अरुणोदय झाला..मंगळगड/कंगोरीगडावर...(Trek to Mangal gad/Kangorigad)

शुक्रवार रात्र..का शनिवार? माहीत नाही, रात्री १२.३० च्या सुमारास झोपेतच फोन उचलला आणि...

- येताय ना तुम्ही?
- कुठे?
- अहो रिझर्व्हरेशन आहे ना तुमचं?..गोठावली गाडीचा कंडक्टर बोलतोय मी.
- हो उद्या आहे आज नाही..
- काय सर..शिकली सवरलेली माणसं तुम्ही...तारीख बघा तारीख...रात्री १२ नंतर बदलते ती!
- नाही जमणार आता, डोंबिवलीला आहे.
- बघा, पैसे परत मिळणार नाहीत आता.

तब्बल रु. ५२० चा फटका घेऊन, स्वतःवर हसतं मी पुन्हा झोपलो.


मंगळगड म्हणजेच कंगोरीगड पाहण्यासाठी, किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गोठावली गावासाठी असलेल्या रात्रीच्या एकमेव एसटी ची बुकिंग करून ठेवली होती. गाडी रात्री १२.३०ची असल्यामुळे, शनिवारी रात्री निघुन रविवारी ट्रेक करायचा प्लॅन होता पण तारखेचा गोंधळ झाला आणि पैसे गेले माझे!
शनीवारी सकाळीच पुन्हा बुकिंग केली, या वेळी न चुकता तारीख रविवारची सिलेक्ट केली. नशिबाने शेवटच्या सीट वर दोन जागा मिळाल्या.
शनिवारी रात्री ११ ला निघून, १२ वाजता पोहोचलो आम्ही ठाणे सीबीसी बसडेपोत. १२.३० ची ठाणे-गोठावली एसटी आम्हाला मंगळगडाच्या पायथ्याशी घेऊन जाणार होती. 

मंगळगड उर्फ कंगोरिगड, जावळीच्या खोऱ्यातील एका उंच पहाडावर वसलेला शिलेदार. उंचच उंच डोंगर, खोल दऱ्या आणि घनदाट जंगल यांनी नटलेली चंद्रराव मोऱ्यांची जावळी आणि या जावळीत, सह्याद्रीची घाटमाथ्यावर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेल्या अनेक किल्ल्यांपैकी एक म्हणजे मंगळगड. महाड शहरात, सावित्री नदीमार्गे चालणारा परदेशी व्यापार घटमार्गानी घाटमाथ्यावर जात असे. या मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी कोकणच्या पश्चिम किनारपट्टीवर आणि घाटावर अनेक किल्ले बांधले गेले. जावळीच्या खोऱ्यातील भोपघाट, वारंधघाट आणि अस्वालखिंड यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी मंगळगड/कंगोरीगड उभारण्यात आला. 

कंगोरीगड हा चंद्रराव मोऱ्यांनी जावळीच्या खोऱ्यात टेहळणीसाठी बांधला. जानेवारी १६५६ मध्ये शिवाजी राज्यांनी जावळीवर आक्रमण करून ती ताब्यात घेतली त्याचवेळी इथले रायरी, ढवळगड, कंगोरीगड हे गड आणि मोररबाजी सारखा योद्धा राजांना मिळाला. याच कंगोरीगडाचे नाव बदलून राजांनी 'मंगळगड' केले. पुढे राजधानी रायगडच्या जवळ असल्यामुळे या गडाचा उपयोग राजकीय कैद्यांना तुरुंगात ठेवण्यासाठी केला गेला. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर, औरंगांगजेबाने, जुल्फिकारखानास रायगड घेण्यासाठी पाठवले. १६८९ मध्ये, रायगडाची नाकेबंदी करण्यासाठी आजूबाजूचे किल्ले आणि प्रदेश त्याने काबीज केला. त्यातच मंगळगड, मुघलांच्या ताब्यात गेला. १६९० मध्ये, राजाराम महराज्यांचे अमात्य, रामचंद्रपंत यांनी गड पुन्हा जिंकून घेतला. १८१७ मध्ये सरदार बापू गोखल्यांनी, मद्रास रेजिमेंट मधील कर्नल हंटर आणि मॉरिसन यांना अटक करून मंगळगडावर तुरुंगात ठेवले होते. १८१८ मध्ये, कनेल पँथर या इंग्रज अधिकाऱ्याने किल्ला जिंकून घेतला. रायगडाबरोबर स्वराज्यात आलेला आणि जवळपास त्यांच्याबरोबरच गेलेल्या हा किल्ला ऐतिहासिक आहे.

