सफर सेगवा आणि बल्लाळगडची (Trek to Segwa & Ballalgad)
या पिकल्या शेतावर, तुझ्या आभाळाचा जर, या डोंगर वस्तीवर, भोळ्या संभुची पाखर, त्याच्या पंखात पंखात, नंदतोया संसार... आम्ही ठाकर ठाकर, या रानाची पाखरं... 'जैत रे जैत'.... आठवला की आठवते ती 'स्मिता पाटील'!!..काय दिसलीय ती यात...माझी एकचं आणि ऑल टाइम फेवरेट.. पण आज आठवला तो वेगळ्या कारणांसाठी... या ट्रेक ला, गड तर लक्षात राहिलाच पण जास्त लक्षात राहिले ते इथल्या ठाकर पाड्यावर पाहिलेले चेहेरे आणि त्यावर दिसलेले भाव! निरनिराळ्या झाडांची पानं तोडून मासळी बाजार मांडलेली काही मुलं पहिली आणि उगाचच बार्बी किचन सेट आणि आर्मर सेट आठवला. असो; विटा-मातीच्या भिंती आणि फक्त शेणाने सारवलेल्या फर्निशड फ्लॅटमध्ये राहणारी ही सुखी (खरंच) माणसं पाहून आम्ही नेहमीच अचंबित होतो. आमचा आजचा ट्रेक हा पालघर जिल्ह्यातील 'सेगवा' गड होता. जोडीला बजूचाच 'बल्लाळगड' पण उरकून घेतला. नेहमीप्रमाणे सकाळी ५ला निघून ८ला आम्ही बल्लाळगडाच्या पायथ्याशी होतो. 'काजळी' हे बल्लाळगडाच्या पायथ्याच गाव. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर १३० किमी वर तलासरी आहे. पुढ...