सफर माहुल - भंडारगडाची (Trek to Mahuli and Bhandargad, Aasangaon)

गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला... अशीच अवस्था झाली होती आमची, गणपती गेल्यावर; पण ही बेचैनी ट्रेकची होती. ऑगस्टच्या पहिल्याच आठवडयात घेरा-सुरगड केला तेव्हाच हे किल्ले करायचं ठरलं. गौरी-गणपती विसर्जन आटपून, शनिवार दिवसभर ड्राइविंग करून मी कंटाळलो होतो; म्हणून तो रविवार गेला. पुढच्या रविवारी सचिनला ऑफीसकाम आलं; तो संडे पण गेला. दीड महिना उलटला आणि शेवटी आज मुहूर्त मिळाला. सचिनने माहुली अगोदार केला होता पण त्याचा भंडारगड राहिला होता. माझ्यासाठी दोन्हीही नवीनच होते. मुंबई-नाशिक हायवेवरुन, आसनगावजवळ डाव्या बाजूने सह्याद्रीच देखणं रूप दिसतं. तीन गड, पाच सुळके नजर रोखून ठेवतात बघणाऱ्याची....माहुली, भंडारगड, पळसगड आणि नवरा, नवरी, भटोबा, वजीर आणि अगदी डाव्या बाजूला एक लिंगी....माहुलीचा हा सुंदर परिवार जवळून बघायला मी खूप दिवसांपासून आतुर होतो. नेहमीप्रमाणे सकाळी ५.३०ला बाइक निघाली डोंबिवलीवरून, नाशिक हायवे पकडून माहुली गावात पोहोचलो आणि ट्रेक सुरू केला तेव्हा ७ वाजले होते. माहुली - सकाळी ७ ला ट्रेक चालू केला. वनविभागाचे ऑफिस हवर्स सुरु न झाल्याने, गेट वरून उड...