पद्मदुर्ग...अजिंक्य जंजिऱ्यावरची जरब! (Padmdurg, Murud)

- पुढची वारी कुठे??
- पद्मदुर्ग !
- किल्ला आहे का हा? कुठे?
- अरे..जंजिरा पाहीलाय का? तिथेच आहे, बाजूला!
- जंजिरा...दोनदा गेलोय...मराठयांच्या दोन्ही महाराज्यांना घेता नाही आला तो सिद्दीचा अजिंक्य किल्ला ना...त्याच्या बाजूचा तो लहानसा किल्ला का!

असा....जंजिरा आजही अजिंक्यच राहिला आहे आणि खुद्द राजांनी बांधलेला पद्मदुर्ग मात्र...अपरिचित! पनवेल पासून लावलेले जंजिऱ्याचे मार्गदर्शक फलकांनी (राज्यांच्या फोटोबरोबर) त्याला प्रसिद्धी मिळवून दिली पण बाजूचाच पद्मदुर्ग मात्र दुर्लक्षित राहिला.


जंजिरा...नो डाऊट..अभेद्य किल्ला, आजही जोमाने उभा असलेला पण..माझ्या लेखी...त्याचा अभेद्यपणा इतिहासात उभा राहिलाय तो फक्त धाडसी आणि कडव्या मराठ्यांच्या धडकेमुळेच....

राज्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर...'पद्मदुर्ग वसवून राजापूरीच्या (जंजिरा) उरावरी दुसरी राजापूरी केली आहे’. जंजिऱ्याच्या सिद्दीच्या कोकणाला होणाऱ्या उपद्रवला आळा घालण्यासाठी राजांनी मुरुडजवळ टेकडीवर 'सामराजगड' बांधला. या किल्ल्याने सिद्दीच्या जमिनीवरील हालचालींवर नियंत्रण आले आणि समुद्रातील हालचालींवर जरब बसवण्यासाठी मुरुड जवळच्याच कासा बेटावर समुद्रात किल्ला बांधण्याचं ठरवलं. ह्या बेटावरून, जंजिरा अगदी नजरेच्या टप्प्यात दिसत होता. किल्ल्याच्या बांधकामाच्या बातमीने सिद्दीला अस्वस्थ केले कारण त्याच्या समुद्रातल्या हालचालींवर वचक बसणार होता. त्याने आपले आरमार घेऊन चढाई केली. महाराज्यांना याची कल्पना होती म्हणूनच त्यांनी सिद्दीचा बंदोबस्त करण्यासाठी दर्यासारंग दौलतखानाची आधीच नेमणूक केली होती. किल्ल्याची रसद पुरवण्याचे काम प्रभावळीचा सुभेदार जिवाजी विनायक यांच्यावर सोपवली होती. या कामात हयगय झाल्याचे कळताच महाराजांनी १८ जानेवारी १६७५ ला जिवाजी विनायक यांना खरमरीत पत्र लिहून त्यांची कान उघडणी केली. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी रात्रं दिवस एक करुन, सिद्दीशी लढत-लढतच किल्ल्याची उभारणी केली. पद्मदुर्गचे पहिले हवालदार म्हणून शिवरायांनी सुभानजी मोहीते यांची निवड केली.

इ.स १६७६ मध्ये मोरोपंत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली फौज देऊन महाराजांनी जंजिर्‍याची मोहिम काढली. या मोहिमेत मचव्यांवरुन तोफांचा मारा जंजिर्‍यावर केला, पण अपेक्षित परिणाम साधला नाही. मग मोरोपंतांनी जंजिर्‍याला शिड्या लावण्याची धाडसी योजना आखली. पद्मदुर्गवर काम करणार्‍या अष्टागारातील सोनकोळ्यांच्या प्रमुखाने, लाय पाटलाने हे जबरदस्त आव्हान स्विकारले. एका रात्री लाय पाटील आपल्या ८-१० सहकार्‍यांसह पद्मदुर्गतुन बाहेर पडून अंधाराचा फायदा घेत जंजिर्‍याच्या पिछाडीला जाऊन तटाला दोरखंडाच्या शिड्या लावल्या व मोरोपंतांच्या धारकर्‍यांची वाट पाहात राहीला. पहाट फुटायची वेळ झाली तरी सैन्य आले नाही. हे पाहून निराश मनाने लाय पाटलाने पद्मदुर्ग गाठला.

