नागेश्वर आणि जोडीला वासोटा..सतरा वर्षांनंतर पुन्हा (Tough Day - Trek to Nageswar to Vasota)


सन २००१, नागेश्वरचा एक कातळटप्पा -
विनू - मला *** बनवलं; एक डोंगर सांगून ३ डोंगर चढवले!!!
सचिन - अरे आलो आता..आजून ५ मिनिट फक्त!
नरेश - हे बोरकूट खा!! दम नाही लागणार!!
विकी - अरे चला रे लवकर!! आजून नागशीत लांब आहे....

१७ वर्ष झाली!! पहिला ट्रेक; सचिनने फसवून घडवलेला!! विनू आणि नरेशचा बहुतेक शेवटचाच!

२००१ ची मे महिन्याची दुपार, पार दमलेला विनू, गळ्यात बोरकूटची माळ घेऊन उभा नरेश; आमचा सगळ्यांचा गुरू सचिन, मी आणि ३६चा कोड्याक. फोटोज आहेत आजून नरेशकडे....बघून पोट धरून हसण्यासाठी!!

नागेश्वर; चोरवणे आणि परिसरातली १५ गावं यांचं जागृत देवस्थान; बाराही महिने इथल्या शिवलिंगाला अभिषेक चालू असतो, गुहेच्या कातळ छतातून, तेही गुफेच्या शेंड्यावर पाण्याचा काहीही  स्रोत नसताना.. निसर्गाचं एक आश्चर्यच!!

इथे जाण्याचा आज पुन्हा योग आला वासोट्याच्या ट्रेकच्या निमित्ताने. खरं तर मला वासोटा (व्याघ्रगड) करायचा होता. तो सताऱ्यातून सोपा आहे आणि सगळेच करतात; म्हणून मग 'नागेश्वर ते वासोटा वन डे' करू म्हटलं पण हा ट्रेक माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच जड गेला.

पनवेलला धावपळ करून रात्री १च्या दरम्यान एक बस आणि तिची एक सीट मिळाली. त्या एका स्लीपिंग कोच मध्ये आम्ही दोघे सिटिंग खोच झालो. पेटाऱ्यातून पलायन सारखा सिन वाटत होता. थोड्या वेळाने, सचिन नेहमीप्रमाणे केबिनवासी झाला; त्याला प्रवासात झोप लागत नाही म्हणून ती मी पूर्ण केली. चौपदरी मुंबई गोवा हायवेमुळे आम्ही एक्सप्रेस स्पीडने ६च्या दरम्यान चिपळूणात उतरलो. नातेवाईकांची बाईक घेऊन चोरवणे गावची 'डांगेवाडी' गाठली तेव्हा ८.३० झाले होते. कोवळ्या उन्हात आणि धुक्यात समोरची रेंज काय अफलातून वाटत होती आणि नागेश्वर त्यात फणा काढून उभा होता. एका नजरेत न मावणारी डोंगररांग, चोरवण्याचं खोर; त्यात उतरलेलं धुकं, समोर काळा कातळ-नागेश्वराचा, उजवीकडे वासोटा, सगळंच अप्रतिम एखाद्या मुरलेल्या चित्रकाराच्या कॅनव्हास सारखं!!





चोरवणे, नागेश्वराचे पायथ्याचे गाव, चिपळूणपासून ३०-१ किमीवर आहे. आम्ही ऑलरेडि १.३० तास लेट होतो आमच्या शेड्युलच्या म्हणून मग सुटलो न थांबता. शिंदेवडीतून एक पायवाट सरळ समोरच्या डोंगराच्या सोंडेवर घेऊन जाते आम्ही १७ वर्षांपूर्वी तिथूनच गेलो होतो. आता थोड पुढे डांगेवाडीतून वळणावळणाचा राजरास्ता त्याच सोंडेवर घेऊन जातो. सुरवातीलाच फाडीच्या पायऱ्या लागल्या यांचा आम्हाला कंटाळा येतो आणि या गोल गोल फिरून दमवतात. या पूर्ण करून आम्ही सोंडेवर आलो. इथून पुढे दोन मोठे ट्रायवस मारून नागेश्वराचा कटळटप्पा सुरू झाला. कातळात कोरलेल्या उभ्या पायऱ्या चढून आम्ही गुफेपाशी आलो तेव्हा १०.१५ झाले होते. हा २.३०तासाचा ट्रेक आम्ही १.४५ तासात पूर्ण केला होता. 'मेरा देश बदल रहा है', म्हणूनच की काय पूर्ण वाटेवर लोखंडी रेलिंग, शिड्या आणि साखळ्या लावल्या आहेत. 'आमच्या जमान्यात नव्हतं अस काही!!'.

