विहिरींचा मल्हारगड आणि मुरारबाजींचा पुरंदर..(Trek to Malhargad and Purandar fort)

- अरे...गाडी घाल त्याच्यावर...लवकर!
- अरे हो...ट्राय करतोय..नहीतर आपणच पडायचो...
- उद्याची मस्त सोय होईल ****!....खोबऱ्यासरखं लुसलुशीत लागतं मटण...
- गेला ****! जाऊदे...नाहीतरी परमिशन नाही आहे मारायची!

काळेवाडीतून मल्हारगडाच्या पायथ्याशी जाणाऱ्या त्या निर्मनुष्य वाटेवर दोन वेळा ससा आमच्या बाईकच्या पुढे पळत होता. पण अथक प्रयत्यानंतरही या सशाने आमचे कासव केले आणि नाहीसा झाला. पुढे जाऊन या रस्त्याचं काम चालू होतं म्हणून खडींचे डोंगर रचून ठेवले होते. आजूबाजूला फक्त लख्ख काळोख दिसत होता. गुगल मॅप वर मल्हारगड टाकलं आणि त्याने झेंडेवाडीतून/कळेवाडीतून जाणाऱ्या; आजून काम चालू असलेल्या या रस्तावर आणून उभं केलं. काळेवाडीतून डावीकडे रात्री ३ च्या दरम्यान टर्न घेतला होता तेव्हा, आपल्या केस-दाढीहून पांढऱ्या धोतर-बंडी-टोपीतील आजोबा पिंपळाला प्रदक्षिणा घालत होते. ते आजोबा आणि तो पिंपळ या दोन जीर्ण गोष्टी सोडल्या तर बाकी सारा गाव झोपला होता. याच आजोबांना रस्ता विचारावा म्हणून ३.३० ला परत तिथेच आलो तर तिथे फक्त पिंपळ होता आजोबा नव्हते. एवढ्या रात्री कोणाचं दार वाजवायचा म्हणून मग गावापासून काही अंतरावर असलेल्या शाळेत अंथरूण घालण्याचा निर्णय घेतला. या अश्या आडगावातल्या शाळा आणि मंदिरंचं आमच्यासारख्या भटक्यांना विसावा देतात. त्या शाळेच्या व्हरांड्यात भिंतीवर लिहलेले सुविचार वाचत, माझ्या शाळेच्या आठवणीत मी विसावलो. सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग आली तेव्हा ६.३० वाजले होते. आवरलं फटाफट आणि जाग्या झालेल्या गावातील एकाला 'सोनोरी' गावाचा रस्ता विचारला.



सोनोरी; मल्हारगडाच्या पायथ्याचं गावं! याचं गावाच्या नावावरून या किल्ल्याला सोनेरीचा किल्ला पण म्हणतात.  महाराष्ट्रातील सगळ्यात शेवटी बांधल्या गेलेला किल्ला म्हणून हा किल्ला ओळखला जातो. पेशव्यांचे तोफखान्याचे सरदार 'कृष्णराव पानसे' यांनी हा किल्ला १७५७ - १७६० या काळात हा किल्ला बांधला. पुण्याहून सासवडला जातांना लागणार्‍या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली. सन १७७१ - ७२ मध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतो. या किल्ल्याचा उपयोग दिवेघाटावर आणि आजुबाजूच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी होत असे. इंग्रजां विरुध्दच्या बंडात उमाजी नाईक व वासुदेव बळवंत फडके यांनी या किल्ल्याचा आश्रय घेतला होता. सह्याद्रीच्या मूळ रांगेचे दोन फाटे पुण्याच्या दक्षिणीकडील वेल्हे तालुक्यात पसरले आहेत. पैकी एका डोंगररांगेवर राजगड-तोरणा उभे आहेत. दुसरी रांग म्हणजे पूर्व-पश्चिम पसरलेली भुलेश्वर रांग. पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, सिंहगड याच रांगेवर वसलेले किल्ले आहेत.

