Trek to Devkund, Bhira Dam - एक 'ऊनाड' दिवस...देवकुंड

             सांग सख्यारे आहे का ती,
             अजून तैशीच गर्द राईपरी.

शाळा/कॉलेज्यातल्या तिची आठवण करून देणारी दाट वनराई...फाल्गुनातल्या हिरव्या/पिवळ्या/तपकिरी झालेल्या झाडांची,  फुललेला गुलमोहोराची, पक्ष्यांच्या मंजुळ किलबिलाटांची आणि रानभर पसरलेल्या कारवंदांच्या फुलांच्या सुवासाची. हाच अनुभव होता आजच्या ट्रेकचा; देवकुंडाचा.



हा स्पॉट आणि त्याचे फोटोज जवळजवळ दीड वर्षांपूर्वी पहिल्यांदा पाहिलेले. प्रत्यक्ष जाण्याचा योग आज जुळून आला. 'डाव्या बाजूला भिरा धरणाचं निळक्षार पाणि, उजव्या बाजूला काळाकुट्ट कातळकडा, पायाखाली तपकिरी/गुलाबी पानांचं कार्पेट आणि डोक्यावर गच्च झाडांच्या पानांतून डोकावणाऱ्या सूर्यप्रकाशाच झुंबर' या सर्वांनी नटलेली पायवाटा ह्याही आम्हाला आकर्षित करणाऱ्या, फोटोत पाहिलेल्या त्या दवकुंडापेक्षा कमी नव्हत्या. या नुकत्याच सुरु झालेल्या गरमीच्या मोसमात असाच ट्रेक करणं बरं; सोपा, मुबलक पाणी, आणि शेवट देवांच्या बाथटब मध्ये...देवकुंड!



गेले दीड वर्ष 'आज-उद्या' करता करता 'काल' रात्री जायचं आम्ही कन्फर्म केलं. पहाटे ४.१५ ला अलार्म झाला आणि ५ ला आमची बाईक निघाली 'पनवेल मार्गे पाली' गाठण्यासाठी. मुंबईत होणाऱ्या गरमीचा अंदाज घेऊन निघलेलो आम्ही एक तासात, पनवेल सोडल्यानंतर 'शिमल्यात' आल्यासारखे थंडीने कापत होतो. पहिला ब्रेक आम्ही सकाळी ७.३० ला पालीच्या 'श्री बल्लाळेश्वराच' दर्शन घेऊन केला. आमच्या समोरच 'श्रींचे' एक सोहळ्यातले पुजारी काका लोटांगणाधिष झालेले होते. त्यांच्या मागे हात जोडून उभे राहताना 'लग्नात पहिल्याच पंक्तीत जेवल्यावर जसा वाटतो तसा अभिमान उगाचच वाटत होता'. देवाला मनोभावे हात जोडून आणि मंदिराला लागूनच असलेला आणि आतापर्यंत दोन वेळा भेट दिलेला 'सरसगड' पाठीशी ठेवून आम्ही काही गरमगरम भज्या आणि बटाटेवडे रगडले आणि चालू पडलो 'भिरा गावाच्या' दिशेने. पालिपासून भिरा गाव जवळजवळ २२ किमी आहे. वाटेवर मुबलक प्रमाणात टाटा वाल्यांचे दिशादर्शक बोर्डस असल्याने न चुकता आम्ही भिरा गावातील 'टाटा कोलोनीत' पोहोचलो. एका चहावाल्याला 'देवकुंड' साठी विचारणा करत असताना एक लहान मुलगा 'चला मी दाखवतो' म्हणाला. आम्ही त्याच्या बाईकच्या मागे 'सावंतवाडीत' शिरलो. त्या मूलाच्या घराच्या अंगणात बाईक लावली व त्याच्या वडिलांनी 'गाईड' पाहिजे का विचारात पाणी देऊ केलं. 'भटकण्याची खाज' म्हणून नको म्हणालो आणि नक्की कोणत्या घळीत हा धबधबा आहे ते दाखवा फक्त म्हणून सांगितलं. दुपारच्या जेवणाणासाठी 'पिठलं-भाकरी बनवाल का?' सांगून निघालो. 


९ च्या सुमारास ट्रेकची सुरवात झाली ती एका सुंदर सुवासाने; करंदीच्या काट्यांत फुललेल्या पांढऱ्या फुलांच्या. थोड पुढे जाताच, डावीकडचा विशाल जलाशयाने आमचं लक्ष वेधलं; नुकत्याच उगवलेल्या सूर्यप्रकाशात सुंदर दिसत होतं ते पाणि आणि आम्ही तिथेच १५-२० मिनिट रमलो. 





पुढे त्या धरणाच्या बाजूने चालत आम्ही एका मोठ्या ओढ्यासमोर आलो आणि समोरच्या डोंगराच्या बाजूने जाणारी वाट शोधायला लागलो. झोरे यांनी सांगितल्या प्रमाणे त्याच डोंगराच्या मागे कुंड होतं. थोड्याच वेळात पायाखालची वाट नाहीशी झाली आणि आम्ही त्या जंगलात भटकलो. तशी वाट भटकण्याची हि आमची नेहमीचीच सवय; अश्या खाचखळग्यातून वाट काढत, मार्किंग/फुटप्रिन्ट शोधत, अनुभवाने तर्क लावत, वाट शोधण्याची. अंगावर काट्याकुट्यांचा एक-दोन ओरबडे आल्याशिवाय मजाच येत नाही आम्हाला. असो, कुंड समोर दिसणाऱ्या डोंगराच्या पाठीमागे आहे एवढं ध्यानात ठेवून आम्ही त्या डोंगराच्या पायथ्यापर्यंत मळलेली वाट शोधत गेलो पण ती सापडली नाही कारण ति तशी नव्हतीच. 





२५-१ मिनीटांनी खाली उतरून धरणाच्या बाजूने वाट शोधण्याचा निर्णय घेतला आणि जंगल सोडून थोड खाली आल्यावर एक वाट पायाखाली आली. झोरे काकांचा मोठा मुलगा ४ जणांचा ग्रुप घेऊन काल रात्री गेला होता. धरणाजवळ स्टे करून, सकाळी पाचला त्यांनी ट्रेक सुरु केला होता. त्यांचे अगदी फ्रेश फुटमार्क्स पाहून, आम्ही या वाटेवरून धाव घेतली आणि १०.४५ च्या सुमारास कुंडाजवळ फोहोचलो आणि फोटोत पाहिलेलं हुबेहूब नॅचरल लॅण्डस्केप पाहून तोंडातून एकचं शब्द निघाला; अप्रतिम!



त्या निर्मनुष्य धबधब्यात उतरण्यासाठी शॉर्टस वर आलो आणि फेब्रुवारी माहिन्यामुळे रोढवलेल्या पाण्याच्या धारेखाली उभा राहिलो. नुकत्याच फ्रिज मधून बाहेर काढलेल्या तंदुरी चिकन किंवा सुरमयईला वाटत असेल तसं आम्हाला वाटू लागलं. तरी सुद्धा मनसोक्त म्हणजे तब्बल १ तास आम्ही त्या देवांच्या बाथटब मधे घालवला म्हणजे अक्षरशः डुंबून काढलं स्वतःला.




परत जाण्यासाठी सॅग उचलली तेव्हा १२ वाजले होते. फ्रेश माईंड आणि फ्रेश बॉडी घेऊन आम्ही वाटेल लागलो तेव्हा सूर्य डोक्यावर आग ओकत होता. जाताना आम्ही जंगल सोडून राजमार्ग स्वीकारला आणि तो थोडा उघडा असल्याने आमची लाही-लाही झाली. आमचा कलर तसा पक्का आहे, तरीही ते ऊन नकोस वाटत होत. इतकं कि त्याने या माझ्या पोस्ट चा सब्जेक्ट 'उनाड ऐवजी ऊनाड' असा करायला लावल मला. हि वाट आम्ही १ तासाच्या आताच संपवली. जाताना निळाक्षार वाटणारं भिराच पाणि पण आता बाँइल्ड वॉटर वाटत होत. 

