किल्ले जीवधन...पावसात भिजलेला आणि धुक्यात हरवलेला...(Trek to Jivdhan Fort)

या वर्षी पावसाला थोडा उशीरच झाला आणि त्यात मनसोक्त भिजायला आम्हाला पण! म्हणूनच की काय सकाळी ४.३० अंगावर घेतलेला पाऊस आम्ही संध्याकाळी घरी येईपर्यंत खेळवत ठेवलेला होता.



जीवधन.... स्वराज्याच्या 'नमन' नाट्यातील, पहिला, लहानसा 'गण' शहाजी राज्यांनी इथेचं सादर केला होता. १७ जून १६३३, जेव्हा निजामशाही बुडाली तेव्हा त्यांचा शेवटचा वंशज 'मुर्तुझा' याच किल्ल्यावर कैदेत होता. तेव्हा, निजामशाहीचे सरदार शहाजीराजे भोसले यांनी मूर्तझाची सुटका करून त्याला संगमनेरजवळच्या पेमगिरी किल्ल्यावर  निजामशाह म्हणून घोषित केले. निजामशाही टिकविण्याच्या बहाण्याने शहाजीराजांचा हा स्वराज्यनिर्मितीचा प्रयत्न सुरू झाला होता. या कार्यात त्यांना विजापूरचे सरदार मुरार जगदेव हेही सामील झाले होते. कुकडी खोऱ्यातील शिवनेरी, हडसर, चावंड आणि जीवधन या किल्ल्यांच्या मदतीने त्यांनी योजलेली ही चाल मोगलांच्या लक्षात आली आणि मग हे आव्हान मोडण्यासाठी स्वत: शाहजहान दक्षिणेत उतरला. महमद आदिलशाहकरवी मुरार जगदेवची हत्या करण्यात आली. शेवटी उत्तरेच्या या प्रचंड फौजांपुढे  शहाजीराजांचा निभाव लागला नाही आणि त्यांनी हे पाचही किल्ले मोगलांना दिले. पुढे शिवाजी राज्यांनी स्वराज्याचा वग उभा करून शहजीराजांचं स्वप्न पूर्णत्वास नेलं. 
जीवधन...१८१८ मधील मराठे-इंग्रज यांच्या शेवटच्या युद्धाचा एक साक्षीदार. त्या काळाच्या इंग्रज सैन्यातील मेजर एल्ड्रीज याने १६ मे १८१८ च्या बॉम्बे कुरिअर या वृत्तपत्राच्या अंकात या किल्ल्यावर स्वतंत्र लेख लिहिला आहे. युद्धानंतर किल्ला ताब्यात घेतल्यावर त्याने हा पहिल्यांदा पहिला आणि भारावून गेला. तरी इंग्रजांनी आपल्या इतर किल्ल्यांची जी तोडफोड केली तीच अवस्था या किल्ल्याचीही केली, दोन्ही राजमार्गना सुरुंग लावले. 
या आणि अशा अनेक ग्राहणानंतरही आपल्या किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरचे चंद्र-सूर्य अजूनही तसेच तळपत आहेत.