१२ वाजता, ठाणे एसटी स्टँड वर आमच्या गाडीची वाट बघत बसलो होतो आम्ही. खूप दिवसांनी पब्लिक ट्रान्सपोर्ट ने ट्रेक करत होतो नाहीतर आपली बाईक असायची प्रत्येक ट्रेकला. ठाणे-गोठावली, गाडी आली, बऱ्यापैकी गर्दी होती. काल रात्री फोन करणारा वाहक भेटला. आम्ही सीट नंबर सांगितला आणि 'अहो तुमचं नावाचं नाही आहे शीट मध्ये!'...पुन्हा गोंधळ, मोबाइलमधलं रिसर्वरेशन दाखवलं आणि थोडा ताठ होऊन म्हणालो..तारीख बघा, २३ आहे..२३!'..तो, मी आणि सचिन तिघेही हसलो. मग तो पुढे आणि त्याच्या मागे आम्ही अशी वरात त्याच्या ऑफिस पर्यंत गेली आणि त्याच्याजवळचा मेमो हा २२ तारखेचा असल्याचं लक्षात आलं आणि २३ चा मेमो घेऊन आमची वरात परत गाडीत आली. या सगळ्या लाईट मूमेंट्स मुळे एक गोष्ट मात्र चांगली झाली, पुढे असलेल्या काही चांगल्या सीट आम्हाला त्याने देऊ केल्या आणि आमच्या शेवटच्या सीटच्या वेदना कमी केल्या. मुंबई सोडता सोडता मला झोप लागली, सचिनला सहसा झोप लागत नाही, तो जाऊन ड्रायव्हर केबिन मध्ये गप्पा मारत बसला. मुंबई गोवा नॅशनल हायवे बद्दल काय सांगू, जाऊदे पण महाड MIDC मधून गाडी वळणांवर कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला पेंग टाकू लागली. अश्या अरुंद आणि वळणांच्या रस्यांवरून आडवाटेवरील गावं जोडण्याची किमया फक्त एसटीच करू शकते. पहाटे ५.१५च्या सुमारास आम्ही गोगावले वाडीत (गोठावली गाव) उतरलो आणि आमचा त्या लाल डब्ब्यातला खडखडाट संपला.

आम्ही उतरलो, त्या निर्मनुष्य गावात फक्त एक वृद्ध जोडपं एसटीची वाट पाहत उभं होत, सकाळी ५.१५ वाजता. हीच एसटी फिरून येऊन पुन्हा ठाण्याला जाते, हे जोडपं ती पकडण्यासाठीच उभं होतं एवढ्या सकाळी. त्या आजोबांचं तिथे असणं आमच्या पथ्यावर पडलं नाहीतर उजाडेपर्यंत आम्हाला तिथेच बसून राहावं लागलं असतं. आम्ही आजोबांकडे गडाच्या वाटेची विचारपूस केली. त्या एसटी थांब्यापासून थोडं पुढे उजवीकडून खडी टाकलेली एक वाट जात होती, आजोबांनी ही वाट दाखवली आणि उजाडल्यावरचं जाण्याचा सल्ला दिला, कारण माजलेलं रान आणि शेफरलेली रानडुक्करं. आम्हाला वेळ वाचवायचा होता म्हणून आम्ही मोबाईलच्या लाईट मध्ये निघण्याचा निश्चय केला. आजोबांनी थोड्या काळजीतच आम्हाला न जाण्याचा सल्ला दिला मग त्यांचं मन राखण्यासाठी हातात एक लहानशी काठी घेऊन आम्ही निघालो डुकरांचा समाना करायला. परतीच्या प्रवासाची देखील चौकशी केली आम्ही आजोबांकडे, १०.३० ची महाड एसटी सुटली की थेट २.३०ची होती. रविवार असल्यामुळे १२.३० ची शाळेच्या मुलांची गाडी आज नव्हती. २.३० च्या एसटीने गेलो तर घरी पोहोचायला रात्र होईल ही भीती त्या रानडुक्करांच्या भीतीपेक्षा कित्येक पटीने मोठी होती म्हणून मग त्या अंधारातच ट्रेक चालू करायचा निर्णय आम्ही घेतला.

