Trek to Colaba and Korlai fort - सह्याद्री, समुद्र आणि शिवराय !; सफर कुलाबा आणि कोर्लईच्या किल्ल्याची,

सह्याद्री, समुद्र आणि शिवराय यांनी एकवटून मांडलेला स्वतंत्र संग्राम विजयी झाला!
हिंदवी स्वराज्य साकार झालं....

- शिवकल्याण राजा


पनवेल वरून सकाळी श्रीवर्धन डिपोची एक एस.टि. आमच्या पुढे-पुढे कोकणात शिरत होती. एक भारी टॅग-लाईन लिहली होती तिच्यावर..."इलका तुमचा, दरारा आमचा". आमची आजची सफर कुठेतरी या लाईनशी कनेक्ट होत होती.



भारताच्या इतिहासात कोकण प्रांताचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आर्यांच्या आगमनापूर्वीसुद्धा पश्‍चिम समुद्राच्या बंदरावर विदेशी जहाजे व तारवो व्यापारासाठी येत असत. १६५७च्या आसपास कल्याणमधील दुर्गाडी येथे पहिला जहाज बांधणीचा प्रयत्न राजांनी केला तेंव्हा कोकणच्या संपूर्ण किनारपट्टीवर इंग्रज, पोर्तुगीझ, सिद्दी, काही प्रमाणात मुघल आणि आदिलशाहाचे वर्चस्व होते.
'ज्याचे आरमर त्याचा व्यापार' हे हेरून आपल्या समुद्रात आपले आरमार उभारायची दुरदृष्ट्री फक्त राजांनी दाखवली.
१६५६ मध्ये मोऱ्यांची जावळी मारून राजे कोकणात उतरले. पुढील एका वर्षात कल्याण-भिवंडी परिसर घेऊन उत्तर कोकण काबीज केले. पोर्तुगीज, इंग्रज, सिद्दीवर अंमल आणायचा असेल तर त्यांच्या इतकेच बलवान आरमार हवे होते.  राजांनी १६६० ते १६६४ या काळात सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, रत्नदुर्ग आणि सिंधुदुर्ग असे जलदुर्ग बांधलेे किंवा त्यांची पुर्नबांधणी केली. कुलाबा आणि खांदेरी हे जलदुर्ग राजांनी १६७८-७९ नंतर बांधले. मराठा आरमार ह्या जलदुर्गांच्या ताकदीवर समुद्रात फिरे. शत्रूस जेरीस आणे आणि गरज पडल्यास माघार घेत जलदुर्गांच्या आश्रयाला येई. पश्चिम किनारपट्टीच्या या रात्नांपैकी दोन रत्ने जवळून पाहण्यासाठी आम्ही निघालो.



कुलाबा किल्ला (Colaba) -
गेल्या रविवारी सकाळी ४.३०ला सचिनला फोन करून ऐनवेळी रद्द केलेली मोहीम या रविवारी आम्ही फत्ते केली. सकाळी ७.३०ला अलिबाग चौपाटीवर गरम चहा घेऊन आम्ही कुलाबा किल्ल्यात जाण्यासाठी निघालो. लहानसा किल्ला अगदी समोर दिसत होता. अर्धा तासात पूर्ण किल्ला बघून निघू अस ठरवून ओहोटीच्या पाण्यातून आम्ही चालत होतो.



कुलाबा किल्ला व त्याचा सर्जेकोट हि जोडगोळी मिश्रदुर्ग पद्धतीचे मी पाहिलेले पहिलेच किल्ले होते.
भरतीच्या वेळी हा किल्ला चारही बाजूने पाण्याने वेढला जातो व जलदुर्ग बनतो; तर ओहोटीच्या वेळी किल्ल्यापर्यंतची जमीन उघडी पडते व किल्ला भूइकोट बनतो. आम्ही ओहोटीची वेळ बघून प्लॅंनिंग केलं होतं. या किल्ल्याचा इतिहास दोन्ही छत्रपतीशी जुळलेला आहे. १९ मार्च १६८० रोजी महाराजांनी किल्ला बांधायला सुरुवात केली. त्यांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याचे बांधकाम जून १६८१ मध्ये पूर्ण केले. सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांचे याच किल्ल्यावर निधन झाले. किल्ल्यावर त्यांच्या वाड्यांचे काही अवशेष आजही बघायला मिळतात.
थोड्याच वेळात आम्ही किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराशी पोहचलो. गणपती व इतर प्राण्यांची नक्षी कोरलेल द्वार अजूनही आपल्या ऐश्वर्याची जाणीव करून देतं होत.



