कोंकण किल्ल्यांची सफर...भवानीगड, कर्णेश्वर, महिमतगड, कोळकेवडी दुर्ग, गोपाळगड, गोविंदगड-गोवळकोट ( Trek to konkan range...Bhavanigad, Karneshwar, Mahimatgad, Kolkevadi, gopalagad, govindgad-Govalkot )
आम्ही दऱ्या-डोंगरचे राहणार,
चाकर शिवबाचे होणार....
सचिनच गाणं.....ट्रेकभर गुणगुणत होता हा गडी. पूर्ण गाणं फार सुंदर होतं. पुन्हा कधीतरी पाठ करून लिहीन, तोपर्यंत आमच्या या वर्षीच्या पहिल्या ट्रेक बद्दल....
शाळा कॉलेजातली जवळजवळ प्रत्येक उन्हाळी सुट्टी माझ्या ज्या कोकणातल्या घरात घालवली, त्याच्याच अंगणात पसरलेल्या काही गडांना भेट देण्याची इच्छा अनेक दिवसांपासून होती. आभ्यास करून काही जागा हेरल्या आणि दोन दिवसांची मोहीम आखली.
खर सांगायचं तर ही ठिकाणं इतकी सुंदर असूनही दुर्लक्षित वाटली, सहाजीकच...कोकणातील आहेत ना म्हणूनच!!
आमच्या कोकणच्या मोहिमेची सुरवात आम्ही रत्नागिरीतील काही दुर्ग, किल्ले आणि पुरातन मंदिरापासून करायचं ठरवल; भवानीगड, कसबा कर्णेश्वर मंदिर, महीमतगड, कोळकेवाडीदुर्ग, गोपाळगड आणि गोविंदगड (गोवळकोट); पैकी महीमतगड हा माझ्या गावापासून हाकेच्या अंतरावर आणि तरीही मला आजपर्यंत अज्ञात. त्या वयातली आणि त्या सुट्टीतली आमची आवड आंबा/फणस, बॅट/बॉल, एकत्र आलेले भाऊ/बहिणी यापलीकडे कधी गेलीच नाही म्हणून असेल बहुतेक. उन्ह्याल्याच्या सुट्टीत आंब्यानी बहरलेल्या झाडावर दगड मारून पिकलेली बिटकी बरोबर पडायचा छंद आजच्या समर व्हेकेशन मध्ये नवीन विडिओ गेम शोधणाऱ्या मुलांना नाही कळणार. आता ते वयही गेलं आणि आणि तो छंदही! पण हा गड-किल्ल्यांचा, भटकंतीचा वेगळाच छंद लागला...आणि तो उरलेल्या वयाबरोबरच संपणारा बहुतेक.
सचिन आणि मी दोन दिवसांची कोकण सफारी आखली. गड, किल्ला, दुर्ग, कोट, पुरातन मंदिर असा भरगोस प्लॅन आखला आम्ही. २३ तारखेला रात्री पनवेल एसटि डेपो वर कोकणात जाणाऱ्या गाडी पकडायच ठरलं होतं पण लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे आमचा प्लॅन खूप जणांनी कॉपी-पेस्ट केल्याचं या लाल डब्यांच्या मागून धावताना जाणवलं. म्हणून मग लक्सरी बस पकडण्यासाठी डेपोतून बाहेर आलो; परत तोच प्रोब्लेम, शेवटी वेळ वाया जात असल्याने एका गाडीच्या ड्रायव्हर केबिनमध्ये बसून आम्ही चिपळूण गाठलं सकाळी ५च्या सुमारास. इथल्या माझ्या एका नातेवाईकांकडून बाईक उसनी घेऊन आम्ही साडेसहाला संगमेश्वरच्या दिशेने निघालो आमचा पहिला गड पाहायला, 'भवानीगड'.