लाय पाटलांचे हे धाडस पाहून शिवाजी महाराजांनी त्र्‍यांना पालखीचा मान दिला. पण दर्यात फिरणार्‍या सोनकोळ्र्‍यांना पालखीचा काय उपयोग म्हणून लाय पाटलांने नम्रपणे पालखी नाकारली. यावरुन महाराज काय ते समजले त्यांनी मोरोपंतांना एक नवे गलबत बांधून त्याचे नाव ‘पालखी’ ठेऊन लाय पाटलांच्या स्वाधीन करण्यास सांगितले. याशिवाय राजांनी लाय पाटलास छत्री, वस्त्रे, निशाण व दर्या किनारीची ‘सरपाटीलकी’ दिली.

संभाजी राज्यांनीही, समुद्रात दगडांची भर टाकून, जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला पण तोही खोल पाण्यामुळे फसला. संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत पद्मदुर्ग स्वराज्यात होता. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ही १६८९ मध्ये हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात असल्याचा उल्लेख इंग्रजांच्या पत्रात आहे. त्यानंतर पद्मदुर्ग सिद्दीच्या ताब्यात गेला. मराठ्यांनी पेशवेकाळात परत तो जिंकून घेतला पण त्याविषयी माहिती उपलब्ध नाही. 

पद्मदुर्ग...अलौकिक इतिहास लाभलेला आणि शिवाजी महाराजांनी बांधलेल्या जलदुर्गापैंकी हा एक!
आधीपासुनच दुर्लक्षित राहिलेला हा जलदुर्ग नजीकच्या काळात काही बेकायदेशीर घटनांमुळे कलंकित झालेला.. नंतर नेवीने ताबा घेतलेला.. कालांतराने सरकारी खात्याच्या अमलाखाली आलेला.. जायचे म्हटले तर रितसर परवानगी घेउन.. ! साहाजिकच पर्यटकांपर्यंत कधीच न पोहोचलेला ओसाड पडलेला हा पद्मदुर्ग.. ! 

पद्मदुर्ग....इथे जाण्यासाठी बोट शोधण्याच मोठ जिकरीच काम. इथे जाण्यासाठी खाजगी होडी ठरवावी लागते. हा किल्ला पाहायचं ठरलं आणि बोटीचा प्रश्न सहाजिकच आम्हालाही पडला. दंडाराजापूरीहून मुसलमान लोक आपल्या शिडांच्या होड्या घेऊन जंजिर्‍याला जातात पण पद्मदुर्गवर मुरूडमधील हिंदू कोळी लोक इंजिनाच्या बोटीतून पद्‌मदूर्गावर घेऊन जातात. मुरुड मधील कोळी लोकांचा मुख्य व्यवसाय मासेमारी असल्यामुळे फावल्या वेळातच ते पद्मदुर्गवर येण्यास तयार होतात व त्यासाठी भरपूर पैसेही घेतात. एका होडीतून साधारणत: २० माणसे जाऊ शकतात पण इथे आम्ही दोघेच होतो. गेल्या वर्षी या परिसरात भटकंती करताना गोळा केलेले काही फोन नंबर ट्राय केले पण नो लक! मग ठरवलं, जाऊया आणि प्रयत्न करूया. सकाळी ४.३० निघून ८.३० आम्ही मुरुड कोळीवड्यात पोहोचलो. कोळी बांधव मासेमारीसाठी आपल्या होड्या तयार करत होते. त्यांच्याजवळ विचारपूस केली. खूप विनवण्या केल्यावर आमचं नशीब खुलंल आणि एका आजोबांची बोट सापडली. ते एका ग्रूप ला घेऊन जाणार होते. आमच्या विनंतीला मान देऊन ते तयार झाले आणि आम्हीही!