सोनोरी गावात पोहोचताच, दोन दगडी बुरुजांमध्ये एक प्रवेशद्वार दिसले. हीच ती पानसे सरदारांची गढी. किल्ला बघून मग ती पहावी म्हणून आम्ही किल्ल्यावर जाणारी वाट पकडली. पूर्वेकडच्या मुख्य प्रवेशद्वार अगोदर एक लहानसं नेढे आम्हाला दिसले. समोरच किल्ल्याचा बुरुज दिमाखात उभा होता. मुख्य प्रवेशद्वार दोन बुरुजांनी वेढलेलं होत. लागूनच आत, पहारेकर्यांच्या देवड्या होत्या. आत बालेकिल्ल्याच्या तटबंदी अगोदर एका वाड्याचे अवशेष दिसले. जवळच एक विहीर लागली. किल्ल्याच्या तटाला लागून आम्ही गडफेरी सूरु केली. थोड्या अंतरावर बालेकिल्ल्याच्या मागच्या बाजूला एक कोरीव तळे आहे. तळ्यात उतरण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. बालेकिल्ल्यातून तलावावर जाण्यासाठी तटबंदीत एक दिंडी दरवाजा बांधलेला आहे. तलावाच्या पुढे किल्ल्याच्या टोकाला एक बुरुज दिसला. याच बुरुजावरून समोर आम्हाला काळेवाडी/झेंडेवाडीतून येणार रस्ता दिसला आणि अंदाज आला की आम्ही किल्ल्याच्या किती जवळ आलो होतो काल रात्री. या बुरुजाकडून उजवी कडे पुढे गेल्यावर एक चोर दरवाजा दिसला. याच दरवाज्याने आम्ही काल प्रवेश केला असता. बुरुजाच्या जवळच आजून एक विहीर दिसली. पुढे चालत गेल्यावर किल्ल्याच्या माचीवर नेणारा एक दरवाजा आणि तटबंदीला लागूनच असलेला बुरुज दिसला. या बुरुजाच्या डाव्या बाजूने पुढे, बालेकिल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे. बालेकिल्लाचे बांधकाम चौकोनी असून तटबंदी बरीचशी शाबूत आहे. किल्ल्याच्या पायथ्यापासून स्पष्ट दिसणारे दोन मंदिरांचे कळस याचं बालेकिल्ल्यात आहेत. ही दोन मंदिरे बालेकिल्ल्यात बाजूबाजूलाच असून यातील लहानसे देऊळ खंडोबाचे, तर दुसरे थोडे मोठे देऊळ महादेवाचे आहे. खंडोबाच्या देवळामुळेच या गडाला मल्हारगड हे नाव पडले असावे. महादेवाच्या देवळात शंकराची पिंडी आहे. कोणीतरी आमच्या अगोदर या मंदिरातील दिवा लावून गेले होते आणि देवापुढे प्रत्येकी अर्धा चिकू वाहिला होता. मंदिराच्या मागच्या बाजूला काही वाड्यांचे अवशेष आहेत आणि एक विहिरही. किल्ला पाहून पुन्हा मुख्य प्रवेशद्वारातून आम्ही खाली उतरलो. काही आजून पुरातन विहिरी आम्ही किल्ल्याच्या परिसरात पहिल्या होत्या. किल्ला उतरून आम्ही त्या पण पाहून घेतल्या, पैकी एका विहिरीवर दगडी आड बांधला होता. हा किल्ला आणि परिसर म्हणजे जणू विहिरींची माळ. खूप विहिरी आहेत या किल्ल्यावर आणि परिसरात पण पाणी एकालाही नाही. किल्ल्याच्या पायथ्याशी एका शेतकाऱ्याबरोबर बोललो आणि वाटेत पाहिलेल्या अनेक सुकलेल्या सिताफळबागा आणि आटलेल्या विहिरी याचं कारण कळलं..दोन वर्ष या भागात पाऊस नव्हता!
सोनोरी गावात येऊन आम्ही पेशवे सरदार पानसे यांची गढी पाहण्यास सुरवात केली. दोन बुरुजांमध्ये उभ्या असलेल्या प्रवेशद्वाराने आत जाऊन आम्ही लक्ष्मी-नारायण मंदिर पाहायला सुरवात केली. मंदिराचा दरवाजा कुलूप लावून बंद केलेला होता. या मंदिरातल्या मूर्तीबद्दल खूप वाचलं होतं. या मुर्तीत गरूडाच्या खांद्यावर बसलेला विष्णू व त्याच्या डाव्या बाजूला लक्ष्मी दाखवलेली आहे. हि मुर्ती ७ मार्च १७७४ रोजी कर्नाटक स्वारीच्या वेळी मेळेकोट येथे केलेल्या लुटीत मिळाली होती. याशिवाय दगडात कोरलेली गरुडाची मुर्ती गाभार्‍यातील कोनाड्यात ठेवलेली आहे. पण हे सगळं पाहणं आमच्या नशिबात नव्हतं आज. मंदिराच्या समोर पाण्याच सुकलेल टाक आहे. तर मागच्या बाजूला पायर्‍या असलेली मोठी विहिर आहे. मंदिराच्या उजव्या व डाव्या बाजूस ३ छोट्या देवळ्या आहेत. त्यात उजव्या सोंडेचा गणपती, सूर्य, यांच्या मुर्ती व शिवलिंग आहेत.
मंदिराच्या डाव्या बाजूला तटाला लागून लहानसं गणपती मंदिर आहे. ते पाहून आम्ही मंदिराच्या मागच्या बाजूची पडकी विहीर पाहायला आम्ही गेलो. पायऱ्या असलेली ही विहीर बऱ्यापैकी मोठी आहे. या विहिरीला लागूनच पानसे यांचा वाडा आहे. लाकडी प्रवेशद्वार आणि तटबंदीने हा वाडा सुरक्षित ठेवण्यात आला होता. हा वाडा ३ मजली होता, आता त्याची पडझड झाली असुन एकाच मजली उरला आहे. वाड्यातील शिसवी कमानी आणि देवघर आम्हाला त्या काळात घेऊन गेलं. देवघरात फक्त एक ताक ठेवलेलं होतं. या पडक्या वाड्यात एक आजी आम्हाला भेटल्या; पानसे वावंशजांचे नातेवाईक असल्याचं आणि देखभाल करण्यासाठी इथे राहत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्या पडक्या वाड्यात एक पडत आलेला देह पाहून आम्ही निघालो.


