भवानीगड -
चिपळूण पासून संगमेश्वरला जाताना ३५ किमी वर 'तुरळ' फाट्यावरून 'कडवई' गावी हा किल्ला वसलेला आहे. २-१ किलोमीटरच्या तुरळ ते कडवई या प्रवासात भेटलेल्या प्रत्येक शाळकरी मुलाला आम्ही वाट विचारली. २ किमी....एवढे चालले तर ही मुलं शाळेऐवजी कॉलेजात पोहीचतील असा एक फालतू पीजे मी मारला आणि सचिनने तो पचवलासुद्धा. कडवई गावच्या म्हादगेवाडीतुन एक वाट किल्ल्यावर जाते. आमच्या वचनाप्रमाणे ४५ मिनिटांची खडी चढाई या किल्ल्याला होती. पण आम्हाला वेगळेच चित्र पाहायला मिळालं. या चढाईची जागा आता पायऱ्यांनी घेतली होती. गावकऱ्यांनी सुंदर पायऱ्या बांधल्या आहेत आता. माहीत नाही ती माहिती किती जुनी होती, आमचा थोडा हिरमुस झाला. पायऱ्या चढून गेल्यावर किल्ल्याच प्रवेशद्वार नजरेस पडलं, याच्याच थोडं अगोदर डाव्या बाजूला पाण्याची तीन भुयारी टाकी नजरेस पडली. सुबकपणे दगडात कोरलेली. आम्ही ही टाकी पाहून किल्ल्यात प्रवेश केला आणि समोरच भवानी मातेचे कैलारू मंदिर दिसलं. या मंदिराचा जिर्णोद्धार स्वतः राजांनी केला असे म्हणतात. आत राजांचा एक अर्धकृती पुतळा हि दिसत होता. आमच्याबरोबरच कोकणात आलेला पावसाने दमदार ब्याटिंग सुरू केली आणि एक सुंदर विडिओ रेकॉर्ड केला आम्ही. झाडातून शिरणारे ढग/धुकं. किल्ल्याची बरीचशी तटबंदी पावसाळी झाडीत झाकून गेली आहे. किल्ला तसा आटोपशीरच आहे. अर्धा तासात पाहून झाला आणि आम्ही निघालो 'कसबा' गाठायला. वाटेत कडवई गावच्या एका तिठ्यावर (तीन रस्ते मिळतात तिथे) कोणीतरी केळीच्या पानावर नारळ ठेवला होता. पावसाने धुतलेल्या त्या निर्मनुष्य रस्तावर तो नारळ अगदी उठून दिसत होता. खर तर कोकणी माणसाक हे नेहमीचंच पण उगाच सध्या फेसबुकवर 'येवा कोंकण आपलेच असा' या टॅगलाईन खाली फिरणाऱ्या सुंदर फोटोंवर कोटी करावी म्हणून हा फोटो काढुन पोस्ट केला मी पण.
https://youtu.be/whwmHO-i-2w
कर्णेश्वर मंदिर (कसबा, संगमेश्वर) -
संगमेश्वरातील कसबा या गावाला एक विदीर्ण इतिहास आहे; मराठ्यांचा छावा, दुसरे छत्रपती संभाजीराजे इथेच यवनांनी धरले आणि चालवत चालवत आळंदीजवळच्या तुळापूरला नेले. याच करनेश्वराच्या मंदिरात पूजा करून, राजे जवळच्या देसाई वाड्यात आपल्या सारदारांबरोबर बसले असताना, औरंगजेबाच्या सैनने वेढा देऊन पकडले. पुढचा रक्तरंजित इतिहास माहीत नाही असा मराठा सापडणार नाही.
