सफर सेगवा आणि बल्लाळगडची (Trek to Segwa & Ballalgad)
या पिकल्या शेतावर, तुझ्या आभाळाचा जर,
या डोंगर वस्तीवर, भोळ्या संभुची पाखर,
त्याच्या पंखात पंखात, नंदतोया संसार...
आम्ही ठाकर ठाकर, या रानाची पाखरं...
'जैत रे जैत'.... आठवला की आठवते ती 'स्मिता पाटील'!!..काय दिसलीय ती यात...माझी एकचं आणि ऑल टाइम फेवरेट.. पण आज आठवला तो वेगळ्या कारणांसाठी...
या ट्रेक ला, गड तर लक्षात राहिलाच पण जास्त लक्षात राहिले ते इथल्या ठाकर पाड्यावर पाहिलेले चेहेरे आणि त्यावर दिसलेले भाव!
निरनिराळ्या झाडांची पानं तोडून मासळी बाजार मांडलेली काही मुलं पहिली आणि उगाचच बार्बी किचन सेट आणि आर्मर सेट आठवला. असो; विटा-मातीच्या भिंती आणि फक्त शेणाने सारवलेल्या फर्निशड फ्लॅटमध्ये राहणारी ही सुखी (खरंच) माणसं पाहून आम्ही नेहमीच अचंबित होतो.
आमचा आजचा ट्रेक हा पालघर जिल्ह्यातील 'सेगवा' गड होता. जोडीला बजूचाच 'बल्लाळगड' पण उरकून घेतला.
नेहमीप्रमाणे सकाळी ५ला निघून ८ला आम्ही बल्लाळगडाच्या पायथ्याशी होतो. 'काजळी' हे बल्लाळगडाच्या पायथ्याच गाव. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर १३० किमी वर तलासरी आहे. पुढे अंदाजे १९ किमीवर काजळी गाव आहे. या गावातील शाळेसमोरील टेकडीवर बल्लाळगड आहे. नाईट स्टे च्या जागेवरून निसर्गाच्या हाकेला ओ द्यायला जितक्या लांब आपण जातो जवळजवळ तेवढ्याच अंतरात या गडावर आम्ही पोहोचलो आणि गड पाहून हिरमुसुन गेलो. गड कसला गढीच होती ही. लहानश्याया जागेत चार बुरुज उभारून ही चेक पोस्ट उभी केली होती. इतर पाहिलेल्या गडांच्या तुलनेत ही १०बाय१० ची खोलीचं होती. नाही म्हणायला बाहेर एक वीरगळ पडलेली आहे, ती पाहून अर्ध्या तासात आम्ही खाली उतरलो आणि निघालो सेगवा गाठायला.
NH48 वर मुंबईकडे येताना चारोटी नाक्याच्या जवळ जवळ १५ किमी अगोदर करंजविरा गाव आहे. मुंबईवरून जाताना, आराम, अहुरा, अपोलो नावाची मोठी हॉटेल्स यांच्या समोर विरुद्ध दिशेला इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या थोडस मागे करंजविरा गावासाठी फाटा फुटलेला आहे. या रस्ताने थोडं आत गेल्यावर उजव्या हाताला 'सेगवा किल्ला' दिसायला लागला. 'येशूचा मोठा फोटो असलेल्या एका आदिवासी' घरासमोर गाडी लावण्यासाठी, घरातील लहान मुलांची परवानगी घेऊन आम्ही वाटेला लागलो. त्या मुलांची आई घराच्या मागे, थोड्या अंतरावर एका मळीत भात कापत होती. २०-१ मिनिटं या भातांच्या मळ्यांतून चालल्यावर कळलं की गडाच्या पायथ्यापर्यंत रस्ता आहे. ही उगाचच पायपीट झाली आमची पण त्या ठाकर पड्यांमध्ये नाना चेहेरे आणि त्यांचं जीवनमान पाहायला मिळालं. मळीत भात कापणारी थोर मंडळी; लहान मुलांचे, दगड-मातीचे खेळ; कमरेच्या थोडं वर आलेल्यांचा, डोक्यावर भाताच्या पेंढ्या घेऊन आईबरोबर चाललेला, रविवारचा, 'घरचा अभ्यास'; घराची पडवी शेणाने सारवणारे वृद्ध; अंगणात उन्हात पडलेल्या आज्याला त्रास देणारे नातवंड; सगळं कसं सिनेमॅटोग्राफिक होतं.
