आडवाटेवरचा त्रिंगलवाडी आणि जैन लेणी....(Trek to Tringalwadi fort)
शुक्रवारी रात्री बंगळुरू एअरपोर्ट वर ७ वाजता पोहोचलो; ८.१० ची मुंबईसाठी फ्लाईट होती. ही विमानसेवा काही तांत्रिक अडचणींमुळे स्पाइसजेट ने ६ तास उशिराने करून मला चांगलीच मिरची लावली होती. साला; एक तर माझं गणपतीत गावी जाणं कॅन्सल झालं होत. अगदी आदल्या दिवसापर्यंत, शनिवारी पहाटे गावी निघण्याचा प्लॅन होता पण काही अपरिहार्य (****) कारणांमुळे तो रद्द झाला आणि आता मी एअरपोर्ट वर पडून होतो. फस्ट्रेशन काढण्याचा आणि थोडा ब्रेक मिळवण्याचा एकमेव पर्याय म्हणून मी सचिनला फोन केला आणि रविवारी कुठेतरी पाय मोकळे करायचं ठरवलं.
या रांगड्या सह्याद्रीत अनेक आडवाटेवरचे दुर्लक्षित किल्ले आहेत पैकी एक त्रिंगलवाडी आज आम्ही पहिला होता. आता हा किल्ला इथे का? चौल, कल्याण या बंदरात उतरणारा माल थळ मार्गे नाशिक बाजारपेठेत येत असे या मार्गाच्या रक्षणासाठी हा किल्ला बांधला गेला होता. हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात केव्हा आला ते कळत नाही. पण १६८८ च्या शेवटी मोघलांनी फितुरीने हा किल्ला मराठ्यांकडून जिंकून घेतला. १८१८ साली पेशवाई बुडाल्यावर मराठ्यांनी पुन्हा प्रतिकार करू नये म्हणून इंग्रजांनी तोफा डागून व सुरूंग लावून हा किल्ला उद्धवस्त केला. हा किल्ला कोणी बांधला व त्रिंगलगडाच्या पराक्रमाच्या नोंदी मिळत नसल्या तरी हा किल्ला टेहळणी चौकची काम करीत असल्याचे दिसते.
जायचं ठरलं होतं पण कुठे ते ठरलं नव्हतं. गेल्यावेळी राहून गेलेला एक ऑपशन होता पण मजा नव्हती त्याच्यात! मग काय; परीक्षेच्या आदल्या दिवशी करतात तसा रट्टा मारला आणि अगदी, रविवारी सकाळी ५ वाजता, बाईकवर बसता बसता त्रिंगलवाडीचा पेपर फुटला.
त्रिंगलवाडी किंवा त्रिंगलगड; इगतपुरी पासून ९ किमी पुढे टाके गावातुन एक रस्ता त्रिंगलवाडीकडे जातो. आम्ही तो तुडवू लागलो. रस्त्याची अवस्था, कधीकाळी तो इथे असावा अशीच होती. पुढे पत्र्याची वाडी इथे एका अंगणात गाडी लावून आम्ही वाटेसाठी विचारपूस केली. वाडीच्या चारी बाजूचे डोंगर धुक्यात लपलेले होते त्यामुळे आमचा डोंगर कोणता ह्या प्रश्नाच उत्तर घेतलं आम्ही गावकऱ्यांकडून. शेवटच्या दिवशी घाईघाईत केलेल्या अभ्यासामुळे, सुरवातीलाच आमचा अर्धा मार्क गेला; पत्र्याच्या वाडीच्या पुढे तळ्याच्या वाडीतून वाट किल्ल्यावर जाते आणि या वाडीपर्यंत बाईक जात होती. असो, काही भाताच्या मळ्या पार करून आम्ही तळ्याच्या वाडीपर्यंत पोहोचलो. इथे एका लहानश्या दुकानात माहिती काढली आणि लागलो वाटेला. पुन्हा काही भाताच्या मळ्या आणि लहानसहान ओढे पार करून आम्ही एका तळ्यापाशी आलो. या तळ्याच्या डाव्या बाजूने वाट पुढे घेऊन गेली. वाटेत एक सुंदर वीरगळ एका शेताच्या बांधावर ठेवली होती ती पाहून पुढे थोड्याच वेळात आम्ही जैन लेण्यांच्या समोर येऊन उभे ठाकलो.