मंदिरात आमचे हात जोडून, जंगमानकडून इतिहास आणि ऐकत आम्ही उभे राहिलो. संगमेश्वर हे गाव सोनवी आणि शास्त्री या दोन नद्यांच्या संगमावर उभे असल्याने जवळ जवळ १५० मंदिर या परिसरात बांधली गेली होती. पांडवांनी आपल्या वनवासाच्या काळात, त्यातले कर्णेश्वराचे एका दगडातून कोरलेले भव्य देऊळ विशेष बांधले. ह्या महादेवाच्या देवालयात ५ पालथी ताटे कोरलेली आहेत. आख्यायिकेनुसार पांडव वनवासात असताना त्यांनी कर्ण नामक राजाच्या पणानुसार एका रात्रीत एका दगडातून हे देवालय कोरले. त्यानंतर थकून भागून ते जेवायला बसले असता कोंबडा आरवला. पांडव तसेच त्यांची ताटे पालथी टाकून उठले. देवालयात पांडवकालीन लिपीत कोरलेले लेख आहेत. जेव्हा हे लेख कोणी वाचू शकेल तेव्हा पालथी पाने सुलटी होतील आणि त्या मनुष्याला ताटांखाली लपवलेले द्रव्य मिळेल, अशी समजूत आहे. ही सगळी माहिती जंगमकाडून ऐकून आम्ही एक विडिओ टिपला मंदिराच्या कोरिवकामाचा आणि निघालो जंगमानी सांगितल्याप्रमाणे नद्यांच्या संगमावर असलेल मुख्य शिवालय पाहायला. या परिसरातली उरलेली उध्वस्त मंदिर पाहण्यासाठी वेळ नव्हता. संगमावर थोडा वेळ घालवून आम्ही निघालो. जाता-जाता जंगमानी सांगितलेली एक गोष्ट पटली; कर्णेश्वर मंदिरातील पुजलेल्या ब्रम्ह-विष्णू मूर्त्यांचे तोडलेले हात दाखवताना ते म्हणाले, "इथली मंदिर उध्वस्त करताना मुघल सैनिक एवढे थकले की नंतर त्यांनी फक्त हातच तोडले उरलेल्या मूर्त्यांचे; पण आपण हिंदू एकदा श्रद्धेने देव मानलं की तो देवच. अजूनही पूजा चालू आहे या मूर्त्यांची.....अविरत!!"
https://youtu.be/iiHK6i3kuuE
महिमतगड (देवरुख) -
कसबा सोडून पुढे आम्ही देवरुखच्या दिशेने निघालो महिमतगड गाठण्यासाठी. महिमतगड हा दाट जंगलात वसलेला एक दुर्गम डोंगरी किल्ला आहे. किल्ल्यावर पण खूप झाडी आहे. किल्ल्याची तटबंदी आणि अवशेष अजूनही अजूनही पाहण्यासारखे आहेत. देवरुखच्या पुढे ६ किमीवर निवे फाट्यावरून कुंडी आणि निगुडवाडी ही गावे जवळपास १६ किमी वर आहेत. या दोन्ही गावातून महिमतगडावर जाण्यासाठी वाट आहे. आम्ही कुंडीचा मार्ग पकडला. कुंडी गावाच्या कमानीच्या अगोदर थोड्या अंतरावर उजव्या बाजूला एक कच्चा रस्ता जातो. कुंडी-निगुडवाडीस जोडणारा हा प्रस्तावित मार्ग आहे. मोठे वाहन या मार्गाने जाऊ शकत नाही कारण, कोकणातल्या पावसाच्या पाण्याने मधे-मधे या रस्ताचे लहानश्या पायवाटेत रूपांतर केले आहे. आमची बाईक होती, ती घेऊन लागलो आम्ही ह्या रस्ताचे उभे चढ चढायला. एका बाजूस खोल दरी आणि दुसरीकडे उभा डोंगर ठेवून जागो जागी कोसळल्या दरडिंमधून वाट काढत आम्ही एका डेड एन्ड ला पोहचलो. किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज उजव्या बाजूला दिसत होते पण त्या घनदाट जंगलात शिरायची वाट सापडत नव्हती म्हणून किल्ल्याच्या बुरुजांच्या आणि डोंगराच्या सोंडीचा अंदाज घेत थोड्या वेळातच आम्ही चुकलोय हे लक्षात आलं आणि मागे जाऊन वाट शोधण्याचं ठरवलं. जवळजवळ साडेपाच किमीच अंतर आम्ही कापलं होत या खडकाळ रस्ताने. मागे परत जाताना बारीक पायवाट जंगलात शीरताना आढळली. ही वाट रस्तावर एका मार्किंग जवळ आहे - TBM 11 अस लिहलेल्या दगडाजवळ. ती वाट वाढलेल्या जंगलात विरली होती. वाट चांगली मळलेली नव्हती म्हणून मार्किंग साठी सॅग मधला कोयता हातात घेतला. दुपारी एकच्या सुमारास पण या वाटेवर सात वाजल्यासारखा अंधार होता आणि त्यात जागोजागी जंगली गव्याचे फूट प्रिंट्स आणि विष्ठा दिसत होती. त्या ठश्यांचा आकार आणि बरोबरचे लहान ठसे पाहून ही एक पिलकरिन