४२ विरगळी आणि निमगिरी-हनुमंतगड (Trek to Nimgiri and Hanumant gad)
- Get link
- X
- Other Apps
वाढदिवसाच्या दिवशी तरी घरी रहा! हा उनाडपणा बस झाला आता!
५ वाजण्याच्या आत घरी नाही आलात....तर त्याचं डोंगरावर रहा! आदिवासी कुठचे!
- इती = घरचा किल्लेदार..
उद्याच्या रविवारी, सचिनला ऑफिस मध्ये काम होतं आणि पुढचा म्हणजे महिन्यातला तिसरा रविवार, मला काही काम आहे. महिना वाया कसा घालवायचा म्हणून सचिन शनिवारी सुट्टी घ्यायला तयार झाला आणि मी माझा बर्थडे कोणत्यातरी गडावर हॅप्पी करायचं ठरवलं. '५ च्या आत घरात' यायची ताकीत होतीच म्हणून मग त्यातल्या त्यात जवळचे 'निमगिरी आणि हनुमंतगड' करायचं ठरवलं आणि सकाळी ४.३०लाच निघालो.
मुरबाड-माळशेज घाट मार्गे आम्ही खंडीपाडा हे निमगिरीच्या पायथ्याचं गाव गाठलं. बाईक एका अंगणात उभी करून समोर डोंगरात दिसणाऱ्या किल्ल्यांच्या जोडगोळीची वाट धरली. शाळेच्या समोरून इलेक्ट्रिक टॉवर समोरून थोडं पुढे जाऊन एक विहीर पार करून आम्ही झुडुपात शिरलो. याच गर्द झाडीत काही विरगळी आणि हनुमानाच्या मंदिराचे अवशेष आहेत हे आम्ही वाचलं होतं पण ते परत येताना पाहू हणून आम्ही पुढे चालू लागलो. नेहमीच्या सवयीप्रमाणे वाट भटकलो आणि १५-२० मिनिट वाया घालवली. डोंगराच्या खिंडीत जाणारी वाट शेवटी सापडली आणि आम्ही काही वेळेतच तिथे पोहोचलो.
याच वाटेवर अर्धातास चढून गेल्यावर उजवीकडच्या डोंगराच्या कातळात गुहा दिसली. ही गुहा टेहळणीसाठी बनवलेल्या असावी करण समोर सारा प्रदेश स्पस्ट दिसत होता. इथून कातळात खोदलेल्या पायर्र्यांची वाट आहे. पण पायर्या तुटल्या असल्यामुळे वाट बरीच अडचणीची झाली आहे. सोबत रोप नसल्याने या वाटेने आम्ही गरलो नाही. या वाटेच्याच खाली एक वाट वळणा वळणाने निमगिरी आणि हनुमंतगड यांच्या मधिल खिंडीत आम्हाला घेऊन आली. खिंडीच्या उजव्या बाजूला निमगिरी तर डाव्या बाजूला हनुमंतगड दिसत होता. उजव्या बाजूला असलेल्या कातळ कोरीव पायर्यांच्या साहाय्याने आम्ही निमगिरीच्या गडमाथ्यावर पोहोचलो. डोक्यावर कडक ऊन आणि उभी वाट यांनी आम्ही अगदी घामाघूम झालो होतो.
निमगिरीवर प्रवेश करताना उध्वस्त प्रवेशव्दाराच्या बाजूला पहारेकर्यांसाठी गुहा कोरलेली दिसली. पुढे चालून गेल्यावर ३ पाण्याची टाकी नजरेस पडली. या टाक्यांपासूून पुढेे उजवीकडुन आम्ही गडफेेरी सुरू केेली. काही अंतरावर दोन लहान गुफा आहेत. यात ७/८ माणसांची राहायची सोय होईल एवढी जागा होती. ती पाहून आम्ही पुढे चालत राहिलो. समोर हरिश्चंद्रगडाची टोलार खिंडीची बाजू दिसत होती. थोड पुढे जाऊन आम्ही मागच्या बाजूच्या गडाच्या टेकडीवर आलो. इथे एक गजलक्ष्मीचे मंदिर आहे. मंदिरा समोर खराब पाण्याची दोन टाकी आहेत. या टाक्यांपासून वरच्या दिशेला चढत गेल्यावर ३ समाध्या पाहायला मिळालया. सर्वात वरच्या भागात काही घरांचे व वाड्र्यांचे अवशेष आहेत. येथून हरिश्चंद्रगडाचा बालेकिल्ला आणि टोलारखिंड दिसत होती. समोर चावंडचा किल्लाही दिसत होता. इथे आमची गडफेरी संपवून आम्ही पुन्हा खिंडीत उतरलो.
खिंडीच्या डाव्या बाजूचा हणमंतगड चढायला सुरुवात केली. डोंगरावर चढतांना मधेच कातळ कोरीव पायर्या लागल्या त्या पार करून आम्ही हनुमंत गडाच्या माथ्यावर पोहोचलो. हनुमंतगडाचे प्रवेशव्दार आणि त्याच्या बाजूचे बुरुज शाबुत आहेत. पण प्रवेशव्दार कमानी पर्यंत मातीत गाडलेले आहे. प्रवेशव्दारा वरील व्दारशिल्प विठ्ठलाच्या डोक्यावरच्या टीळयासारखे वाटत होते. प्रवेशव्दार पाहुन प्रवेशव्दारा मागील टेकडी न चढता उजव्या बाजूला तटबंदीच्या कडेकडेने चालत गेल्यावर एक टाक पाहायला मिलाळ. टाक पाहून टेकडी चढुन गेल्यावर बालेकिल्ल्याचे चार बुरुज दिसले. ते पाहून दरवाजापाशी परत आल्यवर आमची गडफ़ेरी पूर्ण झाली.
परतीच्या वाटेवर वनसवरक्षक ऑफिसर साठी बांधलेल्या टॉवर च्या खाली काही वेळ विश्रांती घेतली. नंतर जंगलात त्या ४२ विरगळी शोधण्यात आमचा बराच वेळ गेला. जेव्हा त्या सापडल्या तेव्हा एक वेगळीच भीती वाटली जवळ जायला. त्या झाडीत, एका रांगेत उभ्या केलेल्या ४२ विरगळी आणि त्यावर कोरलेले ते मानवी आकार! सुकलेल्या पाचोळ्यावर वाजणाऱ्या आमच्याच पायांचा आवाज आम्हाला भयाण वाटत होता. बाजूलाच काही अंतरावर एका जीर्ण झाडाखाली मारुतीची मूर्ती दिसली तिला हात जोडून आम्ही गावात गाडीपाशी आलो आणि परतीच्या वाटेला लागलो.
निमगिरी आणि हनुमंतगड हे दोन्ही किल्ले पाहण्यास आम्हाला ४ ते ५ तास लागले आणि कुठेही ब्रेक न घेता मी ५ च्या आत घरात पोहोचलो.
- वैभव आणि सचिन.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment