कुर्डुगडाची घळ आणि घळीतून सरपटणारे आम्ही (Trek to Kurdugad/Vishramgad)

बरेच दिवसांनी माझा ओरिजिनल रंग परत देणारा ट्रेक केला! मी भले त्याला 'गहुवर्ण' म्हणत असलो तरी माझ्या मित्राचं वेगळं मत आहे. 'तू आजून थोडा उजळ असतास तर आम्ही तुला काळा म्हटलं असतं!' (वर्णभेदाचा कोणताच हेतू नाही पण मित्रप्रेम आजून काही नाही).

असो, मुद्दा असा की; जवळजवळ गेले सहा महिने आम्ही जे काही ट्रेक केले ते सर्व मान्सून ट्रेकचं ठरले, निसर्गाची कृपा! पण आज कुठे आम्हाला सूर्य खऱ्या अर्थाने जाणवला. रायगड जिल्ह्यातही एक 'विश्रामगड' आहे, 'कुर्डुगड' म्हणतात त्याला. ताम्हिणी घाटातून होणाऱ्या व्यापारावर नजर ठेवण्यासाठी हा किल्ला उभा केला गेला. समुद्र मार्गाने आपला परदेशी व्यापार कित्येक वर्षांपासून चालू आहे, कोकणात उतरणारा माल ताम्हिणी, थळ अश्या मार्गाने घाटावरील बाजारपेठेत विक्रीसाठी वाहतूक केला जाई. अश्या या घटमार्गांचे रक्षण करण्यासाठी अनेक किल्ले बांधण्यात आले. भिऱ्यात उगम पावणारी कुंडलीका नदी कोर्लई जवळ समुद्राला मिळते या नदीतून घाटावर जाणाऱ्या ताम्हिणी घटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता. कोकणातून पुण्यात जाणाऱ्या ताम्हिणी घाटाच्या वेशिवरच हा किल्ला आहे.