चोरवाणे ते नागेश्वर ट्रेक जवळ जवळ २.३० तासाचा, उभ्या चढणीचा, आणि उर भरून काढणारा आहे. वाटेत कुठेही पाणि नाही, त्यामुळे भरपूर स्टॉक कॅरी करावा लागतो. शिवरात्रीला आता इथे जत्रा असते, बाकी वर्षभर सहसा कोणी फिरकत नाही. हा पूर्ण भूभाग वनविभागाच्या अख्तरीत येत असल्याने, वन्यजीवनाने समृद्ध बनला आहे.

नगेश्वराच्या गुहेत, ब्यागा टाकून हात जोडले त्याला; तसेच जसे १७ वर्षांपूर्वी जोडले होते. गुहेच्या तोंडावर येऊन परिसर न्याहाळत काही क्षण घालवले. ही जवळजवळ १० मिनिट आम्ही दोघेही शांत होतो. पुढे या नागेश्वराच्या फण्यावर पोहोचलो, सुकलेल्या गवतातून सांभाळत. या सह्यकड्यांच्या मध्ये उभं राहून चहोबाजुंनी घेरलेला हा माझा राकट महाराष्ट्र पाहण्यात जी धग आहे ती काही औरच!!









ताईचा किल्ला; वासोटा (व्याघ्रगड) समोरच डावीकडे पण दूरवर दिसत होता. सन १७०० च्या सुमारास हा किल्ला, पंतप्रतिनिधींच्या उपपत्नी ताई तेलिणिकडे असल्याने, 'ताईचा किल्ला' अस लोकल नाव पडलंय. नागेश्वर कुंडात पाण्याने फुल भरून,  आम्ही वासोट्याचा दिशेला लागलो. ही वाट सुरवातीला डोंगराच्या कड्यावरून घेऊन जाते, खोट्या (छोट्या) नागेश्वरपर्यंत. नागेश्वर आणि वासोटा यांमध्ये एक डोंगर आहे, नागेश्वर सारखाच दिसतो तो म्हणून खोटा (छोटा) नागेश्वर. या डोंगराला उजवीकडे ठेवून वाट जंगलात घुसली. दुपारी १२च्या दरम्यान सुद्धा इथे ढग दाटून आल्यासारखा अंधार होता. पडलेले वृक्ष, आडव्या उभ्या पसरलेल्या वेली, सुकलेले ओहोळ सगळ्यांना पार करत आम्ही वासोट्याच्या बाजूला पोहोचलो. हीच वाट पुढे शिवसागर जलाशयाकडे घेऊन जाते, ती मधेच तोडून उजवीकडे चढून आम्ही वासोट्याच्या हमरस्तावर पोहोचलो. बामणोली वरून येणारी वाट इथेच मिळते. इथली परिस्थिती नगेश्वराच्या अगदी उलट होती. किल्ल्यावर पोहोचताच भ्रमनिरास झाला; मासळी बझार सगळा!! एका शाळेची सहल आली होती आणि पुण्यातल्या एका BPO चे साहेब आपल्या ऍडव्हेनचर टूर साठी आले होते. या अश्या गर्दीतून दूर पळून पुन्हा गर्दीत आल्यासारखं वाटलं. ती गर्दी चुकवत, किल्ला पाहून घेतला.

किल्ला जांभ्यात बांधलेला आहे, कोकणातल्या बहुतेक किल्ल्यांसारखाच. सुरवातीला पायर्‍या लागतात. या पायर्‍यांपासून उजव्या बाजूला एक पायवाट जाते या वाटेने पुढे गेल्यावर एक भग्न दरवाजा दिसतो. हा दरवाजा पाहून परत पाय‍र्‍यांनी वर चढल्यावर आपण वासोटा किल्ल्याच्या उध्वस्त दरवाजाने गडावर प्रवेश करतो. समोरच मारुतीचं बिन छपराचं मंदिर दिसतं. मंदिरापासून प्रमुख तीन वाटा जातात. सरळ जाणारी वाट किल्ल्यावरील भग्नावशेषांकडे घेऊन जाते. मध्ये एक सुंदर शिवालय आणि बाजूलाच एक वास्थु लागते. पूढे ही वाट कड्यापाशी जाते येथून नागेश्वर व कोकणाचे दर्शन होते. मागे येऊन परत मारुती मंदिराच्या उजव्या हाताला एक मोठा तलाव दिसतो. या तलावातील पाणी पिण्यायोग्य नाही. येथून चिंचोळी वाट माचीवर घेऊन जाते. या माचीला पाहून लोहगडच्या विंचूकाट्याची आठवण येते. या माचीलाच काळकाईचे ठाणे म्हणतात. या माचीवरून दिसणारा आजुबाजूचा घनदाट झाडांनी व्यापलेला प्रदेश, चकदेव, रसाळ, सुमार, महिपतगड, कोयनेचा जलाशय हा संपूर्ण देखावा मोठा रमणीय आहे.

