सफर माहुल - भंडारगडाची (Trek to Mahuli and Bhandargad, Aasangaon)
- Get link
- X
- Other Apps
गणपती गेले गावाला,
चैन पडेना आम्हाला...
अशीच अवस्था झाली होती आमची, गणपती गेल्यावर; पण ही बेचैनी ट्रेकची होती. ऑगस्टच्या पहिल्याच आठवडयात घेरा-सुरगड केला तेव्हाच हे किल्ले करायचं ठरलं. गौरी-गणपती विसर्जन आटपून, शनिवार दिवसभर ड्राइविंग करून मी कंटाळलो होतो; म्हणून तो रविवार गेला. पुढच्या रविवारी सचिनला ऑफीसकाम आलं; तो संडे पण गेला. दीड महिना उलटला आणि शेवटी आज मुहूर्त मिळाला. सचिनने माहुली अगोदार केला होता पण त्याचा भंडारगड राहिला होता. माझ्यासाठी दोन्हीही नवीनच होते. मुंबई-नाशिक हायवेवरुन, आसनगावजवळ डाव्या बाजूने सह्याद्रीच देखणं रूप दिसतं. तीन गड, पाच सुळके नजर रोखून ठेवतात बघणाऱ्याची....माहुली, भंडारगड, पळसगड आणि नवरा, नवरी, भटोबा, वजीर आणि अगदी डाव्या बाजूला एक लिंगी....माहुलीचा हा सुंदर परिवार जवळून बघायला मी खूप दिवसांपासून आतुर होतो. नेहमीप्रमाणे सकाळी ५.३०ला बाइक निघाली डोंबिवलीवरून, नाशिक हायवे पकडून माहुली गावात पोहोचलो आणि ट्रेक सुरू केला तेव्हा ७ वाजले होते.
माहुली -
सकाळी ७ ला ट्रेक चालू केला. वनविभागाचे ऑफिस हवर्स सुरु न झाल्याने, गेट वरून उडी मारून वाट पकडावी लागली. तशी थोड मागे येऊन दुसरी वाट होती, पण मागे कोण येणार परत, म्हणून मग कसरत. वनविभागाने खूप चांगलं काम केलंय या किल्ल्यावर, वाट अगदी दगड मातीने पायऱ्या बांधून करून घेतलीय. वाट काय राजमार्गच तो आमच्या सारख्यांसाठी. पण अशा कोरलेल्या वाटांचा आम्हाला कंटाळा येतो. असो, ही उभी वाट जवळजवळ ४५ मिनिट तुडवुन आम्ही एका पठारावर आलो. पुढे एका सोंडेवरून एका शिडीला लागलो आम्ही. ही शिडी पार करून आम्ही गडमाथ्यावर पोहचलो तेव्हा ८.४५ झाले होते. वाट दम काढणारी होती पण कधी तिरड्याने जांभळी तर कधी दुसऱ्या कोणत्यातरी फुलांमुळे पिवळी झालेली होती. ढगांचा लपंडाव चालूच होता, समोरचे सुळके कधी नुकतेच आंघोळ करून फ्रेश झालेले वाटत होते तर कधी ढगांचं पांघरून घेऊन आळसावलेले वाटत होते.किल्ल्याचा माथ्यावर एक भगवा फडकत होता, त्याच्या इतिहासाची साक्ष देणारा.
शहाजी महाराजांनी माहुली गडाचाच आधार घेतला होता निजामशाही वाचवण्यासाठी. पुढे १६३५-३६ च्या सुमारास शहाजींनी कठीण परिस्थितीत बळकट आश्रयस्थान म्हणून जुन्नर, शिवनेरीहून जिजाबाई व बाळ शिवाजीसह माहुलीला मुक्काम हलवला. खानजमान म्हणजे महाबतखानाच्या मुलाने माहुलीला वेढा दिला. शहाजीराजांनी पोर्तुगीजांकडे मदत मागितली, पण त्यांनी नकार दिला असता शहाजींनी शरणागती पत्करली. १६५८ मध्ये ८ जानेवारी रोजी शिवरायांनी हा किल्ला मोगलांकडून परत मिळवला. पण १६६१ मध्ये तो मोगलांना परत द्यावा लागला. लगेच तो परत जिंकून घेतला घेतला. १६६५ च्या पुरंदरच्या तहात हे दुर्गत्रिकुट परत गमवावे लागले. खुद्द शिवाजीराजांच्या नेतृत्त्वाखाली माहुलीवर फेब्रुवारी १६७० मध्ये केलेला हल्ला मोगलांच्या मनोहरदास गौड या सरदाराने अयशस्वी ठरवला. नंतर १६ जून १६७० रोजी मोरोपंत पिंगळ्यांनी माहुली, पळसगड व भंडारगड हे त्रिकूट दोन महिन्यांच्या वेढ्या नंतर स्वराज्यात सामील करून घेतले. संभाजी महाराज्यांच्या कारकिर्दीत हे किल्ले स्वराज्यातच राहिले. पुढे किल्लेदाराच्या फितुरीने किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला आणि काही वर्षांनी पुुुन्हा मराठयानी घेतला. पुढे किल्ला दुसऱ्या बाजीरावाने तहात इंग्रजांच्या स्वाधीन केला.