मुरुड ते पद्मदुर्ग हा ३०-१ मिनिटांचा प्रवास पूर्ण करून आम्ही किल्ल्यावर पोहीचलो. बोटीने  आम्हाला पद्मदुर्ग व त्याचा पडकोट त्यांच्या मध्ये उतरवले. पडकोटाचा भव्य कमळाच्या आकाराचा बुरुजाने  पाण्यातूनच आमचं लक्ष वेधून घेतलं होतं. बोटीतून उतरल्यावर, डाव्या हाताचा पडकोट पाहून घ्यायचं आम्ही ठरवलं. या पाडकोटावर काही वास्तूचे भग्न अवशेष दिसतात. इथून पुढे गेल्यावर आम्ही त्या वैशिष्ट्यपूर्ण बुरुजावर पोहोचलो. बुरुजाच्या चऱ्यांना कमळाच्या पाकळ्यांचा आकार दिलेला आहे. त्यामुळेच या किल्ल्याचे नाव पद्मदुर्ग पडले असेल बहुतेक. या बुरुजावर आजही ३ तोफा समुद्राकडे तोंड करून पडलेल्या आहेत. बुरुजाच्या तटबंदीत, डाव्या कोपऱ्यात कोठार तर उजव्या कोपऱ्यात संडास आहे. पुढे उजव्या बाजूने चालत किल्ल्याची तटबंदी आहे. समुद्राच्या माऱ्यामूळे या तटबंदीची बरीचशी पडझड झालेली आहे. पडकोट फिरताना काही तोफा आणि भग्न वास्तू नजरेस पडतात. पडकोटाच्या सध्या शाबूत असलेल्या तटबंदीच्या बाहेर समुद्रात आजूनही एक तटबंदी पूर्वी होती त्यातली एक तग धरून राहिलेली भिंत नजरेस पडली. 









पडकोटाच्या उजव्या बाजूला किल्ल्याचा एक दरवाजा आहे. या दरवाज्याच्या ५-१ पायऱ्या चढून आम्ही किल्ल्यात प्रवेश केला. किल्ल्याचा मुख्य दरवाजा मात्र फिरून उजवीकडून समुद्रात आहे. प्रवेशद्वाराच्या जवळच मोठा जिना आहे या जिन्याने वर गेल्यावर प्रशस्त ५ फुटी फांजी आहे याचं फंजीवरून आम्ही किल्ल्याला प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली. दोन्ही दरवाज्याच्या बुरुजांवर प्रशस्त झरोके आहेत तोफे साठी. गडाच्या आतल्या बाजूसही अनेक तोफा पडलेल्या आहेत. पडकोटाजवळच्या  दरवाज्या जवळच तटबंदीला लागून अनेक वास्तूंच्या (बॅरक्स) भिंती एका रेषेत आहेत. स्वातंत्र्यानंतर काही काळ हा किल्ला कस्टमच्या ताब्यात होता तेव्हा त्र्‍यांनी या बॅरक्स आणि हौद बांधले असावेत. पद्‌मदूर्गला एकूण ६ बुरुज आहेत. पद्‌मदूर्ग व पडकोट मिळून ३८ तोफा आहेत. गडावरुन सामराजगड व मुरुडचा किनारा दिसतो.
















आज पाहिलेला पद्मदुर्ग आता ओसाड पडला असला तरी इतिहासात याने सिद्दीला वेसण घातली होती. त्याची हीच जिद्द मनात घेऊन आम्ही पुन्हा बोटीत बसलो. जाता जाता...राजपुरीवरून बोट घेऊन जंजिऱ्याला हात लावून आलो. या सफरीत, गाईड ने सांगितलेल्या काही विरुद्ध बाजूच्या  गोष्टी लक्षात राहिल्या... खऱ्या की खोट्या.…माहीत नाही....

१. सिद्दी हा फक्त मसाल्याचा व्यापारी होता आणि सैन्य त्याने आपल्या संरक्षणासाठी उभे केले होते.
२. कसा बेटावर सिद्दी आपले कैदी ठेवायचा आणि राज्यांनी त्यावर कब्जा केला.
३. पद्मदुर्ग किल्ला संभाजी महाराज्यांनी बांधला.
४. जंजिरा किल्ला आणि मुरुडचा किनारा यात एक भुयारी मार्ग आहे.


असो...इतिहासाला नेहमीच दोन विरुद्ध बाजू असतात....
x

- वैभव आणि सचिन

x
x

Comments