काळकाईचे ठाणे पाहून पुन्हा मारुतीच्या देवळापाशी आलो डावीकडे जाणार्‍या वाटेवर एक चुन्याचा घाणा पाडलेला आहे. पुढे गेल्यावर जोड टाकी आहेत. या टाक्यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. पुढे जंगलातून जाणारी वाट पकडून आम्ही बाबु कड्यापाशी येऊन पोहोचलो. या कड्याचा आकार इंग्रजी ’यू’ अक्षरा सारखा आहे. याला पाहून हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्याची आठवण येते. या कड्यावरून समोरच दिसतो तो उंच डोंगर म्हणजेच ‘जुना वासोटा’.

नव्या वासोट्याच्या बाबु कड्यावर उभे राहिल्यावर समोरच उभा असणारा डोंगर म्हणजे जुना वासोटा. आता या गडावर जाणारी वाट अस्तित्वात नाही. तसेच पाण्याचाही तुटवडा आहे. घनदाट झाडे व वन्यश्वापदेही असल्याने सहसा येथे कोणी जात नाही. या गडावर पाहिले कैद्यांना ठेवलं जायचं.














वासोटा; या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल सांगायचं झालं तर पार वसिष्ठ ऋषींच्या काळात जाऊन सुरवात करावी लागेल. वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य, अगस्ती ऋषी यांनी विंध्य पर्वत ओलांडून दक्षिणेकडचा मार्ग शोधला, सह्याद्रीच्या कोयना काठच्या त्या शिखरावर राहण्यास आला व त्याने आपल्या निवासी डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले. कालांतराने या देशीच्या क्षत्रियांनी त्या डोंगराला तटाबुरूजाचे साज चढवून लष्करी ठाणे केले. त्या डोंगराचे परंपरागत ’वसिष्ठ’ हे नाव अपभ्रंश होऊन ‘वासोटा’ झाले. हा किल्ला शिलाहारकालीन असावा. शिलाहारांच्या किल्ल्यांच्या नामावलीत ’वसंतगड’ या नावाने उल्लेखिलेला किल्ला हा वासोटा असावा. राजांनी जावळीच्या मोहिमेत जावळीतील तसेच कोकणातील इतर किल्ले घेतले. पण वासोटा दूर असल्याने किल्लेदाराच्या हाती राहीला. अफझल वधानंतर काढलेल्या मोहिमेतही वासोटा किल्ला येत नव्हता. पुढे राजे पन्हाळगडावर अडकले असताना, आपल्या मुखत्यारीत मावळातील पायदळ पाठवून त्यांनी वासोटा किल्ला दि ६ जून १६६० रोजी घेतला. सन १६६१ मध्ये पकडलेल्या इंग्रज कैद्यांपैकी फॅरन व सॅम्युअल यांना वासोट्यावर कैदेत ठेवण्यात आले होते. १७०६ मध्ये पंतप्रतिनिधींच्या उपपत्नी ताई तेलिणीने हा किल्ला आपल्या हातात घेतला. पुढीलवर्षी पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांनी ताई तेलिणी बरोबर लढाई केली. ताई तेलिणीने आठदहा महिने प्रखर झुंज देऊन किल्ला लढवला. १७३० मध्ये वासोटा किल्ला बापू गोखल्यांच्या हाती पडला.

कोयनेच्या खोऱ्यात; घनदाट अरण्यात वसलेला ताईचा किल्ला आणि आपल्या कोकणाचं राकट रूप दाखवणारा नागेश्वर-चोरवणेचं खोर...एकदा तरी करावा असा ट्रेक आहे! पण सांभाळून, ७-१ तासाचा हा ट्रेक शरीराची आणि मनाची कसोटी लावणारा आहे. आणि हो, जंगली प्राणांपासून सावधान राहा! जवळजवळ दोन हातभार लांब घोरपड आणि डुकरांच्या कळपाने आमचाही रस्ता रोखला होता....

- वैभव आणि सचिन.


x

Comments

  1. खूप छान लिहिलंय,मला सुद्धा हा ट्रेक खूप दिवसांपासून करायची इच्छा आहे.लवकरच मित्रांसोबत प्लॅन करेन तुमचा ब्लॉग वाचून खरंच छान वाटलं

    ReplyDelete

Post a Comment