सफर सुरगड आणि मानगडची (Trek to Surgad and Mangad)

पुच्छ तें मुरडिलें माथां किरीटी कुंडलें बरीं ।
सुवर्ण कटि कांसोटी घंटा किंकिणि नागरा ॥


असे हनुमानाचे ध्यान समर्थांना दिसते. समर्थांच्या मते, हनुमान हा समाजाचा संरक्षण मंत्री, म्हणूनच आपण त्याला गावाच्या वेशीवर बसवलेला; खूप पूर्वीपासूनच. मारुतीची विरमुद्रा मूर्ती जवळ जवळ प्रत्येक गडावर दिसते. या मूर्तींच्या शेपटीचे टोक गडाचा माथा दर्शवतात अगदी 'पुच्छ ते मुरडिले माथा' या ओळीला अनुसरून. गड-किल्ले पाहणाऱ्यांसाठी ही खूणचं. आजपर्यंत पाहिलेल्या मारुतींपैकी सर्वात मोठी मूर्ती मी 'सुरगडावर' पाहिली. चेहऱ्यावर राकट भाव, मिशी, कमरेला खंजीर असलेली आणि पायाखाली पनवती राक्षसीणीला चिरडलेली मूर्ती  खरच 'भीमरूपी महारुद्र' होती.

गेल्या वर्षी आम्ही कुंडलिका नदीचा उगम म्हणजे 'भीरा' गाव (देवकुंड) आणि ती अरबी समुद्राला मिळते तो किल्ला म्हणजे कोर्लई हे दोन्ही पाहिले. कुंडलिका ही कोकणातली एक प्रमुख नदी. प्राचीन काळा पासून या नदीतून व्यापार चालत असे. घाटावर जाणारा माल विविध (ताम्हणी, थळ घाट इत्यादी) घाटमार्गंनी घाटमाथ्यावरील बाजारपेठेत जात असे. याच व्यापारी मार्गांचे रक्षण करण्यासाठी बंदर, घाटमार्ग व घाटमाथा अशी किल्ल्यांची साखळी उभारली केली गेली. कुंडलिका नदीच्या (खाडीच्या) मुखावर असलेला कोर्लई किल्ला आणि रेवदंडा किल्ला व नदितून तीच्या खोर्‍यातून जाणार्‍या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी तळा, घोसाळ सुरगड इत्यादी किल्ले अशी किल्ल्यांची साखळी उभारली गेली. याच साखळीतील एक महत्वपूर्ण गड म्हणजे खांब गावाजवळील 'घेरा सुरगड' करण्याचं आम्ही ठरवलं. "एवढ्या लांब जाऊन फक्त एकच किल्ला करायचा; मजा नाय!!"...म्हणून मग 'मानगड' पण सिलायबस मध्ये ऍड करून अभ्यास आणि प्लॅनिंग केली.


मानगड -
प्लॅन के मुताबिक; आम्ही रात्री १०.३०च्या सुमारास डोंबिवलीवरून निघालो ते माणगांव गाठण्यासाठी पण कोलाड च्या अगोदरच पावसाने जोरदार ब्याटींग सूरु केली आणि आम्ही हायवेला लागून असलेल्या एका बंद मंगल कार्यालयाचा आसरा घेतला. पावसाची ती लॉंग इंनिंग पाहून ओसरीवर आम्ही पासरलो. रात्री २ ते ५ दरम्यान गरजूंना मुबलक रक्तदान करून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. माणगांव एसटी डेपो समोरूनच डावीकडे वळून निजामपूर - बोरवाडी मार्गे आम्ही मशिदवाडीत पोहोचलो. माणगांव वरून १७ किमी वर आहे ही वाडी; मानगडाचा पायथा.

वाडीतून समोरच एक छोटेखानी किल्ला व वर फडकणारा एक विदीर्ण इंद्रध्वज दिसत होता. ६.४० ला आम्ही किल्ला चढायला सुरुवात केली आणि ७.४५ पर्यंत हा लहानसा किल्ला आटपून खाली येऊ अस ठरलं. सकाळी ७ वाजता आम्ही पठारावरील विंझाई देवीच्या मंदिरासमोर होतो. या मंदिराच्या मागून कातळात कोरलेल्या पायऱ्या किल्ल्यावर घेऊन जात होत्या. या निसरड्या पायऱ्या पार करून आम्ही किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोर पोहोचलो. दोन सुस्थितीतल्या बुरुजांनी हे प्रवेशद्वार मजबूत केले होते. आत शिरताच लहानशी हनुमानाची मूर्ती आणि उजवीकडे गडावर जाणाऱ्या पायऱ्या दिसल्या. आम्ही उजवीकडून किल्ला पाहायला सुरवात केली. उजवीकडे ७ पाण्याची टाकी आहेत पैकी २ खांबटाकी आहेत. एका पाण्याच्या टाक्यात एक लहानश्या सापानी केलेली बेडकांची शिकार पाहायला मिळाली आम्हाला. या टाक्यात त्या बेडकचा ओरडण्याचा आवाज चांगलाच घुमत होता. पुढे सारी टाकी पाहून आम्ही चोरदरवाज्या जवळ पोहोचलो. इथून मागे फिरून आम्ही पुन्हा मुख्य प्रवेशद्वाराजवळून डावीकडे गडफेरी सुरू केली. प्रवेशद्वाराला लागूनच धान्य कोठार आणि दोन पाण्याची टाकी होती. एक टाक बुरुजाच्या तटबंदीला लागूनच होत. ह्या टाक्यांच्या मधून पुढे गेल्यावर एक लहान पण कठीण कातळटप्पा पार करून आम्ही गडमाथ्यावर आलो. इथे तो ध्वज, पाण्याची दोन टाकी, उध्वस्त वाड्याचे अवशेष पाहायला मिळले. श्रावणातल्या उनामुळे, इथून सह्याद्रीच्या पर्वत रांगांचे मोहक दृश्य पाहायला मिळाले. रायगडाच्या टकमक टोकाचे ओझरते दर्शन सुद्धा झाले इथून.