करंजविरा गावातून डाव्या हाताला लागून आम्ही गड चढायला सुरवात केली. चढण उभी होती, जवळ जवळ ४५ मिनिटांत आम्हाला माथ्यावर घेऊन गेली. गडाच्या या बाजूने बिलकुल हवा नव्हती, त्यात वर आलेल्या सूर्याने आणि दमट वातावरणाने आमचा चांगलाच घाम काढला. आम्ही गडाच्या माचीवर आलो होतो, उजव्या बाजूला ही माची पसरलेली होती आणि डावीकडे गडाचा बालेकिल्ला दिसत होता. आम्ही किल्ला बघून माचीवर यायचं ठरवलं आणि बाये मुड केलं.
बालेकिल्ल्याकडे चालायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजुला हनुमानाचे नविन मंदिर व त्यातील हनुमानाची संगमरवरी मुर्ती दिसली. मंदिर आता गावकर्यांनी बांधले आहे तरी या जागी पूर्वी हनुमानाचे मंदिर असावे असा तर्क लावता येतो.
हनुमान मंदिरावरुन पुढे जाताना माचीच्या दोनही बाजुस उतारावर तटबंदीचे अवशेष पाहायला मिलाळे. शिवकाळात किल्ल्याची पूर्नबांधणी केली गेली तेंव्हा तटबंदीत बांधताना एक प्रयोग करण्यात आला. त्यामुळे ही तटबंदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. तीव्र उतारावर बांधलेल्या या तटबंदीतील दगड ढासळू नयेत म्हणुन ते एकमेकांमधे अडकवण्यात (Locking) आले होते. यासाठी येथील दगडाना इंग्रजी "V" अक्षराचा आकार देउन दोन दगड एकमेका शेजारी ठेउन मधे तयार होणार्या खाचेत ("V") विरुध्द बाजूनी तिसरा दगड लावला जात असे. त्यात चुना भरला जाई. यामुळे दगड एकमेकात अडकून राहात, तसेच बाहेरच्या बाजूंनी तटबंदी दिसतांना अखंड दगडाची दिसे. तीव्र उतारावर बांधलेल्या तटबंदीचे आज मोजकेच अवशेष गडावर पाहायला मिळाले. गडाच्या माचीवर महादेवाचे एक पत्राचं मंदिर आहे. स्वच्छ सारवलेल्या या मंदिरात पिंड, नंदी, कासव आणि गणेशाची मुर्ती आहे. येथे पुजेचे पाणी भरुन ठेवण्यासाठी दगडात कोरलेली एक ढोणी पाहायला मिळते. पुढे बालेकिल्ल्याचा प्रवेशव्दारा समोर असलेल्या पायर्यां चढुन पश्विमाभिमुखी उध्वस्त प्रवेशव्दारातून आपला बालेकिल्ल्यावर प्रवेश होतो. येथुन दोन वाटा फुटतात. सरळ वर चढत जाणारी वाट किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्याकडे जाते. दुसरी उजव्या बाजूने जाणारी वाट पाण्यांच्या टाक्यांकडे जाते. आम्ही उजवीकडची वाट धरली. उजव्या बाजूच्या वाटेने चालायला सुरुवात केल्यावर उजव्या बाजूला दरी आहे, या दरीच्या वर तटबंदीचे काही अवशेष पाहायला मिळले. पुढे एक घळ लागली. बहुतेक या जागी पूर्वी किल्ल्याचा दक्षिणाभिमुख दरवाजा होता. पुढे चालत गेल्यावर पाण्याची दोन कोरडी टाकी पाहायला मिळाली. या टाक्यात सचिनला एक अस्सल जनावर पाणि पिताना दिसलं, कॅमेरा फोकस करेपर्यंत आणि मला तिथे बोलवेपर्यंत ते सचिनला पाहून दगडात शिरलं. मी ओझरत पाहिलं, जवळ जवळ दोन हात लांब आणि मनगटाएवढं माजलेलं होत ते जनावर. त्याचा नाद सोडून आम्ही टाक्याच्या वर जाणार्या पायवाटेने किल्ल्याच्या माथ्याकडे निघालो. माथ्यावर एक वाडा चार बुरुज व तटबंदीने संरक्षित केलेला दिसला. त्यातील ३ बुरुजांचे आणि तटबंदीचे अवशेष उठून दिसत होते. यातल्या एका चौथर्यावर शंकराची पिंड काही पत्रांचा आडोसा करून ठेवलेली दिसली. पुढे परत डाव्या वाटेने खाली उतरून गेलो तिथे पाण्याची दोन टाकी आहेत. यात काही कमळ पण फुलले होते. याच टोकावर बसून आम्ही काही काळ परिसर न्याहाळला आणि गडफेरी पूर्ण करून परत करंजविरा गाव गाठलं.