आम्ही सकाळी ४.३० निघून ८.३० ला घाटघर; जीवधनच्या पायथ्याचे गाव गाठलं. गावात थोडी विचारपूस करून पूर्वेकडील अवघड वाटेने जुन्नर दरवाजा गाठायचं ठरवलं. एका लहानशा तळ्याच्या बाजूने जाणारी वाट आम्ही धरली. ही वाट दोन डोंगराच्या घळीतून उभी चढत घेऊन गेली. पावसामुळे बुळबुळीत झालेले दोन तीन कटाळताप्पे पार करून आम्ही अगदी ४५ मिनिटात पहिल्या पायऱ्यांपाशी पोहोचलो. वाटेत पूर्ण वेळ आम्ही धुक्यात चालत होतो आणि चारी बाजुने वाहणाऱ्या लहानसहान झऱ्यांचा आस्वाद घेत होतो. 
पहिल्या पायऱ्या लागल्या आणि त्यांना लावलेलं रेलिंग पाहून हिरमूस झाला. ताशा या पायऱ्या बऱ्यापैकी उंच होत्या, प्रत्येक पायरी दिड-दोन फुटाची असेल. त्यात इथे इंग्रजांनी व्यवस्तीत सुरुंग लावला होता म्हणूनच पुढच्या पायऱ्या पूर्ण तुटलेल्या होत्या. या ठिकाणीही दोन लहानश्या शिड्या लावल्या होत्या. जेव्हा ट्रेक संपल्यावर गावात विचारपूस केली तेव्हा हा सर्व उपद्याप १ वर्षांपूर्वी केल्याचं कळलं. नाही म्हणायला शिडीच्या वरचा २०-२५ फुटाचा पॅच अंगातली थोडीशी रग जिरवण्यासाठी मिळाला. पुढे पुन्हा कातळात खोदलेल्या पायऱ्या लागल्या त्या संपताच आम्ही गडाच्या पूर्व दरवाज्याजवळ येऊन पोहोचलो. दरवाज्या जवळच एका गुफेत ५ पाण्याच्या टाक्या किंवा पहारेकऱ्यांच्या खोल्या असतील बहुतेक, त्या नजरेस पडल्या. या दरवाज्याचे आणि बुरुजाचे फक्त काही अवशेष आता उरले आहेत. गडावर प्रवेश करताच अनेक अवशेष गवतात लपलेले दिसतात. मध्यभागी बालेकिल्ल्याची उंचशी टेकडी दिसली. या टेकडीच्या सुरवातीलाच एखाद मंदिर वाटावं अशी धनयकोठराची वास्तू दिसली. हे दगडाच्या बांधकामाचे कोठार आत खूप मोठं होत. पण आमच्या मोबाईल च्या प्रकाशात ते पाहता आलं नाही. छतावर कमळाच्या आकाराचे नक्षीकाम, ऐकत एक गुंफलेल्या आणि तळघरात घेऊन जाणाऱ्या पायऱ्या होत्या. खूप वाचलं होतं या धनयकोठराबद्दल पण नीट पाहता नाही आलं. 


१८१८ मध्ये झालेल्या शेवटच्या युद्धावेळी या कोठीत मोठय़ा प्रमाणात धान्यसाठा करून ठेवलेला होता. हा साठा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला किंवा त्याला हेतूत: आग लावली गेली. या कोठराच्या बाजूलाच पाच पाण्याची टाकी आहेत ती पाहून आम्ही मुख्य दरवाजाच्या वाटेला लागलो. या वाटेवर एक वाकडी वाट वानरलिंगीकडे घेऊन गेली पण धुक्याच्या आणि पावसाच्या चादरीत आम्हला तो सुळका नीट पाहता आला नाही. परत मागे येऊन आम्ही पश्चिमेकडील प्रवेशद्वाराच्या वाटेला लागलो. वाटेत पुन्हा काही पाण्याची टाकी लागली आणि आम्ही पुन्हा अमृतप्राशन करून घेतलं. या टाक्यांच्या खालच्या बाजूलाच एका नाळेत गडाची पश्चिम वाट दडलेली आहे. प्रवेशद्वाराच्या जवळ जाईपर्यंत ही वाट दिसत नाही. कातळात खोदलेल्या पायऱ्या आणि त्याच कातळात खोदलेला दरवाजा, कामानिवरील चंद्र-सूर्य, दोन बुरुज अस हे दुर्गशिल्प..अप्रतिम. हा गडाचा राजमार्ग होता, इंग्रजांनी तो सुरुंग लावून उडवून दिला. या वाटेच्या सुरवातीलाच काही पायऱ्या पूर्णपणे तुटलेल्या असल्यामुळे कातळाला बिलगून एका लहानश्या दोराच्या साहाय्याने दोन पावलं टाकावी लागली. पुढे आजून काही पायऱ्या उतरून वानरलिंगीच्या बाजूने जंगलात उतरलो.ही वाट थेट नाणेघाटात घेऊन गेली आम्हाला. नानेघाटचा रिव्हर्स वॉटरफॉल  आणि नानाचा अंगठा यांचं दुरूनच दर्शन घेऊन आम्ही इथून पुढे सोप्या वाटेने आम्ही घाटघर गाव गाठलं तेव्हा १ वाजला होता. 

जीवधन हा किल्ला सातवाहन काळात बांधला गेला. पूर्वीच्या नाणेघाट व्यापारी मार्गावर नजर ठेवण्यासाठी हा बांधण्यात आला असावा. नंतर या किल्ल्याचा उल्लेख निजामशाहीतच दिसतो. हा किल्ला म्हणजे एक कातळात कोरलेल्या शिल्पासारखा वाटतो. सगळ्या पायऱ्या जर इंग्रजांनी उध्वस्त केल्या नसत्या तर आज आपल्याला एक सुंदर किल्ला पाहायला मिळाला असता पण ते नशीब महाराष्ट्रातल्या कोणत्याच किल्ल्याला लाभलेलं नाही आणि आपल्यालाही!


- वैभव आणि सचिन.

Comments