असल्याने त्या आप्पत्तीचे चिंतन करत, काही दगडात कोरलेल्या पायऱ्या पार करून आम्ही एका छोट्या पठारावर पोहोचलो. या पठाराच्या अगोदर पायऱ्यांच्या बाजूला लाकडाने बनवलेले दोन बैल, हाताचे पंजे आणि एक भटजी ठेवले होते, बरोबर एका लाकडाच्या फळीवर अगरबत्तीच्या उरल्या कांड्या होत्या. ते नक्की काय होत हे अजून शोधायचंय आम्हाला. पठारावर पोहचताच, डावीकडे किल्ल्याची तटबंदी दिमाखात उभी दिसत होती तर उजवीकडे दूरवर पसरलेलं निसर्गरम्य कोंकण. डाव्या बाजूने उभी चढाई संपवून आम्ही किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो, हे बऱ्याच चांगल्या अवस्थेत होते, मागे देवड्या होत्या द्वाराच्या. तिथेच किल्ल्याचा नकाशा लावला आहे एका संस्थेने, त्याप्रमाणे आम्ही उजवीकडून किल्ला पहायला सुरवात केली. तटबंदीला लागून एक पाण्याचे टाके आहे. इथून वर चढून गेल्यावर एक शंकराचे उध्वस्त मंदिर आहे. या मंदिरामागे एक बुरुज आहे पण त्याला जायला वाट नाही. उजवीकडे काही अंतरावर हनुमानाची मूर्ती आहे. या मूर्तीच्या उजव्या बाजूने वर चालत गेल्यावर आम्ही बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. बलेकिल्ल्यावरील झेंडा पाहून, इथेच पेटपूजा करून आम्ही खाली उतरलो या हनुमानाच्या मूर्तीला उजवीकडे ठेवून महिषासुरमर्दिनी देवीच्या मंदिरापाशी आलो. सुबक मूर्तीच्या पायाशी दोन लहान तोफा ठेवलेल्या होत्या इथे. इथून पुढे एक लहान गवताळ माळावर एक मोठी तोफ आहे. ती पाहून आम्ही प्रवेशद्वारापाशी असलेल्या खांब टाक्यापाशी आलो. ह्या किल्ल्याला १० बुरुज आहेत पण एकही बुरुज तिथे जाऊन पाहु शकलो नाही; सगळे बुरुज वाढलेल्या झाडीमुळे आप्रोचेबल नव्हते. पूर्ण किल्ला पाहण्यास आम्हाला १ तास लागला आणि आम्ही आल्या मार्गी निघालो.
चुन्याचा वापर न करता फक्त दगड रचून उभा केलेला मी पाहिलेला पहिला किल्ला. किल्ला पाहण्याची आवड असणाऱ्यासाठी ही पर्वणी आहे. कुंडीतून वर चढत गेल्यास हा अडीज ते तीन तसाचा ट्रेक आहे. रिस्की असूनही आम्ही अर्ध अंतर बाईक ने पार करून १.३० तासात संपवला आणि जवळच असलेलं माझं गाव, वांझोळे गाठल रात्र घालवण्यासाठी.
कोळकेवाडी दुर्ग -
दुसऱ्या दिवशी सकाळी ६ च्या सुमारास पुन्हा बाईकला किक मारून आम्ही निघालो चिपळूण जवळील जुनी कोळकेवाडी गाव गाठायला. मध्ये आलोरे गावी चहासाठी थांबलो आणि GST चा इम्पॅक्ट किती खोलवर गेलाय ते जाणवलं. बाजूलाच, बसलेले दोन इसम, १ जुलै नंतर क्वार्टर ७० रुपये होणार; कसं जगणार माणूस या बद्दल हळहळ व्यक्त करत होते ते पण चहाचा हातातला ग्लासला साक्षी धरून. चिपळूण शहरापासून १० किमी वर कोळकेवाडी धरण आहे. या धरणाच्या मागे धनगरवाडीजवळ कोळकेवाडी दुर्ग मुख्य डोंगररांगेपासून वेगळा थोडा ठेंगणा वाटतो. आम्ही वाडीत वाटाड्या साठी विचारणा केली पण रविवार असल्याने कोणीच नव्हतं गावात. मग एका घरात मुलगा सापडला थोडा आजारी होता तो. त्याला डायरेक्शन विचारलं आणि लागलो वाटेला. दुर्गाची वाट गर्द झाडीची आणि मुसळधार पावसाने ती आजून बिकट केली. पाऊस तर असा पडत होता की आम्हाला एकही फोटो काढता आला नाही. १.३० तासात आम्ही गुफेंजवळ पोहोचलो. वाटेत पाण्याच्या टाक्याजवळ काही विरगळी दिसल्या. दोन गुंफापैकी एकीचे छत कोसळलेले आहे, तर दुसरी गुंफा सुस्थितीत आहे. एका गुफेत लेणी आहेत पण ही गुफा वाटवाघळानी भरलेली असल्याने आम्ही ती पाहू शकलो नाही. वेळेच्या अभावी पाऊस उघडण्याची वाट आम्ही बघू शकत नव्हतो म्हणून ट्रेक ३ तासात पूर्ण करून निघालो पुढच्या किल्ल्याला भेट द्यायला.