आत जाताच डाव्या बाजूला भवानी मंदिर आहे. इथूनच आम्ही तटबंदीवर चढलो आणि डाव्या बाजूने तटबंदी पाहायला सुरवात केली. खोल समुद्रात टक लावून बघणाऱ्या, चाके असलेल्या दोन तोफा आम्हाला पहिल्याच बुरुजावर दिसल्या. तोफांच्या चाकांजवळ तोफा बनवणार्‍या कंपनीच नाव कोरलेल आहे ‘‘डाऊसन हार्डी फिल्ड, डाऊ मूट आर्यन वर्क्स, यॉर्कशायर, इंग्लंड", व वर्ष आहे १८४९. या तोफा फार चांगल्या परिस्तितीत होत्या बाकी बुरुजांवर पाहिलेल्या तोफांपेक्षा.



या लहानश्या किल्ल्याला तब्बल १७ बुरुज आहेत. तटबंदी तर डोळ्यात भरून घेण्यासारखी आहे. किल्लेबांधणी मध्ये चुना वापरला गेलेला नाही जेणेकरून समुद्राच्या लाटांच पाणी तटावर आपटून दगडांच्या फटीतून आत झिरपून तिच्या ताडक्यांचा जोर कमी होईल.  किल्लेबांधणीच्या या कौशल्यामुळेच तटबंदी अजूनही मजबूत उभी आहे. किल्ल्याचा दुसरा दरवाजा समुद्राच्या कडे तोंड करून उभा आहे याला धाकटा दरवाजा / यशवंत दरवाजा / दर्या दरवाजा असेही म्हणतात. दारवाज्यावर गणपती आणि इतर नक्षीकाम आहे. या दरवाज्याच्या दोन्ही बाजूस पायरीवर वाहिलेली ताजी चाफ्याची फुलं मनाला सुखावून गेली.





किल्ल्याच्या मधोमध सिद्धिविनायकाच मंदिर आहे. हे मंदिर कान्होजी आंग्रेनी बांधलं अस म्हणतात. डागडुजिच्या कामामुळे मंदिराचा पांढरा शुभ्र कळस उठून दिसत होता. मंदिराच्या परिसरातच उत्तरेस मारुतीचे व दक्षिणेस शंकराचे मंदिर नजरेस पडलं. समोरील दगडी तुळशी वृंदावनावर केलेली कलाकुसर अतिशय देखणी होती. मंदिरासमोर गोड्या पाण्याची पुष्कर्णी आहे. पुष्कर्णीच्या पुढे तटा पलिकडच्या दरवाजातून बाहेर गेल्यावर पाण्याची एक चौकोनी विहीर होती. या विहिरीला आत उतरायला पायर्‍या आहेत. पाणी गढूळ हिरवे झालेले असल्याने पिण्यायोग्य नव्हते. पुढे पूर्ण किल्ला फिरताना डावीकडची वाट आम्हाला दर्ग्याकडे घेऊन गेली. भवानी मातेच्या पुजाऱ्याने सांगितल्याप्रमाणे काल झालेल्या उरुसाच्या खुणा आम्हाला तिथे दिसल्या. परतीच्या वाटेवर डावीकडे आंग्य्रांच्या वाड्याचे अवशेष पाहून आम्ही दक्षिण दरवाज्याकडे वळलो ते सर्जेकोट पाहण्यासाठी.







सर्जेकोट म्हणजे ४ बुरुजांचा एक छोटेखानी किल्लाच. त्याच बांधकाम हि तसच अढळ. दोन्ही किल्ल्याचा परिसर इतका नेटका आहे की, 'शु-क्रिया अदा करण्यासाठी' मला किल्ल्यातुन बाहेर येण्याची वाट बघावी लागली.




दोन्ही किल्ले पाहून बाहेर पडलो तेव्हा पहिल्यांदा घड्याळात पाहिलं तर या छोट्याश्या सुरेख किल्ल्यांनी आमच्या अपेक्षेच्या बाहेर तब्बल १.३० तास घेतला होता आमचा. ती अभेद्य तटबंदी पाहताना आमचं प्लॅंनिंग थोडं फिस्कटल होत.
बाहेर पडताना, गेलेल्या वेळेवर शेरा मारताना सचिनच्या तोंडून एक सुंदर वाक्य आलं आणि ते पटलं पण.

"साला! आपण या तटांमध्ये इतके रमतो! गेल्या जन्मी नक्की एक तरी दगड आपल्या हातांनी अश्याच कुठल्यातरी किल्ल्याला लागला असेल म्हणूनच हि ओढ आहे!"

कोर्लईचा किल्ला -
९.३० च्या सुमारास आम्ही अलिबाग सोडून आम्ही दक्षिणेला मुरुडच्या दिशेने निघालो ते कोर्लईचा किल्ला पाहण्यासाठी. अलिबाग पासून सुमारे २५-१ किलोमीटरवर आहे हा किल्ला. कोस्टल रोड पकडून येताना रेवदंडा पार केल्यावर चौल गावाजवळ एक सुंदर कौलारू राममंदिर दिसलं आणि आम्ही काही वेळ इथे घालवला.