महाराष्ट्र गुजरातच्या सीमेजवळ सेगवा आणि बल्लाळगड हे दोन किल्ले आहेत. पालघर जिल्ह्यात आणि तलासरी तालुक्यात, मुंबई - अहमदाबाद महामार्गाच्या जवळ असूनही हे किल्ले तसे दुर्लक्षित आहेत. ११ व्या शतकात बांधल्या गेलेल्या आणि शिवकाळात पुनर्बबांधणी झालेल्या सेगवा किल्ल्यावर अनेक अवशेष काळाची झुंज देत आजही उभे आहेत.
किल्ल्याच्या इतिहासाबद्दल सांगायचं झालं तर; ऎतिहासिक कागदपत्रात सेगवा गडाचा उल्लेख सेगवाह या नावानेही येतो. केळवे माहिमचे मुळ नाव मत्स्यमत्, त्याचे पुढे झाले महकावती व नंतरच्या काळात माहिम. प्राचिनकाळी प्रतापबिंब राजाने दमणपासून वाळूकेश्वरापर्यंतच्या (आजची मुंबई) समुद्र किनार्यावर आपले राज्य स्थापन करुन त्याची राजधानी म्हणून महिकावतीची निवड केली. त्याच काळात सेगवा किंवा सेगवाह किल्ला बांधण्यात आला असावा. १४ व्या शतकात गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यात हा परीसर घेतला तेंव्हा हा गडही त्याचा ताब्यात गेला असावा. पुढील काळात या भागावर रामनगरच्या कोळी राजांचे अधिपत्य होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६७२ ते १६७७ याकाळात मोरोपंताना ६००० ची फौज देउन उत्तर कोकणात पाठवले. इ.स. १६७७ ला रामनगरच्या कोळी राजाच्या ताब्यात असलेला प्रांत महाराजांच्या अधिपत्याखाली आला. त्याच काळात सेगवा किल्ला स्वराज्यात दाखल झाला असावा. इ.स. १६८३ पासून पुढील ६६ वर्ष हा किल्ला पोर्तुगिज आणि रामनगर यांच्याकडे होता. चिमाजी आप्पानी काढलेल्या वसई मोहिमेत इ.स. १७३९ मध्ये कृष्णाजी महादेव चासकर यानी सेगवागड जिकुन घेतला. पुन्हा इ.स. १७५४ मधे हा किल्ला रामनगरच्या कोळी राजाकडे गेला. इ.स. १८०२ मधे झालेल्या तहात सेगवा किल्ला पेशव्यांकडे आला. इ.स. १८१७ मधे गोगार्डच्या अधिपत्या खालील सैन्याने सेगवागड जिंकला.
एक दिवसाचा सुंदर ट्रेक आहे हा सेगवा किल्ला. पब्लिक ट्रान्सपोर्टने जाणार्यांनी रेल्वेने डहाणु आणि तलासरी येथे उतरून स्टेशन बाहेर मिळणार्या खाजगी जीप/ओमनी या वाहानानी आंबिवली किंवा करंजविरा फाट्यावर उतरावे. तेथुन चालत अर्ध्या तासात आपण गावातील शाळेजवळ पोहोचतो आणि ट्रेक सुरू करू शकतो.
गावातून निघताना, आम्ही गाडी लावली होती त्या घराच्या पडवीत एक लहानगा आपलं जेवण घेत होता; ताटात काय तर फक्त भात आणि तोंडी लावायला थोडी मच्छी, सचिनने त्याला आपल्याकडचा फराळाचा डब्बा देऊ केला. त्यानेही नाही म्हणून घेतला आणि काय सुंदर स्माइल दिली....दिल खुश हो गया!!!
दिवाळी, ती फक्त आपल्याकडेच, शहरात, आली आणि गेली. या ठाकरांच्या पाड्यावर तर बारमाही शिमगाचं..
- वैभव आणि सचिन.
Comments
Post a Comment