सफर तळगड, घोसाळगड आणि कुडा लेण्यांची (Trek to Talgad, Ghosalgad and Kuda Caves)

रघुनाथ बल्लाळ(कोरडे) सबनीस सात पाच हजार मावळे खळक पाइचे घेऊन राजापुरीवर चालिले त्यांनी जाऊन राजापुरी पावेतो तळे, घोसाळे कुल देश मारुन सरद दरियाकिनारा मोकळा केला.
- सभासद बखर

प्राचीन काळापासून कोकणातील मादांड बंदरात उतरणारा माल कुंडलिका नादिमार्गे घाटमाथ्यावर नेला जात असे. या व्यापारी मार्गावर नजर ठेवण्यासाठी  तळगड, घोसाळगड, अवचितगड, ताम्हणघटमार्गे घनगड असे किल्ले बांधण्यात आले. हे सारेच किल्ले आजही आपल्या इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. 
शिवाजी राज्यांनी १६४८ मध्ये आदिलशहकडून तळगड घेतला. याचबरोबर निजमाकडून घोसाळगड जिंकून राजांनी त्याला 'विरगड' असं नाव दिलं. पुढे १६५९ मध्ये सिद्दीने तळगड आणि घोसाळगडला वेढा घातला, पण महाराजांनी अफजल खानाचा वध केल्याची बातमी ऐकून सिद्दीला वेढा उठवून निघून जावं लागलं.  पुरंदरच्या तहामध्ये राजांनी जे १२ किल्ले आपल्याकडे ठेवले त्यात ‘ तळगड, घोसाळगड’ हे किल्ले होते, त्याचवरुन या गडाचे तत्कालीन महत्व लक्षात येते.

अवचितगड गेल्या वर्षी केला; घनगड, ताम्हिणीघाट अगोदरच केला होता. हे दोन्ही; तळा-घोसाळा, गेल्यावेळी राहून गेले होते; म्हणून या मोसमातील पहिला ट्रेक इथेच करावा ठरलं आणि आम्ही निघालो. थोडी वाट वाकडी करून 'कुडा लेणी' पण बघून घेऊ म्हटलं. दोन्ही किल्ले पहाण्यासारखेच होते, पण निराशा केली ती पावसाने; गेल्या रविवारी उतू जाणाऱ्या पावसाने या रविवारी मात्र आपलं भांड लपवालं आणि आमचा पहिला मान्सून ट्रेक अक्षरशः कोरडा केला.

सकाळी ४.३० ला निघून आम्ही ७.४५ ला इंदापूर मार्गे १५ किमीवर असलेलं तळा गाव गाठलं. तळा हे तळगडाच्या पयथ्याचं गाव. गावात, 'वरच्या मोहल्ल्यात' एक सुंदर शिवरायांचं मंदिर आहे. आम्ही आजपर्यंत पाहिलेलं पहिलंच मंदिर. मंदिराच्या बाजूच्या डोंगरावर; राज्याचं खरं देऊळ असलेल्या गडाची तटबंदी स्पस्ट दिसत होती. इथून एक वाट गडावर जाते. डाव्या बाजूला थोडं चालून गेल्यावर, गडावर नेणाऱ्या पायऱ्या लागतात. गावकऱ्यांनी बांधलेली कमान आणि तिथेच पडलेली एक तोफ पाहून आम्ही पायपीट चालू केली. थोड्याच वेळेत आम्ही एका लहानश्या पठारावर पोहोचलो, इथून तळा गावाचा पूर्ण घेरा दिसत होता आणि मागे किल्ल्याचा सुंदर बुरुज. वाटलं आलो किल्ल्यावर म्हणून प्रवेशद्वार शोधू लागलो पण नाही सापडलं कारण ते आजून वर उजव्या बाजूला होतं. या पठारावरून डाव्या हाताला वर चालत गेल्यावर एक लहानशी तटबंदी दिसली पण हे पण प्रवेशद्वार नव्हतं. इथून उजव्या बाजूला एक वाट होती. या वाटेलच लागून वर झुडुपात लपलेला एक बुरुज होता तो पाहून आम्ही ही किल्ल्याच्या उत्तरेला नेणारी वाट धरली. थोडं चालल्यावर, किल्ल्याच्या डोंगराला लागून काही पायऱ्या दिसल्या, आम्ही यांनी वर गेलो आणि आम्हाला किल्ल्याचं प्रवेशद्वार सापडलं. पडझड झालेल्या या दरवाज्याला 'हनुमान दरवाजा' म्हणतात. दरवाज्याच्या उजव्या कोपऱ्यात दगडात कोरलेली हनुमान प्रतिमा आहे. इथेच एक शरभशिल्प पडलेलं आहे. हनुमान दरवाज्यातून आत प्रवेश केल्यावर समोर एक लहान पठार व त्यावर विसावलेल्या ३ तोफा दिसल्या. मागे उजव्या बाजूला बांधीव पायऱ्या, एक बुरुज आणि प्रवेशद्वाराचे अवशेष पहायला मिळाले. या पार करून आम्ही गडमाथ्यावर पोहोचलो. उजव्या हाताला एक भक्कम दोनमजली बुरुज दिसत होता. तो पाहून समोरचा जुना उध्वस्त दिपस्तंभाचा जोता पाहायला मिळाला. या दोन्ही वास्तू पाहून आम्ही उत्तरेकडे गड पाहायला निघालो. दिपस्तंभाच्या जवळच दोन पाण्याची टाकी आणि मंदिराचं जोत आहे. पुढे साय पाण्याची टाकी, धान्य कोठार आणि एक लहानसं शिवमंदिर आहे. आजून काही उध्वस्त अवशेष किल्ल्यावर पाहायला मिळाले. किल्ल्याच्या उत्तर टोकाला एक लहानशी माची आणि बुरुज उत्तम बांधून घेतलेली आहेत. या बुरुजावर माकडांची रेलचेल होती. बुरुजाला लागूनच एक सोंड जाते ती मुद्दामुन तोडून घेतलेली आहे, शत्रूचा शिरकाव रोखण्यासाठी. या माचीवर आमचं तळगड दर्शन संपलं.
तळगड, किल्ला लहानसा पण उत्कृष्ठ जोपासलेल्या आहे. तटबंदी, वास्तू, बुरुज, गडावरची जागा व्यवस्तीत राखलेली आहे. धन्यवाद, 'मी शिवभक्त प्रतिष्ठान' यांना. हा किल्ला पाहताना, राजस्थानातील राखलेल्या किल्ल्याचं पाहतोय अशी जाणीव होत होती. हा लहानसा किल्ला बघताना १ तास कधी गेला कळलंच नाही.









