आजून एक भैरव! शिरपुंज्याचा...(Trek to Bhairavgad, Shirpunje)

पुढंचं कोन हाय???

मी!....मनातली सुप्त इच्छा तशीच ठेवून मी गप्प उभा होतो. भैरोबचा पुजारी, डोक्यावर कडुलिंबाच्या पाला ठेवून कौल लावत होता. देवाच्या डोक्यावर पाला तसाच राहिला तर इच्छा पूर्ण होणार आणि तो पडला तर अपूर्ण. माझ्याही काही इच्छा होत्या पण....राहूदेत...

आज आम्ही होतो शिरपुंज्याच्या भैरवाच्या गुहेत. अखंड दगडात कोरलेला अश्वारूढ भैरोबा; समोर उभा पुजारी, खाली आशेने बसलेला गोतावळा आणि एक निरव शांतता.


आज रविवार, भैरोबाचा वार म्हणून थोडे भाविक जमले होते. शिरपुंज्याचा भैरोबा म्हणजे पंचक्रोशीतल्या लोकांचे जागृत दैवत पण आम्ही मात्र गड पाहायला आलो होतो; भैरवगड. महाराष्ट्रातील ६ भैरवगडांपैकी एक; हरिश्चंद्रगडाच्या अंगणातील दुसरा आणि आम्ही पाहिलेला तिसरा...शिरपुंज्याचा भैरवगड. हरिश्चंद्रगडावर राजूर मार्गे येणाऱ्या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी हा गड उभारला होता. शिरपुंजे गावातील या गडावर भैरोबाचे मंदिर आहे, दर वर्षी आश्विन महिन्यात इथे जत्रा भरते आणि तीच आमंत्रणही आम्हाला मिळालं...
पाव्हन! ४ तारखेला देवाची जत्रा आहे..३ तारकेला रात्रीचं या!

डोंबिवलीवरून ४.३० निघून, इगतपुरीमार्गे आम्ही राजूर गाठलं. पेट्रोलपंपाजवळाचा राइट टर्न घेऊन आंबित रास्तावरील १६ किमी वरील शिरपुंजे बु. हे भैरवगडाच्या पायथ्याचे गाव. जत्रा जवळ आल्यामुळे गडावर जाणारी वाट चांगलीच मळलेली होती. वाटेत खूप साऱ्या कातळात खोदलेल्या पायऱ्या आहेत पण आम्हाला मात्र यायला उशीर झाला होता...गावकऱ्यांनी देवाजवळ सहज पोहोचता यावं म्हणून काही दिवसांपूर्वीच रेलिंग लावून घेतले होते. आमचा हिरमूस झाला इथे, असो. पायऱ्या चढून आम्ही किल्ल्याच्या उत्तराभिमुख उध्वस्त दरवाज्याजवळ पोहोचलो. दरवाज्याच्या उजव्या बाजूलाच पाण्याची ५ टाकी होती पैकी एक पूर्ण सुकलेल्या अवस्थेत आहे. या टाक्यांच्या उजव्या बाजूने आम्ही गडफेरी सुरू केली. थोडं पुढे जाऊन आजून दोन पाण्याची टाकी दिसली. यातलं थंडगार पाणी तोंडावर मारून आम्ही पुढे गडाच्या माथ्यावर निघालो. वाटेत आजून एक टाकं लागलं. गडमाथ्यावर एक ठिकाणी जांभळ्या रानफुलांचा एक पुंजका जमिनीवर पसरलेला होता. या सुंदर फुलांचा आणि त्यांच्या सुगंधाचा आस्वाद घेऊन आम्ही डाव्या बाजूने उतरायला सुरुवात केली. या माथ्यावर एके ठिकाणी एका ठिकाणी दगडांचा देव रचलेला दिसला. त्याच्या मागेच एका डोंगरटोकावर आम्ही समोरचा परिसर बघत बसलो थोडा वेळ. समोर हरिशचंद्र गडाची डोंगररांग, कालाडगड, कोथळयाचा भैरवगड स्पस्ट दिसत होते. पुढे डाव्या बाजूने उतरताना दोन पाण्याची टाकी लागली.एका टाक्यातील पाणी स्वच्छ आणि थंडगार होतं ते पोटात आणि बाटलीत भरलं. बाजूलाच दुसरं टाकं होतं, यात एक नंदी आणि काही उध्वस्त मुर्त्या होत्या. घोड्यावर बसलेल्या भैरवाची एक ४/४.५ फूट वीरगळ गुहेकडे जाताना दिसली. गुहेच्या वरच्या बाजूला आजून एक वीरगळ आणि शेंदूर फासलेली गणपतीची जुनाट मूर्ती ठेवली होती. भैरोबाच्या गुहेत पूर्ण दगडात कोरलेली घोड्यावर बसलेली मूर्ती आहे, अशी मूर्ती आजपर्यंत आम्ही पहिली नव्हती. आत भक्त आपल्या देवाला प्रश्न विचारात होते ते ही न बोलता आम्हीही काही वेळ इथे शांत उभे राहिलो देवाची परीक्षा पाहतं. थोड्या वेळाने बाहेर पडून शेवटचं खांब टाकं पाहिलं आणि गडफेरी संपवली.
शिरपुंज्याचा भैरव एक सुंदर गड आहे. जवळ जवळ १५-१६ पाण्याची टाकी; गुहेतला संपूर्ण दगडात घोड्यासकट कोरलेला भैरव आणि गडमाथ्यावरून दिसणारा सुंदर परिसर; सगळंच खूप भारी. खंत एकाचं गोष्टीची; एक ट्रेकर म्हणून; गावकर्यांनी रेलिंग लावून मजा घालवली गडावर जाणाऱ्या राकट वाटेची.