कोलाड वरून विल्हे - येलवडे - शिरवली मार्गे 'जिते' हे या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव. सकाळी ४.३० ला निघून, कोकणातील गुलाबी थंडीचा आनंद घेत आम्ही 'जिते' गाव गाठलं तेव्हा ९ वाजले होते. इथे नदीच्या पुलाजवळच्या एका घराच्या अंगणात गाडी लावून आम्ही वाटेबद्दल विचारपूस केली. याच घराच्या बाजूने एक वाट जाते, या वाटेने थोडं पुढे जाऊन डावीकडे पायवाट घ्यायची होती. खूण म्हणून एका आंब्याच्या झाडाच्या खालून ही वाट जाते. इथून नीट पाहिल्यास, डावीकडे डोंगराच्या मागे एक विजेचा टॉवर दिसतो, हा कुर्डुवाडीच्या जवळच आहे. कुर्डुवाडी म्हणजे, गडाच्या सुळक्याच्या पायथ्याशी, पठारावर वसलेली ४/५ घरांची ठाकरवस्ती. आम्ही वाट धरली, बऱ्यापैकी मळलेली होती ही वाट, कुर्डुवडीच्या लोकांचा बाजार खाली गावात असल्यामुळे. वाट सुंदर अश्या दाट झाडीतून जाते. थोडं पुढे गेल्यावर उभ्या चढाईला सुरवात झाली. समोर कातळकडा दिसत होता. या कटाळकड्याला डावीकडे ठेवून वाट फिरून पठारावर घेऊन जाते. वाटेत काही हुप्प्यानी आमची वाट अडवली होती पण थोडा आवाज करता पळ काढला त्यांनी. जवळ जवळ १.३० तास चढाई करून आम्ही खालून दिसणाऱ्या डोंगराच्या पठारावर पोहोचलो. वाट दम काढणारी होती.  समोर गडाचा सुळका दिसत होता. या पठारावर गडाच्या दिशेने चालत गेल्यावर कुर्डुवाडी लागली. इथे आमचे स्वागत वाडीतील कुत्रांनी समूहगानाने केले. पुढे या वाडीच्या डावीकडील वाट कुर्डुदेवीच्या मंदिराजवळ घेऊन गेली. मंदीरात कुर्डुदेवी आणि इतर देवांच्या मुर्त्या होत्या. याच मंदिरात भरणाऱ्या शाळेच्या फळ्याने लक्ष वेधून घेतलं. पटसंख्या होती फक्त २. कौतुक वाटलं रोज १.३० तासांची पायपीट करून येणाऱ्या शिक्षकांचं. या मंदिराच्या समोर काही विरगळी आहेत. पुन्हा मागे येऊन आम्ही गडावर जाणारी वाट धरली. दोन वाटा मंदिराच्या डावीकडून आणि उजविडून गडावर घेऊन जातात. गड चढायला सुरुवात केल्यावर थोड्या वेळाने कातळात खोदलेल्या काही पायऱ्या लागतात या पार करून आपण गडाच्या उध्वस्त झालेल्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आलो. या प्रवेशद्वाराच्या डावीकडे एक पाण्याचे टाके आहे. या बारमाही पिण्यायोग्य पाण्याचा उपयोग कुर्डुवाडीचे राहिवाशी उन्हाळ्यात करतात. प्रवेशद्वाराने आत प्रवेश करताच समोर काही तुटलेले कातळकडे पडलेले दिसले आणि डावीकडे मारुती पहुडलेला होता. आम्ही गडफेरी सुरू केली. ते कातळकडा पार करताच एक भलीमोठी निसर्गनिर्मित गुफा आहे. अजूनही ही गुफा मोठी होत जातेय हळूहळू. ती पाहून बाहेर थोड्या अंतरावर गडाच्या बुरुजाचा काही भाग उभा आहे. या बुरुजावर चढून समोर दिसरणारा ताम्हिणी घाटाचा रम्य सह्यपरिसर डोळे भरून पाहून घेतला. या बुरुजच्या उजव्या बाजूला डोंगराची एक भलीमोठी दरड कोसळल्यामुळे जुनी वाट नाहीशी झाली आहे. या दरडीच्या आणि सुळक्याच्या मधून वर चढून आम्ही या गडाच्या पहिल्या आकर्षणाजवळ पोहोचलो. कोसळल्या दरडीच्या खोबणीत एक भला मोठा दगड अडकून एक नैसर्गिक खिडकी तयार  झाली आहे. इथे काही क्षण घालवून आम्ही पुन्हा खाली आलो आणि डावीकडून जाणारी एक लहानशी वाट सापडली. या अवाढव्य दरडीमुळे फिरून जाणारी वाट पूर्णपणे मिटली आहे तरी एखादा अनुभवी ट्रेकर कातळाला बिलगुन जाऊ शकतो पण खूप सांभाळून कारण खाली खोल दरी आहे. बरोबर रोप असेल तर नवख्यानी साहस करावं नाहीतर फिरून पुन्हा प्रवेशद्वारावरून डावीकडे वळून पाण्याचं टाक पाहून परत येऊन गडफेरी पूर्ण करावी लागते. आम्ही कठीण वाट पार केली. या वाटेने पुढे गेल्यावर समोर आहे ते या गडाचं दुसरं आकर्षण. एक लहानशी खाच, दरड आणि सुळका यात एक लहानशी खाच तयार झाली आहे. यातून फक्त सरपटत जाता येतं आणि आम्ही ती पार केली. या खाचेतून बाहेर आल्यावर समोर एक पाण्याचं टाक आहे इथून मागे वळून पाहिल्यावर सुलक्यापासून तुटलेली दरड आणि तिचा खरा आकार नजरेत येतो. पुढे उजवीकडे चालत जात आम्ही प्रवेशद्वाराजवळच्या मारुतीपाशी आलो. इथे मारुतीला वंदन करून आम्ही आमची गडफेरी संपवली.














कुर्डुगड/विश्रामगड, हा एक अप्रतिम ट्रेक आहे. गडमाथ्यावरन कोकणचा आणि ताम्हिणी घंटाचा विहंगमय सह्यपरिसर डोळ्यात भरून वाहतो. जवळपास २.३० तसाचा हा ट्रेक आहे वन साइड आणि कस लावणारा आहे. चांगला अनुभव असेल तरचं खाचेची वाट घेण्याचा प्रयत्न करावा अन्यथा रिस्क घेऊ नये.

जाता जाता लक्षात राहिला तो कुर्डूवाडीच्या ठाकरवस्तीत, आपल्या शेणाच्या घराच्या दरवाजात, ऊन खात बसलेला, लांब लचक हात-पाय आणि घाऱ्या डोळ्यांचा तो जीर्ण म्हातारा!

- वैभव आणि सचिन.

आमचा पहिला प्रयत्न व्हीडीओ बनवण्याचा -
https://youtu.be/NlxUvF2RVRk


Comments