पुरंदर म्हणजे इंद्र. ज्याप्रमाणे इंद्राचे स्थान अढळ आहे तसाच हा पुरंदर किल्ला. पुराणात या डोंगराचे नाव आहे ’इंद्रनील पर्वत’. हनुमंताने द्रोणागिरी उचलून नेत असताना त्या पर्वताचा काही भाग खाली पडला, तोच हा इंद्रनील पर्वत. 
बहामनीकाळी बेदरचे चंद्रसंपत देशपांडे त्यांनी बहामनी शासनाच्या वतीने पुरंदर ताब्यात घेतला, त्यांनी पुरंदरच्या पुर्ननिर्माणास प्रारंभ केला. त्याच घराण्यातील महादजी निळकंठ याने कसोशीने हे काम पूर्ण केले. येथील शेंदर्‍या बुरूज बांधताना तो सारखा ढासळत होता, तेव्हा बहिरनाक सोननाक याने आपला पुत्र नाथनाक आणि सून देवकाई अशी दोन मुले त्यात गाडण्यासाठी दिली, त्यांचा बळी घेतल्यावरच हा बुरूज उभा राहिला. हा किल्ला सन १४८९ च्या सुमारास निजामशाही सरदार मलिक अहंमद याने जिंकून घेतला. पुढे शके १५५० मध्ये तो आदिलशाहीत आला.

इ. स १६४९ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. याच वेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले, म्हणून शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे आपले वडील कैदेत होते, तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता. महादजी निळकंठराव त्यांच्या ताब्यात किल्ला होता. त्यांच्या भावाभावांमधील भांडणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले. या पुरंदर किल्ल्याच्या सहाय्याने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली. शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले. सन १६५५ मध्ये शिवाजी राजांनी नेताजी पालकर यास गडाचा सरनौबत नेमले. वैशाख शु. १२ शके १५७९ म्हणजेच १६ मे १६५७ गुरुवार या दिवशी संभाजी राजांचा जन्म पुरंदरावर झाला. शके १५८७ म्हणजेच १६६५ मध्ये मोगल सरदार जयसिंगाने पुरंदरला वेढा घातला. या युद्धाचे वर्णन सभासद बखरी मध्ये असे आढळते.

