पर्वतगड (हडसर) आणि शिवनेरी (Trek to Hadsar and Shivneri)

खुटीच्या वाटेने अजिबात जाऊ नका. कालच एकाचा पंचनामा आटोपून आलोय आम्ही!....नसता आमच्या डोक्याला ताप! दूध संकलन केंद्रातील मामांनी आम्हाला ठणकावून सांगितलं. हवा खूपच जोरात वाहत होती आणि खुटीची वाट पण पावसामुळे बुळबुळीत झाल्याचं जमलेल्या सर्वांनीच आम्हाला सांगितलं. त्यात एका पराक्रमी पुरुषाने, गेल्याच आठवड्यात आपली आहुती दिली होती! मग काय खुटीच्या वाटेनं वर चढून, पायऱ्यांनी उतरण्याचा आमचा प्लॅन आम्हाला हडसरच्या दूध संकलन केंद्रात बदलावा लागला. तब्बल साडेतीन तासांची बाईक राईड संपवून, माळशेज घाटाचं गाढ धुकं आणि पाऊस अंगावर घेऊन, सकाळी ८.३० च्या सुमारास आम्ही हडसर गावच्या एका घरातील दूध संकलन केंद्रात जमलेल्या काका-मामांना वाट विचारात उभे होतो. हडसर म्हणजेच पर्वतगड! पुण्यातील, जुन्नर तालुक्यातील नाणेघाटापासून सुरू होणाऱ्या किल्ल्यांच्या माळेतला एक सूंदर मणी. जुन्नरजवळच्या माणिकडोह धरणावरून नाणेघाटाच्या दिशेने घाटघर गावाकडे एक रस्ता जातो. या रस्त्यावरच हडसर गावाच्या डोक्यावर हा अनगड किल्ला आहे. हा जुन्नरपट्टा म्हणजे अलौकीक निसर्गसौंदर्य; नाणेघाटा पासून सुरुवात करून जीवधन , चावंड, शिवनेरी...