रेवदांड्यापासून ८ किलोमीटरवर पुलावरून जाताना डावीकडे कुंडलिकेची खाडी आणि उजवीकडे डोंगरावर एक भक्कम तटबंदी दिसत होती. हाच होता कोर्लईचा किल्ला. पूल संपल्यावर उजवीकडे कोर्लई गावात आम्ही शिरलो.



समोर सोंडेवरून किल्याच्या बुरुजाला भिडणारी एक पायवाट दिसत होती; या वाटेने किल्ल्यावर जाण्यास ३०-१ मिनिट लागणार होते. पण आम्ही लाईटहाऊस कडून जाण्याचं ठरवलं. मग विचारपूस केल्यावर डोंगराच्या डाव्या बाजूने जाणारा कच्चा रस्ता आम्ही धरला. आमचं नशीब; लाईट हाऊसच काम चालू असल्याने प्रवेश बंद होता. मग बाजूच्या पायऱ्या १० मिनिटात पार करून आम्ही किल्ल्यावर पोहोचलो.



डाव्या बाजूला दोन दरवाजे समुद्राच्या दिशेने दिसत होते तर उजवीकडे एक दरवाजा आणि किल्ल्याच बांधकाम दिसत होतं. आम्ही उजवीकडे निघालो. किल्ला निमुळत्या जमिनीच्या पट्टीवर निमूळताच बांधला आहे. आत शिरताच एक लहानस शंकराचं मंदिर लागलं. पुढे आजून एक दरवाजा लागला आणि पारशी भाषेत काही शिलालेख दरवाज्यावर दिसले. पुढे पुन्हा एक दरवाजा आणि चर्च सारखी वस्तू नजरेस पडली. या पूर्ण किल्ल्यावर पोर्तुगीज स्थापत्यकलेचा भरणा उठून  दिसत होता. डाव्या बाजूला कुंडलिका खाडीच्या बाजूस उघडणारा एक दरवाजा लागला त्याच्या पायऱ्या खाली कोर्लई गावापर्यंत घेऊन जात होत्या. किल्ल्याच्या दक्षिण टोकाला एका बुरुजावर एक मेंढा तोफ आराम करताना दिसली. ह्या बुरुजावरून खाली कोरलाईची वस्ती अगदी ठळक दिसत होती आणि बरोबर दिसत होता लागून असलेला समुद्र किनारा. उत्तर टोकाला येऊन आम्ही उरलेले दोन दरवाजे पण पहिले. याच दरवाज्यातून एक तटबंदी खाली समुद्रात जेटीवर जात होती. दूरवर नजर टाकल्यावर कुलाबा किल्ल्याच्या मंदिराचा कळस पुसटसा दिसत होता.





तीन बाजुंनी पाण्याने वेढलेल्या मोक्याच्या ठिकाणी हा किल्ला निजामाने बांधला व नंतर पोर्तुगीजांनी कब्जा केला. संभाजी राजांनी पण एक असफल प्रयत्न केला. १७३९ साली चिमाजीअप्पाने सुभानराव माणकराला कोर्लईवर पाठवले, आणि वर्षभरातच किल्ला हाती लागला. मराठ्यांनी बुरुजांची नावे बदलून सां दियागोचे नाव पुस्ती बुरूज, आणि सां फ्रांसिसकुचे नाव ठेवले गणेश बुरूज ठेवले.



आमचा गेला ट्रेक; देवकुंड हा कुंडलिका नदीचा उगम होता तर कोर्लई येथे याच नदीचा शेवट !

पुढे आम्ही मुरुड मार्गे रोहा जाण्याचं ठरवलं कारण होत तिसऱ्या रत्नाची माहिती काढणं; 'पद्मदुर्ग'. मुरुड समुद्रकिनारी खोल समुद्रात दिमाखात उभा असलेला. थोडी माहिती काढून दंड राजपुरीतून आम्ही रोह्याला निघालो. जंजिरा पण दिसत होता किनाऱ्याच्या जवळ. इथून रोहा ३४-१ किलोमीटर आहे. रस्ता चांगला पण फणसाटच्या अभयारण्यातून जाणारा आहे. रात्रीच्या वेळी माकडे खूप त्रास देतात या वाटेवरून. आम्ही जेव्हा रोह्यात पोहचलो तेव्हा १.४५ झाले होते. या उकड्यात जवळजवळ २ किलोच कलिंगड दोघात जेवलो आम्ही आणि वाकण मार्गे मुंबईच्या रस्ताला लागलो.




अलिबागच्या बीच लव्हर्सने दुर्लक्षित केलेला कुलाबा असो किंवा जवळच समुद्रात नांगर टाकून डौलाने उभा असलेला कोर्लई असो हे आमच्यासारख्या भटक्यांनसाठी पर्वणीच आहेत. या उन्हात करण्यासारखे अनेक किल्ले आपल्याला लाभले आहेत पण बिचवरून फुरसत मिळाली तर ना!

- वैभव आणि सचिन

Comments