खडी टाकलेली वाट त्या अंधारातही स्पस्ट दिसत होती, दिसते तेवढी वाट मारण्याचा विचार करून आम्ही चालत राहिलो. एखादा लहानसा रानडुक्कर आला आडवा तर सोय होईल संध्याकाळची म्हणून कान टवकारून आम्ही चालत होतो. ही वाट जवळपास तासाभरात टेकडीवर घेऊन गेली. आम्ही टेकडीवर पोहोचलो पण या वाटेने पठार लागत नाही कारण डावीकडची वाट गडावर आणि उजवीकडची पठारावर नेते. गडावर जाणारी वाट डोंगराच्या धारेवरून उभी चढून गडाच्या पश्चिम बुरुजाखाली घेऊन जाते. बुरुजाखालून दोन वाटा जातात, त्यातली डावीकडची वाट गडावर घेऊन जाते. या वाटेने डावीकडे खोल दरी आणि उजवीकडे किल्ल्याचा घेरा घेऊन आम्ही जवळ जवळ २० मिनिटात गडावर पोहोचलो. याच वाटेवर कातळात खोदलेल्या काही पायऱ्या लागतात. किल्ल्याचं प्रवेशद्वार आता उध्वस्त अवस्थेत आहे तरी बुरुज आणि तटबंदी बऱ्यापैकी शाबूत आहेत. या उध्वस्त प्रवेशद्वातून प्रवेश करता समोरच्या माचीवर कंगोरी देवीचे मंदिर दिसले या मंदिराच्या मागच्या बाजूस सूर्याची लाली पसरली होती. आम्ही गडावर प्रवेश केला तरी सूर्योदय व्हायचा होता. खरतर, गड चढताना डावीकडे सहयकड्यांवर पसरलेली केशरी किरणे बघत आम्ही आमचा वेग वाढवला होता, किल्ल्यावरून सूर्योदय पाहायचा होता आम्हाला. प्रवेशद्वारातून आत जाताच, उजवीकडच्या माचीवर आम्ही उगवणाऱ्या सूर्याकडे टक लावून बसलो. काही वेळातचं अरुणोदय मनात भरून घेऊन आम्ही आमची गडफेरी सुरू केली.






मंगळगड तसा लहानसा किल्ला आहे, पुर्वपश्चिम लांबी १४८५ फूट व दक्षिण-उत्तर रुंदी २६४ फूट. सूर्योदय पाहून आम्ही समोरील कंगोरी देवीचे दर्शन घेतले. मंदिर दगडात बांधलेलं आहे, गडाचे छत आता अस्तित्वात नाही. गाभाऱ्यात कंगोरी देवी आणि भैरवाची सुबक दगडी ताकं आहेत. उजव्या बाजूला आत आणि बाहेर काही आजून भग्न मुर्त्या पहुडलेल्या आहेत. मंदिराच्या मागे किल्ल्याचा पूर्व बुरुज आहे. या बुरुजाची तटबंदी आजून बऱ्यापैकी शाबूत आहे. मंगळगडाच्या या बुरुजावरून आभाळाकडे पाळणारे पांढरे ससे जणू दिसत होते पण ते म्हणजे धुकं नसून; धुराचे लोट होते. आमच्या कोकणात मशागतीची एक पध्दत आहे. भाताच्या मळ्या भाजून काढायच्या. भाजावळीचे दिवस आहेत आमच्या कोकणात. या गावतलेही सगळे लोक भाजावळीच्या कामात गुंग आहेत. दिवसभर एकेक तरवा भाजवळीसाठी तयार केला जातोय आणि मग पहाटे पाचला उठून लोक तरव्यावर माती लावायला जातात पण आमचं मात्र वेगळंच, ट्रेकला पोहोचलो सकाळी सकाळी! साधारण सात-साडेसातपर्यंत माती खणून बारीक करून तरव्यावर पसरली जाते आणि तरव्याला पेट दिला जातो. तेव्हा आम्ही गडाच्या बुरुजावर होतो. इथून पुन्हा मागे येऊन प्रवेशद्वाराहून उजवीकडची बालेकिल्ल्यावर घेऊन जाणारी वाट आम्ही तुडवू लागलो. तत्पूर्वी याच माचीवर पाण्याचं पाहिलं टाकं लागलं. बालेकिल्ल्याच्या वाटेवर पाण्याचं दुसरं टाकं लागलं, इथे चेहरा थोडा ओला करून आम्ही वाटेला लागलो. वाट थोडं फिरून बालेकिल्ल्यावर घेऊन गेली. समोर दोन वाड्यांचे अवशेष होते आणि त्यांसमोर काही भग्न मुर्त्या. वाड्याच्या मागून आम्ही किल्ल्याच्या पश्चिम बुरुजावर पोहोचलो. हाच तो बुरुज, गोठावली गावातून ट्रेक करून येताना समोर दिसणारा. या बुरुजावरून दोन्ही बाजूला सह्यपर्वत आणि समोर थोडा सखल प्रदेश त्यात गोठावली गाव असा रम्य परिसर दिसत होता. बुरुजाच्या टोकावर दोन भगवे ध्वज लावले होते पैकी एका गुरफटलेल्या ध्वजाला सचिनने पुढे जाऊन मोकळं केलं आणि हवा दिली. माझ्या नेहमीच्या ट्रेकच्या वेळी मध्येमध्ये जोरात आवाज देण्याच्या सवयीप्रमाणे याचं बुरुजावरून सहज बैलाच्या डुरकण्याचा आवाज देऊन पाहिला आणि इको झाला मग काय, राजांची गारद देण्यापासून आम्ही आम्हाला रोखू शकलो नाही. या सहयकड्यांत घुमून तोच आवाज पुन्हा ऐकण्यात एक वेगळीच झिंग आहे. त्या पूर्ण परिसरात फक्त आम्ही असल्यामुळे आमची गारद गोठावली गावच्या लोकांपर्यंत पोहोचल्याची पावती एका गावकऱ्याने आम्ही उतरून गेल्यावर दिली. पुढे बालेकिल्ल्यावरून उतरताना एक पुसटशी वाट उजवीकडे जाते तिथे बारमाही पिण्याच्या पाण्याची दोन टाकी आहेत ती पाहून आम्ही आमची गडफेरी पूर्ण केली.

