‘तेव्हा पुरंधरावरी नामजाद लोकांचा सरदार राजियाचा मुरारबाजी परभु म्हणून होता. त्याजबराबर हजार माणूस होते. याखेरीज किल्ल्याचे एक हजारे असे दोन हजारे लोक होते. त्यात निवड करून मुरारबाजी याने सातशे माणूस घेऊन ते गडाखाली दिलेरखानावरी आले. दिलेरखान तालेदार जोरावर पठाण पाच हजार याखेरीज बैल वैगरे लोक ऐशी फौज गडास चौतर्फा चढत होती. त्यात होऊन सरमिसळ जाहले. मोठे धोरंदर युद्ध जाहले. मावळे लोकांनी व खांसा मुरारबाजी त्यांनी निदान करून भांडण केले. पाचशे पठाण लष्कर ठार जाहले तसेच बहिले मारले.‘

मुरारबाजी देशपांडे चे हे शौर्य पाहून दिलेरखान बोलिला,

‘अरे तू कौल घे मोठा मर्दाना शिपाई तुज नावजितो‘ ऐसे बोलिता मुरारबाजी बोलिला ‘तुजा कौल म्हणजे काय? मी शिवाजी महाराजांचा शिपाई तुझा कौल घेतो की काय?‘ म्हणोन नीट खानावरी चालिला खानावरी तलवरीचा वार करावा. तो खानाने आपले तीन तीर मारून पुरा केला. तो पडला मग खानाने तोंडात आंगोळी घातली, ‘असा शिपाई खुदाने पैदा केला‘.

खानाने वज्रगड ताब्यात घेतला आणि पुरंदरावर हल्ला केला व पुरंदर माचीचा ताबा घेतला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडला आणि त्याच बरोबर पुरंदरही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंगाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि ११ जून १६६५ साली इतिहास प्रसिद्ध ’पुरंदरचा तह’ झाला. यात २३ किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले त्र्‍यांची नावे अशी,

१ पुरंदर २ रुद्रमाळ किंवा वज्रगड
३ कोंढाणा ४ रोहीडा
५ लोहगड ६ विसापूर
७ तुंग ८ तिकोना
९ प्रबळगड १० माहुली
११ मनरंजन १२ कोहोज
१३ कर्नाळा १४ सोनगड
१५ पळसगड १६भंडारगड
१७ नरदुर्ग १८ मार्गगड
१९ वसंतगड २० नंगगड
२१ अंकोला २२ खिरदुर्ग (सागरगड)
२३ मानगड

८ मार्च १६७० मध्ये निळोपंत मुजुमदाराने किल्ला स्वराज्यात आणला. संभाजी राजांच्या मृत्यूनंतर किल्ला औरंगजेबाने जिंकला व त्याचे नाव ’आजमगड’ ठेवले. पुढे मराठ्यांच्या वतीने शंकराजी नारायण सचिवांनी मोगलांशी भांडून पुरंदर घेतला. शके १६९५ मध्ये छत्रपती शाहू त्यांनी किल्ला पेशवे यांस दिला. अनेक दिवस किल्ल्यावर पेशव्यांची राजधानी होती. शके १६९७ मध्ये गंगाबाई पेशवे यांना गडावर मुलगा झाला, त्याचे नाव सवाई माधवराव ठेवण्यात आले. इ.स १८१८ मध्ये इंग्रजांनी गड आपल्या ताब्यात घेतला. 







एवढा मोठा इतिहास असलेला 'पुरंदर' किल्ला आम्ही गाठला. किल्ला आता भारतीय सैन्याच्या ताब्यात आहे आणि सकाळी ९ ते ५ याच वेळात हा बघता येतो तेही ओळखपत्र दाखवून. आमचं लायसन्स दाखवून आम्ही किल्यात प्रवेश केला. सुरवातीला पद्मावती तलाव लागला. चालायला सुरवात केली आणि इंग्रजांच्या खुणा असलेली दगडी चर्च दिसू लागली. अजून थोडं पुढे उजव्या बाजूस पुरंदरेश्वर मंदिर लागलं. थोडं पुढे चालून गेल्यावर, मुरारबाजींचा एक पुतळा नजरेस पडला आणि हा आपला खरा इतिहास आहे असे वाटले. किल्ल्यावर पाहण्यासारखे बरेच बांधकाम आहे. प्रवेशद्वार, बुरुज, तलाव, वाड्यांचे अवशेष. किल्ला आता सहज पाहण्यास खुला असल्याने एक पिकनिक स्पॉट झाला आहे. काही परदेशी पर्यटकांना आपल्या लहान मुलांसोबत पाहून अभिमान वाटला. अश्या ठिकाणी नेहमीप्रमाणे मन रमलं नाही आणि शक्य तितक्या लवकर गडफेरी आटोपून आम्ही निघालो. किल्ल्याचा इतिहास वाचून तो पहायची एक इच्छा पूर्ण करून आम्ही पुन्हा परतीची वाट धरली.

वैभव आणि सचिन.

Comments