गोपाळगड -
कोळकेवाडीतून निघून आम्ही गुहागर गाठण्यासाठी निघालो. जवळजवळ ५० किमी चा प्रवास करून दाभोळ गाठलं. रस्ताच्या डाव्या बाजूला एन्रॉन चा उध्वस्त प्रकल्प दिसत होता. समोरची लालबुंद तटबंदी पाहूनच मन भरलं. गुहागर जवळ अंजनवेल या गावी गोपाळगड किल्ला दिमाखात उभा होता. किल्लाच पूर्ण बांधकाम चिरेबंदी असून चुना न वापरता केलेलं असल्याने मानत भरलं. पूर्वी वाशिष्ठी नदीतून दाभोळ बंदर (दाल्भेश्वर) पासून चिपळूण पर्यंत व्यापारी गलबतांची ये-जा चालत असे. ह्या व्यापारी मार्गावर नजर ठेवण्यासाठी अंजनवेल गावात वाशिष्ठी नदीच्या (खाडी) किनारी अंजनवेलचा किल्ला (गोपाळगड) बांधण्यात आला. १६६० मध्ये महाराजांनी हा किल्ला आदिलशकडून घेतला आणि त्याच गोपाळगड अस नामकरण केलं. किल्ल्याची २५ फुटी तटबंदी आजुनाही शाबुत आहे. तटबंदीला लागूनच २० फूट खोलीचे खंदक आहेत जमिनीच्या बाजूने. आम्ही किल्ला पाहायला सुरवात केली. किल्ल्याला १० बुरुज अगदी सुस्थितीत आहेत. दोन कातळात खोदलेल्या पायऱ्या असलेल्या खोल विहीरी आणि एक पाण्याच टाक सुद्धा आहे किल्ल्यात. महाराष्ट्र शासनाच्या चुकीमुळे गोपाळगड खाजगी मालमत्ता बनलेला आहे. त्यामुळे गडांचा दरवाजांना कुलुप लावलेली आहेत आणि आतमध्ये आंब्याची बाग करण्यात आली आहे. त्याची पर्वा न करता गड बघावा. या अतिक्रमणाविरूद्ध दूर्गप्रेमींचा कायदेशीर लढा चालू आहे. किल्ल्यावरून खोल समुद्र अगदी सुंदर दिसत होता. इतकी वर्षे उलटून सुद्धा हा किल्ला आपल्याला त्याच्या सुवर्णकाळाची आठवण करून देतो, स्थापत्यकलेचा उत्तम उदाहरण त्याच्या वयावरून जाणवलं. हा किल्ला पाहून आम्ही पुन्हा निघालो चिपळूणला.
गोवळकोट (गोविंदगड) -
चिपळूणच्या परशुराम घाटातून जाताना उजवीकडे एका टेकडीवर लहानसा कोट दिसतो तो गोवळकोट.
