पाबरगड, दिवाळीत केलेला मान्सूम ट्रेक....(Pabargad Trek)

दिवाळी एका आठवड्यावर आहे आणि हा पाऊस मृग नक्षत्राससरखा बरसतोय. या पावसाच्या ओव्हरटाईम मध्ये कोणता किल्ला करायचा ह्या पेचात आम्ही होतो. पाबरगड खूप दिवसांपासून हेरून ठेवला होता पण पावसात करण्यासारखा नव्हता म्हणून टाळत होतो. शनिवारी रात्री बऱ्याच पर्यायांवर विचार विनिमय झाला आमचा आणि पाबरगडच ठरला एका आशेवर की तिकडे पाऊस नसेल. नेहमीप्रमाणे रात्री जमेल तेवढा अभ्यास करून आम्ही निघालो रविवारी. सह्याद्रीत भटकणाऱ्या आमच्या सारख्यांचा स्वर्ग म्हणजे भंडारदरा परिसर. रतनगड, अलंग, मदन, कुलंग, कंत्राबाईची खिंड, घनचक्कर, आजोबा आणि कळसूबाई-महाराष्ट्रातले सर्वोच्च शिखर अश्या कातळकड्यानी आणि गडांच्या अभेद्य भिंतींनी हा स्वर्ग व्यापून ठेवला आहे. यावर कमी म्हणून की काय अफाट भंडारदरा डॅम यात आजून भर घालतो. या अप्रतिम सौंदर्यामध्ये पाबरगड हा रांगडा गडी मांडी थोपटून उभा आहे आणि आज त्यालाच भेट देणार होतो. भंडारदराच्या पुढे संगमनेरच्या वेशीवर, रंधा धबधब्याच्या डावीकडे हा उंच गड आकाशाला हात लावताना दिसतो. डोंबिवली वरून जवळपास ५ तासाची बाईक राईड होती म्हणून सकाळी ४.३० लाच निघालो आणि घोटी संगमनेर मार्गे ...