रायगड स्वराज्याची राजधानी केल्यावर युध्दशास्त्राच्या दृष्टीने तो बळकट करण्यासाठी रायगडाच्या चोहोबाजूंनी किल्ल्यांची साखळी तयार केली राजांनी. मानगड, पन्हाळघर, सोनगड, चांभारगड, लिंगाणा या उपदुर्गांची निर्मिती केली आणि काही जुने गड मजबुत केले.

मानगड हा एक छोटा पण पाहण्यासारखा किल्ला आहे. आम्हाला हा पाहण्यासाठी जवळ जवळ १.३० तास लागला. दुर्गफेरी संपवून आम्ही जेव्हा मशीदवाडीत आलो तेव्हा ८.४५ वाजले होते.
















सुरगड (घेरा सुरगड) -
माणगांव वरून मागे, मुंबई-गोवा हायवेवर 'खांब' गावाकडून डावीकडे एक रस्ता 'घेरा-सुरगड' कडे जातो. आम्ही इथे पोहोचलो तेव्हा १०.४० झाले होते. वेळ न दवडता थोडी वाटेची माहिती काढून आम्ही सुरवात केली. एक ओढा ओलांडून, विहिरीच्या उजव्या बाजूने जंगलातून उभा चढ चढून गेल्यावर आम्ही एका पठारावर आलो. आमच्या माहिती नुसार या पठारावरून डाव्या बाजूने आम्ही वाटेल लागेलो. वाटेत एक ठिकाणी 'अणसाई देवी आणि गडाकडे' अशी पाटी लागली आणि या पाटीवरचा गडकडाचा लहानसा बाण आम्ही मिस केला. पुढे अणसाई देवीचे दर्शन घेतले, इथेच 'चोर दरवाज्याकडे' अशीही पाटी होती. आम्ही पुन्हा मुख्य रस्ताला येऊन पुढे चालत राहिलो. थोडं पुढे गेल्यावर, उजव्या बाजूला किल्ला दिसत होता पण गावकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे डोंगरातली उभी, गडावर जाणारी घळ मात्र दिसत नव्हती. जवळ जवळ अर्धा तास चालल्यावर लक्षात आलं की आपण भटकलो, नेहमीप्रमाणे...मग काय, पुन्हा मागे येऊन चोरदरवाजाने जायचं ठरवलं आणि घुसलो जंगलात उभा चढ चढायला. काही अंतरावर एक मेंढातोफ दिसली, बहुतेक गडाच्या बुरुजावरून पडली असावी ती कधीतरी. थोडं चढून आम्ही अगदी बुरुजाच्या खाली पोहोचलो आणि बाजूची एक घळ पहिली पण ती अप्रोचेबल नव्हती मग लागलो पुन्हा तर्क लढवायला. खाली लांब पुसटशी एक वाट दिसत होती पण तिथपर्यंत उतरून जाऊन पुन्हा चढायला वेळ नव्हता आमच्याकडे. मग तीच वाट वर कुठे मिळते याचा अंदाज बांधून भिडलो आम्ही कातळ कड्याला आणि तोल सांभाळत ती वाट शोधली. बरोबर पार्टीसिपंट नसले की अशी कॅलकुलेटेड रिस्क घेता येते. याच वाटेने पुढे कातळात कोरलेल्या काहि पायऱ्या चढून आम्ही चोरदरवाज्याजवळ पोहोचलो. या दरवाज्याला लागून असलेली तटबंदीवर पायऱ्या केलेल्या आहेत, बुरुजावर घेऊन जाण्यासाठी. कोकण परिसराच रम्य दृष्य इथून दिसत होतं. मग इथे थोडा वेळ शांत बसलो, खरं तर या विव्ह साठीच ह्या सगळ्या उचापती करतात ट्रेकर्स. बुरुजाला लागूनच एक पाण्याच टाक आहे. पुढे डाव्या बाजूने चालत आम्ही किल्ल्या पाहायला सुरवात केली. आमच्या प्लॅनिंग प्रमाणे आम्ही या बुरुजावर शेवटी असायला हवे होतो आणि चोरदरवाज्याने उतरायचं ठरवलं होतं, पण खाली झालेल्या गोंधळामुळे, प्लॅन मे थोडा चेंज रहनेका!!....