महाराष्ट्रात जैनानी आठव्या शतकात लेणी बांधायला सुरवात केली पैकी ही लेणी १३ व्या शतकात १२६६ च्या असपास बांधली गेली असावीत. आवारात अनेक भग्नावशेष दिसून आले. महाराष्ट्रात बौद्धांप्रमाणे जैनांनीही आपल्या धर्माच्या प्रसारासाठी अनेक जैन साधू सगळीकडे पाठविले त्यांनी तीर्थंकर व जैन देवतांची अशी अनेक शिल्पे बनवली. मात्र त्रिंगलवाडीतील ग्रामस्थ या लेण्यांना पांडव लेणी म्हणतात आणि पांडवांनी ती आपल्या बोटांच्या नखांनी ही खोदलीअसल्याचे ते सांगतात. त्रिंगलवाडी गडाच्या पायथ्याशी ही लेणी आयताकार गुहेत कोरलेली आहेत. व्हरांडा, सभामंडप आणि गाभारा अशी एका मंदिराप्रमाणे रचना आहे. व्हरांड्यातील खांब पूर्णपणे उध्वस्त झालेले आहेत. सभामंडप चार दगडी खांबांवर उभे होते पैकी फक्त एकच आता शाबूत आहे. पूर्ण सभामंडप आणि खांब नक्षीकाम केलेले आहेत. गाभाऱ्यात जैन धर्मीयांचे प्रथम तीर्थंकर भगवान आदिदेव ऊर्फ वृषभनाथांची पद्मासनात बसलेली मूर्ती असून, मूर्तीच्या आसनावर दानाचा शिलालेख कोरलेला आहे. मात्र तो आता झिजला आहे. हा शिलालेख प्राकृत संस्कृत असून, नागरी लिपीत आहे. सुरवातीला बाहेर पाहिलेले भग्न अवशेषांमध्ये गाभ्यार्यातील मूर्तीचा अर्धा भाग असावा असा आमचा अंदाज आहे. असो, तो आपला प्रांत नव्हे!
गावकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे लेण्यांच्या डाव्या बाजूने एक वाट गडावर घेऊन जात होती. त्याप्रमाणे आम्ही डावीकडे चालू लागलो, पाऊस आणि धुकं यामुळे अजूनही आम्हाला गडाचं मुखदर्शन झालं नव्हतं. थोडी उभी चढण तोडून आम्ही एका पठारावर आलो, येथे एका पल्यापासून आम्ही पुन्हा डावी वाट धरली, गावकऱ्याने सांगितल्याप्रमाणे. पुढे डोंगराच्या धारेवर दोन लहान दगड एका विशिष्ट उभ्या दगडांपाशी आलो. इथून समोर किल्ल्याच्या उभा कातळकडा दिसत होता. या कड्याची उजवी वाट सोपी आहे तर डावीकडची वाट थोडी कठीण असून सुंदर आहे. आम्ही डावी वाट घेतली. ही वाट कातळाला चिटकून चालत कोरलेल्या पायऱ्यां पर्यंत घेऊन गेली. या पायऱ्यां अगोदर एक लहानसा कातळटप्पा लागला. दोन-तीन स्टेप्स मध्ये तो पार केला आणि कातळात खोदलेल्या उंच पायऱ्या चढू लागलो. जोराचा पाऊस आणि सोसाट्याचा वारा त्या दगडाच्या खिंडीत एक घुमून कानांना सुखावत होता. पावसाळ्यात हाच अनुभव वर्षभर पुरतो आमच्यासारख्या भटक्यांना. या पायऱ्या शेवटच्या टप्प्यात फिरून एका ५ फुटी मारुतीच्या मूर्तीच्या समोर संपल्या. या मूर्तीच्या उजव्या बाजूला कातळात खोदलेलं किल्ल्याच सुंदर प्रवेशद्वार आहे. दोन शरभ शिल्प आणि चंद्र-सूर्य या दरवाज्यावर कोरलेले आहेत. या प्रवेशद्वारातून आता जात आम्ही उजवीकडून गडफेरी सूरु केली. काही अंतरावर दगडात खांब रोवण्यासाठी केलेले खोबणी दिसल्या या पुढे वाड्याचे अवशेष होते. इथून जवळच असलेली किल्ल्याच्या माथ्यावर असणारी वाट आम्ही धरली. तिथे काहीच अवशेष नव्हते आणि पाऊस आणि धुख्यामुळे सभोवतालचा परिसरही पाहता आला नाही. ही वाट तुडवून आम्ही किल्ल्याच्या माथा उतरून आलो इथे उजव्या बाजूला शंकराच लहान मंदीर आहे. ते पाहून आम्ही पुन्हा प्रवेशद्वारासाठीची डावीकडची वाट धरली. वाटेत दोन पाण्याची टाकी लागली आणि पुढे उजवीकडची सोपी वाट दिसत होती. आमच्या वाचन्याप्रमाणे किल्ल्यावर २०-२५ माणसे राहू शकतील अशी गुफा आहे पण ती काय आम्हाला सापडत नव्हती. पुन्हा एक फेरी मारली पण नाहीच सापडली म्हणून मग नाईलाजाने उजव्या वाटेने उतरायला सुरुवात केली. या वाटेवर देखील काही कातळात खोदलेल्या पायऱ्या लागल्या सुरवातीला. पुढे जाऊन मागे वळता एक पुसटशी वाट डावीकडे जात आहे असं वाटलं म्हणून मग गुफेसाठीचा शेवटचा प्रयत्न करायचं ठरवलं. सचिन पुढे गेला आणि मला आवाज दिला त्याने. खरंच ही गुफा अश्या ठिकाणी आहे की ती शत्रुलाही शोधता येऊ शकत नव्हती. पायऱ्या जिथे संपतात तिथे डाव्या बाजूला ५ मिनिटांवर कातळात एक २.५x२.५ फुटाचा एक चौकोन खोदलेला आहे. तो जवळ जवळ २५ फूट आत जाऊन गुफेत उघडत होता. नेहमीप्रमाणे खबरदारी म्हणून आम्ही जोरात आवाज काढून, दगड मारून आत कोणी प्राणी तर नाही ना ही खात्री केली आणि मग गुढघ्यावर रांगत आत गेलो. आत खरंच २०-१ माणसं राहू शकतील अशी मोठी गुफा होती. ती पाहून आमची गडफेरी संपवली आणि गावात उतरून आलो.
आमची या गडाची सफर अगदी चिंब पावसात भिजलेली झाली आणि दाटलेल्या धुक्यामुळे आम्हाला साह्यपरिसर अनुभवता आला नाही हे आमचं दुर्दैव. संकर मंदिरा समोरच्या कड्यावरून पूर्वेला कळसुबाई, उत्तरेला त्र्यंबकरांग, हरिहर, बसगड असा परिसर दिसतो पण तो आज आम्ही पाहू शकलो नाही.
विंड सीटर घालून पावसाळी ट्रेक करणारे आम्ही नाही पण सप्टेंबर महिन्यातही नखशिखान्त भिजवणारा हा मान्सून ट्रेक पुढचे काहि दिवस तरी मनात ओलावा कायम ठेवेल!
- वैभव आणि सचिन.
Comments
Post a Comment