चिपळूण शहरात वाशिष्ठी नदीच्या काठावरील एका टेकडीवर हा किल्ला आहे. या किल्ल्याच्या तीन बाजूंनी वाशिष्ठी नदीचे नैसर्गिक संरक्षण आहे, तर उरलेल्या बाजूला खंदक खोदून किल्ला बळकट केला होता. आज हा खंदक बुजलेला आहे.चिपळूण हे प्राचिनकाळात बंदर म्हणून प्रसिध्द होते. या बंदराच्या संरक्षणासाठी गोवळकोटची उभारणी करण्यात आली होती. १९६० साली राज्यांनी गोपाळगड बरोबर हा ही किल्ला घेतला. संभाजी महाराज्यांच्या काळात तो सिद्दीच्या ताब्यात गेला. नंतर चिमाजी आप्पा आणि पिलाजी जाधव यांनी सिद्दी सात यास मारला पण तहात हा किल्ला सिद्दीकडेच राहिला. १७४५ नंतर तुळाजी आंग्रे यांनी या गडाचा ताबा घेतला. आता या किल्ल्याला मातीचा रस्ता प्रवेशद्वारापर्यंत बांधला आहे. प्रवेशद्वार आता शिल्लक नाही पण काळ्या दगडात बांधलेली १० फूट तटबंदी शाबूत आहे. आम्ही उजव्या बुरुजावरून किल्ला पाहायला सुरवात केली. या बुरुजावर एक तोफ पहुडलेली आहे. उजव्या बाजूला वासीष्टी नदीचा पसारा, शेतजमीन, परशुराम घाट, रेल्वे मार्ग अगदी सुंदर दिसतो. तटावरून पुढे चालत गेल्यावर गडाच्या दुसऱ्या टोकाला आजून एक बुरुज लागला. तटबंदी कुठे कुठे ढासळली आहे. गडाच्या मधोमध मातीचा एक उंचवटा आहे यावरून पूर्ण किल्लाचा घेर पाहता येतो. त्याला लागूनच एक पाण्याचे टाके आहे. किल्ल्यावर रेडजाई देवीचे मंदिर आहे. किल्ल्याच्या मागच्या बाजूस गोवळकोट जेटी आहे. प्रवेशद्वाराच्या डाव्या बुरुजावर एक भगवा आणि तोफ आहे. इथून चिपळूण शहराचा पसारा दिसतो.
हा किल्ला पाहून आम्ही आमची कोकणची सफर (पहिली) संपवली. परत जाण्यासाठी ६ च्या जनशताब्दीच तिकीट होत आणि आम्ही ४ वाजता चिपळूण डेपो बाहेर वडापाव हासडत होतो. चौकशी केली आणि रेल्वेच्या वेटिंग तिकिटापेक्षा ४.३० च्या चिपळूण-परळ एसटी ला प्राधान्य दिलं. झोप चांगली लागली एसटीमध्ये आणि रविवारी रात्री १२ च्या दरम्यान आम्ही घरी पोहोचलो.
कोकणातले किल्ले पुण्या-मुंबईच्या ट्रेकर्सना लांब वाटतात. शेड्युल बसत नाही त्यांचा, म्हणूनच मुद्दामून अटेंम्प्ट मारला; मित्रांनो, पॉसीबल आहे!!! एक दिवसात दोन किल्ले आरामात उडवता येतात. तरीही, पुण्या-मुंबईतल्या लोकांनी हात न घातल्यामुळेच इथल्या किल्ल्याच्या तटबंदीवर आजून चुन्याने लिहलेली नाव आलेली नाहीत किंवा इथल्या हनुमानाला, भैरी देवीला ऑईलपेंट लागला नाही हीचं जमेची बाजू.
असो, कोंकण अजूनही तसच आहे, राकट आणि कणखर; अगदी आपल्यासखंच!!
येवा, कोंकण आपलंच असा!!!
- वैभव आणि सचिन
टीप -
१. कोकणची मोहीम आखताना प्लॅंनिंग खूप महत्वाची आहे, वेळेची आणि प्रवासाची.
२. कोंकण पट्टा जैव विविधतेने नटलेला आहे तरी पुरेशी खबरदारी ट्रेक रूट मध्ये घ्यावी. आम्ही स्वतः रानकोंबड्या, मोर-लांडोर इतर खूप वेगवेगळे पक्षी पाहिले, हुप्पे पाहिले, गवे, नीलगाय यांची भीती वाटत होती तरीही ते दिसावे अशी उत्कट इछ्या होती.
३. कोकणच्या पावसाचा अंदाज हवामान खतही घेऊ शकत नाही म्हणून योग्य ती काळजी घ्यावी नाहीतर आजारी पडण्याची शक्यता असते. दोन पूर्ण दिवसात आम्ही २ मिनीटसुद्धा सुकलो नव्हतो.
Comments
Post a Comment