उतरताना पाठरावरची वाट घेतली, वेळ वाचवण्यासाठी! पण ही वाट बहुतेक वापरात नाही आहे म्हणून जवळपास मिटत आली आहे. वाट उभी असून, पानगळीमूळे पूर्ण झाकून गेलेय त्यामुळे "कॉच्या च्या ट्रेकिंग शूज ने आमचा *च्या आपटवला"; दोन-दोन वेळा दोघांचाही. सचिनला हाताला थोडं खरचटलंही. या वाटेने ट्रेक संपवून ९.४५ ला आम्ही पुन्हा गोठावली गाव गाठलं. महाडला जाणारी गाडी १०.३० ची होती म्हणून मग समोर एक नवीन मारुती मंदिराचं बांधकाम चालू होतं तिथे जाऊन दर्शन घेतलं. मंदिरातील मारुती बहुतेक गडावरून येऊन इथे वसला होता. महाड एसटी बरोबर १०.३० ला आली आणि काही म्हाताऱ्या कोताऱ्यांबरोबर आम्ही ती पकडली.दोन आजी बाई फार बोलत होत्या गाडीत आणि त्यांच्या डोक्यावरचं एसटीच एक स्लोगन लिहलं होतं 'एसटीचा प्रवास, करमणूक हमखास'. 







गड चढताना मध्ये एक ब्रेक घेतला होता आम्ही. पहाटेचं चांदण्यांनी भरलेलं आकाश डोंगराच्या कुशीतल्या शांततेत पाहण्याची मजाचं काही और असते आणि त्यांस जोड म्हणून निर्मनुष्य डोंगरमाथ्यावरून सूर्योदय पाहणे म्हणजे स्वर्गीय सुख आम्हा भटक्यांसाठी!

ग्रुप ट्रेक बंद केल्यामुळे खूप वर्षांनी हा अनुभव घेतला होता आम्ही!

- वैभव आणि सचिन.


तळटीप -
# किल्ला आडवाटेला असल्यामुळे, वेळेत पूर्ण करून परत येण्यासाठी स्वतःचे वाहन गरजेचे आहे.
# ठाणे सीबीसी ते गोठावली ही एसटी रात्री १२.३०ची आहे. ही एकच गाडी असल्याने बुकिंग करणं गरजेचं आहे. ही सकाळी ५.३०ला गोगावले वाडीत उतरवते जेथून ट्रेक चालू होतो.
# परतीच्या प्रवासासाठी १०.३० - महाड, १२.३० - बिरवाडी (शाळेची गाडी, रविवारी सुट्टी), २.३० - महाड, शेवटची. 
# वाहने खूप कमी आहेत या गावात. रिक्षा वैगरे नाहीच. 

आमचा मंगलगड/कंगोरीगडाच्या सफारीचा पूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी YOUTUBE Link -

https://youtu.be/fYlD_neysxU


x

Comments