आम्ही गड पाहायला सुरवात केली. डावीकडे थोड पुढे गेल्यावर एक पाण्याचं टाक लागलं. नेहमीप्रमाणे पाणि पिऊन मन तृप्त केलं आणि टाक्यापासून उजव्या बाजूने पुढे गेलो. थोड्याच अंतरावर डावीकडे एक वाट भंडारगडाकडे जाणारी दिसली आणि उजवीकडे माहुलीच्या महादरवाज्याकडे. पुढे जाऊन उजव्या हाताला ही वाट खाली जंगलात महादरवाज्याकडे घेऊन गेली. महादरवाजकडे जातांना आणखी एक पाण्याचे टाके लागले. टाक्यापासून उजवीकडे गेल्यावर पहारेकर्यांच्या देवड्या आहेत. समोरच ढासळलेल्या अवस्थेतला महादरवाजा आहे. येथून खाली जाणार्या पायर्या तुटलेल्या होत्या.जमिनीवर उतरलेल्या ढगांच्या बॅकग्राऊंडमध्ये महादरवाजा उठून दिसत होता. पाण्याच्या टाक्याजवळ एका झाडाखाली महादेवाची पिंडी दिसली आणि समारोच राजांची एक लहानसी मूर्ती एका खांबावर विराजमान होती. इथून परत फिरून आम्ही भंडारगडाची वाट धरली. पुढे थोड्या अंतरावर राजवाड्याचे काही अवशेष दिसले थोडं आजून पुढे गेल्यावर माहुलेश्वराच्या मंदिराचा चौथरा आणि समोरच एक मोठा तलाव नजरेस पडला. त्याच वाटेने पुढे, डोक्याच्या वर वाढलेल्या झाडीतून-गवतातून मार्गक्रमण करत आम्ही एका खिंडीजवळ पोहोचलो. ही खिंड म्हणजे माहुली आणि भंडारगड दरम्यानची खिंड. हा माहुलीचा घेरा पार करण्यासाठी आम्हाला जवळजवळ ४०-४५ मिनिट लागली. उजव्या बाजूला उतरून कल्याण दरवाजा शोधण्याचा प्रयत्न केला पण दाट झाडीमुळे तो निष्फळ ठरला. पुन्हा मागे येऊन भंडारगडाच्या कातळाला लागलो.
भंडारगड -
हा माहुलीचाच जोडकिल्ला. माहुली आणि हा एका खिंडीत जोडलेले आहे. याच खिंडीत समोर एक २०-२५ फुटाचा कातळटप्पा पार करावा लागला. आमच्या माहितीप्रमाणे इथे रोप लागणार होती पण तिची गरज पडली नाही. इथे आता ६ फुटाची एक शिडी लावली आहे वनविभागाने. पुढे थोड सांभाळून चढणं आम्हाला जमलं. इथेच गडाच्या तटबंदीचे थोडे अवशेष दिसतात. पुढे पूर्ण गड फिरताना माजलेल्या गवतात आणि झुडपातून वाट काढावी लागली. बहुतेक या गडावर कोणी येत नाही म्हणूनच वाटा मळलेल्या नाहीत. वाटेत हुप्प्यानी थोडा त्रास दिला, किंकाऱ्या देऊन. बहुतेक आम्ही त्यांना त्यांच्यातलेच वाटलो म्हणून बोलवत असतील झाडावर. भंडारगडावर पाहण्यासाठी फक्त एक खांब टाक दिसलं आम्हाला. पुन्हा जवळपास ३० मिनिटांची पायपीट करून आम्ही किल्ल्याच्या दक्षिण टोकाला पोहोचलो आणि समोर दिसणार अविस्मरणीय दृश्य मनात साठवून घेऊ लागलो. दक्षिण टोकापाशी समोरच उभे असणारे भटोबा, नवरा व नवरीचे सुळके दिसत होते, पैकी भटोबाच डोक अगदी स्पष्ट दिसत होत. समोरच उजवीकडे असणार्या डोंगररामागे वजीराचा सुळका होता पण ढगांमुळे तो नीटसा दिसत नव्हता. दूरवर लिंगी, पेन्सिल ने उभी रेष मारल्यासारखी दिसत होती. समोर जी ढगांचा आणि वाऱ्याची चढाओढ चालली होती ती पाहत आम्ही तिथेच बसून पेटपूजा करून घेतली. उजवीकडे ऊन पडल होत आणि वारा उन्हाड होऊन वाहत होता तर सुळक्याच्या डावीकडून ढग स्वतःला रेटत होते, पण हा वारा पुन्हा त्यांना डावीकडे ढकलत होता. हे दृश्य आम्ही कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न केला पण डोळ्यांनी पाहण्यात आणि अनुभवण्यातली मजाच काही और होती.
माहुली-भंडारगडाचा ट्रेक आम्ही १ वाजता संपवला आणि २.४५ला घरी दुपारच्या जेवणाच्या ताटावर येऊन बसलो. ट्रेक खूप लेंधी होता. माहुली गावातून भंडारगडाच्या टोकापर्यंत आम्हाला ३.३० तास लागले. जिम मधल्या लेग-डे पेक्षाही हा ट्रेक-डे थकवणारा होता आमच्यासाठी, पण नाशिक हायवे वरून उग्र दिसणारे, मान वर करून बघावे लागणारे, आकाशाला भिडणारे सुळके, भंडारगडावरून नजर खाली करून बघताना एक वेगळाच आनंद मिळाला...कधीही न विसरता येणारा....
- वैभव आणि सचिन.
x
x
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment