद्धतशीर एसटीची बुकिंग केली जी सकाळी ४.३० चिपळूण गाठेल; एका जवळच्या नातेवाईकाला बाईक घेऊन यायला सांगितलं. कट-टू-कट प्लॅन असल्यामुळे आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे वाट चुकून वेळ वाया जाऊ नये म्हणून, प्रकाश यांना गाईड म्हणून ६.३० येण्याची विनंती अगोदरच केली होती. पण जो एसटीवर विसंबला त्याच्या कार्यभाग बुडाला; या लाल परीने पनवेलला आम्हाला दोन तास झुरळत ठेवलं आणि आमचा ट्रेक लांबला. चिपळुनातून बाईक घेऊन आम्ही संगमेश्वरच्या एक किलोमीटर मागे शास्त्री पूल पार करुन डाव्या बाजूला असलेलं कसबा आम्ही गाठलं. इथून प्रकाशना फोन केला कारण पुढे नेटवर्क हरवून जातो. प्रकाश सकाळी ६.३० नायरी फाट्यावर भेटणार होते. श्रींगारपुरातून जाताना लागणारी उभी चढण ...