बाजूलाच, भैरवगडला लागूनच, घनचक्करचा डोंगर होता; पण वेळेच्या अभावी आम्ही आज त्यावर पाणी सोडलं. आठवडाभर नोकरीच्या दावणीने बांधलेले बैल आम्ही, समोर कितीही हिरवळ असली तरी वेळेत गोठयात परतावचं लागतं...दुसऱ्या दिवशी डोक्यावर जोकड घ्यायला!

गड उतरून आम्ही बाईकला स्टार्टर मारला, पुढे थोड्याच अंतरावर शिरपुंजे गावातच एका पुलापाशी लहानसा धबधबा दिसला; मग काय! बाईक उभी केली; वाट शोधली आणि मनसोक्त डुंबून घेतलं. ऑक्टोबर हीट चा हा फायदा असतो, अंगाची लाही शांत करायला कोणीच वाट पाहत नाही आणि त्यात असा निरमनुष्य स्पॉट कोण सोडेल!



पुढे परतीच्या प्रवासात, राजूर मार्गे, रंधा धबधबा पाहून घेतला. खरंतर आशा पिकनिक स्पॉट चा आम्हाला कंटाळा पण थोडा वेळ होता आमच्याकडे राखीव तो सर्थकी लावला. रंधा धबधबा, सुंदरच आहे, अप्रतिम! दुधाळलेलं पाणी कड्यावरून स्वतःला झोकून देताना एकाद्या योग्या सारख वाटतं होत. त्यात एक इंद्रधनुष्य म्हणजे त्या योगी महाराजांची प्रभावळचं जणू!
खरंतर आमचं नशीब जोरावर होतं आज, आम्ही योग्य वेळी योग्य ठिकाणी होतो. नुकताच पावसाळा संपलेला, त्यात प्रवरा नदीच्या या पात्रात, भंडारधरा धरणाचं पाणी महिन्यात दोनचं शनिवार/रविवार सोडतात आणि तो रविवार आज होता. खच्चून पाणि होत फॉलला. हे पाणि पुढे संगमनेर मधून गोदावरीत जाऊन मिळतं. या परिसरात आजपर्यंत अनेक टेक केले, कळसुबाई, रतनगड, हरिश्चंद्र, कालाडगड.... पण हा अप्रतिम देखावा पाहायचा योग आजच आला होता. खरतर, मला हा स्पॉटचं माहीत नव्हता, भैरवागडाच्या परिसराचा अभ्यास करताना सापडला आणि मग लिस्ट मध्ये ऍड केला!




परत येता येता, भैरवगडाच्या गुहेच्या दाराशी बसलेली मुलं आठवत होती. सोमवार ते शनिवार शाळेत विज्ञान शिकणारी मुलं आज रविवारी देवाला कौल लावणारे पालक पाहत होती. शाळेच्या बाहेर मिळणाऱ्या  अनुभवांची शिकवण मनाच्या एका कोपऱ्यात ठेवून ही मुलं मोठी होतीलं. जरी कोणी डॉक्टर/इंजिनिअर झाला तरी जीवनातल्या एकाद्या पडत्या प्रसंगात भैरोबाच्या डोक्यावर कडूलिंबाचा पाला ठेवून कौल लावतील!

- वैभव आणि सचिन.









Comments