तळा गावात, ४ गरम वडापाव पोटात टाकले, सचिन संकष्टीचा चिवडा घेऊन आला होता त्याचंही आचमन झालं आणि आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो. तळ्यावरून अंदाजे ११ किमी वर रोह्याला जाणाऱ्या रस्त्यावर कुडा लेणी लागतात. कुलकर्णी फार्महाऊस कडे आत वळल्यावर आम्ही कुडा लेण्यासमोर पोहीचलो. ही लेणी इ.स. ३ ऱ्या शतकात बांधली आहेत. कुडा येथील लेणी दोन टप्प्यात कोरली असून क्रमांक १ ते १५ ही लेणी खालच्या स्तरात तर क्रमांक १६ ते २६ ही लेणी वरच्या स्तरात आहेत. ही सर्व लेणी बौद्धांच्या हीनयान पंथाशी संबंधित आहेत, ज्यामध्ये स्तूपपूजा प्रचलित होती. कुड्याच्या २६ गुहांपैकी ४ चैत्यगृहे आहेत. पैकी एका गुहेत, सुंदर लेणी कोरली आहेत. याच गुहेच्या प्रवेशद्वारावर दगडात कोरलेले हत्ती आहेत. यातलं फारसं काही कळत नसल्याने आम्ही फक्त ती शिल्पकला बघून आनंद घेतला आणि निघालो घोसाळगडकडे.







कुडा लेण्यांकडून रोह्याला जाणाऱ्या रस्तावर, खाडीवरचा सुंदर पूल पार करून आम्ही १३ किमीवर असलेल्या घोसाळा या गावी पोहोचलो. ट्रेक सुरू केल्यावर काही वेळातच गडाची तटबंदी नजरेस पडू लागली. ढासळलेल्या प्रवेशद्वाराजवळ दोन शरभशिल्प पडलेली दिसतात. प्रवेशद्वारासमरोच डावीकडे पाण्याचं टाकं आणि तिथेच तटबंदीतून खाली उतरणारा चोरदारवाजा आहे; तो पाहून उजवीकडे आम्ही तटबंदीवर चढलो. ही तटबंदी माचीची होती. उजवीकडे पसरलेल्या माचीवरून आम्ही किल्ला पाहायला सुरवात केली. माची अजूनही तट-बुरुजांनी चांगलीच बांधलेली आहे. माचीच्या बुरजवरून गडाचा बालेकिल्ला उभा दिसतो. बुरुजावरून परत प्रवेशद्वाराजवळून डावीकडे बालेकिल्ला पाहायला काही पायऱ्या आम्ही चढलो. या पायऱ्या पार केल्यावर डावीकडे दोन पाण्याची टाकी आणि एक बुरुज आहे. बालेकिल्ल्यावर नेणारी वाट मात्र उजवीकडून फिरून आहे, आम्ही या वाटेने थोडं पुढे गेल्यावर गडाच्या कोपऱ्यावरची तीन टाकी पहिली, भवानीहौद म्हणतात या टाक्यांना. इथे थोडी विश्रांती घेतली कारण होत इथून दिसणारा निसर्गरम्य परिसर आणि सुटलेला गार वारा. उजवीकडे पुढे जाताना आजून एक टाकं, शिवपिंडी कोरलेला एक दगड आणि कडयात खोदलेली गुफा लागली. थोडं आजून चालून आम्ही गडाच्या डाव्या कोपऱ्यावर आलो इथे एक तोफ पडलेली आहे. बालेकिल्ल्यावर जायची वाट ईथुनचं आहे. ही वाट अत्यंत निसरडी आणि उभ्या चढीची आहे. ही पार करून आम्ही बालेकिल्ला गाठला. बालेकिल्ल्यावर आता काहीच अवशेष उरले नाहीत. थोडा फेरफटका मारून आम्ही परतीला लागलो. रोहा घोसाळ्यातून १० किमीवर आहे.











आजची आमची सफर, कोकणातील दोन अत्यंत महत्वाचे पण दुर्लक्षित किल्ल्यांची होती. किल्ला पाहण्याची आवड असणाऱ्यांनी नक्की पहावे असेच हे किल्ले आहेत.

- वैभव आणि सचिन.

Comments

Post a Comment