पुढे चालत एका पठारावर एक शिलालेख दिसला. त्यावर २ भाषांमध्ये माहिती कोरलेली होती, वरच्या बाजूला अरबी भाषेत ज्या ओळी लिहिल्या आहेत त्याचच भाषांतर खाली देवनागरी मध्ये केलेलं आहे. बहुतेक किल्ल्याच्या बांधणीची आणि किल्लेदाराची माहिती होती ही. पुढे एक वीरगळ पाहायला मिळाली, दगडी चौथरे होते पन ते मानेपर्यंत वाढलेल्या गवतात दिसेनासे झाले होते.पुढे पाच पाण्याची टाकी आहेत, इथे थोडं पाणी पिऊन आम्ही तृप्त झालो. थोडं पुढे पडलेल्या अवस्थेतिल एक कोठार आहे. याचाच बाजूला, एका हेमाडपंथी मंदिराचे अवशेष आहेत त्यात एक महादेवाची पिंड आणि भैरव, भैरवीची दगडात कोरलेली मुर्त्या पाहायला मिळतात. डाव्या दिशेने पुढे जाऊन सुरगड माचीवर आलो. माचीवरून ढोलवाल धरण, कुंडलिका नदीच पात्र आणि घनदाट अरण्य असे विहंगम दृश्य पाहायला मिळते. याच माची वरून घोसाळगड आणि अवचितगड दिसतात तर विरुद्ध दिशेला मिर्‍या डोंगर / मिरगड पाहायला मिळतात. पुढे याच माचीवरून उजव्या बाजूने थोडं खाली उतरलो आणि समोर एक पाण्याचं टाक दिसल पण वाट इथून नव्हती म्हणून मग पुन्हा मागे येऊन उजव्या बाजूला गेलो आणि इथेच एका चौथऱ्यावर ती हनुमानाची मूर्ती दिसली. फायनली!...आम्ही गडाच्या मुख्य प्रवेशद्वारावर होतो आणि आमची गडफेरी पण पूर्ण झाली होती. इथूनच ती घळ आम्हाला दिसली जी आम्ही मिस केली होती. या घळीतून पुढे पावसाने निसारडा झालेला एक कठीण कटलटप्पा उतरून आम्ही मुख्य वाटेल लागलो. पुढे ४५ मिनिट उतरून आम्ही पुन्हा त्याच पाटी पाशी पोहोचलो....'अणसाई मंदिराकडे आणि गडाकडे'....या वेळी तो लहानसा बाण आम्हाला जरा जास्तच स्पष्ट दिसला आणि आमची चूक उमगली. या पाटीच्या उजव्या बाजूला वाट जंगलात शिरत होती पण गर्द झाडीमुळे आमच्या नजरेतून ती निसटली आणि आम्ही अणसाई मंदिराच्या पुढे वाट शोधू लागलो. असो!..वाट चुकणं आणि ती शोधणं यात एक वेगळीच मजा असते आणि आम्ही ती जवळ जवळ नेहमीच अनुभवतो...पुढे पठारावर येऊन पुन्हा अर्धा तास खाली उतरून आम्ही सुरगड वाडी गाठली. वाटेत त्या ओढ्याच्या थंड पाण्यात आमचं शरीर आणि मनही शांत केलं....पुढच्या प्रवासासाठी.....

- वैभव आणि सचिन

















काही व्हिडीओज -

https://youtu.be/AEnhDlFfkA4

https://youtu.be/bdeujlJ2Rzs

https://youtu.be/9OaTJqaSlG

टीप -

१. दोन्ही किल्ले सुस्थितीत आणि किल्ले पाहणाऱ्यासाठी पर्वणी आहेत. रात्री ट्रावल केल्यास, सुरगड वन डे ट्रेक साठी उत्तम पर्याय आहे.

२. दोन्ही किल्ल्यावर दुर्गवीर संस्थेने मोलाचे कार्य केले आहे आणि जागोजागी दिशादर्शक फलक लावले आहेत.

३. सुरगड जरी मध्यम श्रेणीतला ट्रेक असला तरी, फ्रेशर्ससाठी थोडा जड आहे तो लहान लहान रॉक पँचेस मूळे, या सीझन मध्ये.

४. दोन्ही किल्ल्यावर मानेपर्यंत गवत वाढलं आहे तरी शॉर्टस किंवा स्लीवलेस टीशर्टस टाळवे. अंगभर कपडे प्रेफेर करावे नाहीतर इचगार्डच्या फॅमिली पॅक चा खर्च करावा लागेल फुल बॉडी साठी.

५. गडावरील पाण्याच्या टाक्यात कोणी उतरण्याचा प्रयन्त करू नये. गावकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे काही दिवस अगोदरच एक महाभाग बुडाला होता. 

Comments

Post a Comment