झोरे काकांच्या घरी पोहचलो आणि जवळजवळ २ लिटल पाणि पोटात सोडलं. त्यांच्या मुलाला आम्ही वाटेत न भेटल्यामुळे काकांनी ११.३०च्या सुमारास आम्हाला फोन करून 'हरवलात कि काय!' अशी चौकशी केली होती (भटकंतीच्या नियमाप्रमाणे गावकऱ्यांचे नंबर आम्ही गावातून निघतानाच स्टोर करून घेतो आणि आमचेही देतो). पोहोचल्यावर पुन्हा विचारणा झाली आणि आम्ही त्यांना डिटेल मध्ये कुठे चुकलो ते सांगितलं. काकूंनी चुलीत निखारे सरकवले आणि मधल्या घरात काकांच्या आणि आमच्या गप्पा रंगल्या कॉमन सब्जेक्ट वर. भैरवी गाव पाण्याखाली येऊन भिरा धरण बनलं. शेतीपण पाण्याखाली गेली. गावातील काहींना इरिगेशन मधे नोकरी मिळाली आणि बहुतेक बेरोजगार झाले. टाटा पावर स्टेशन मध्ये पण बाहेरच्यांचाच भरणा होता. कुंडाजवळच छोटंसं मंदिर म्हणजे गावाचा भैरोबा आणि तुळशी वृंदावन आहे आणि गावच्या बायकांना जाण्याची परवानगी नव्हती. गावकरी वाटेतल्या पहिल्या कुंडाजवळ चप्पल काढून दर्शनाला जात, नवरात्रीत अजूनही काही गावकरी नऊ दिवस इथे राहतात. त्या धबधब्याचं पाणि कोणत्या डॅमच नसून पाझर आहे आणि हाच रेवदांड्यापर्यंत जाणाऱ्या कुडलीेकेचा उगम आहे असं काकांनी सांगितलं. अश्या एक ना अनेक गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या. थोड्याच वेळात गरम गरम गावठी तांदळाच्या भाकऱ्या आणि पिठलं समोर आलं आणि आम्ही ताव मारला. आमची पोटं तृप्त केली. १.४५ च्या दरम्यान निघून ४च्या सुमारास आम्ही डोंबिवली गाठली.


या महाराष्ट्रातले गड-किल्ले मन अभिमानाने भरून टाकतात तर देवकुंड, उल्हास व्हॅली, सांधण व्हॅली असे ट्रेक निर्सगसौंदर्याने आणि आश्चर्याने. खरं म्हटलं तर कोणताही ट्रेक नेहमीच मन प्रसन्न करतो!


टीप:
१. हा १.३० ते २ तासांचा ट्रेक सोप्या श्रेणीतला असून फ्रशर्स साठी अगदी योग्य आहे.
२. फ्रेशर्सने बरोबर गाईड नेणें बरे; पाण्याजवळच्या गुरांच्या वावरामुळे अनेक फसव्या वाटा तयार झालेल्या आहेत.
३. पहिल्या मोठ्या ओढ्याजवळून वाट डावीकडे जाते आम्ही इथेच चुकलो आणि डोंगराच्या दिशेने उजवीकडे निघालो. इथे एक लहानसं कुंड तयार झालं आहेे.
३. धबधब्याला आणि कुंडात पाणि मे महिन्यापर्यंत असते पण बेस्ट सिजन ऑक्टोबर ते डिसेंम्बर आहे. (आम्ही जरा जास्तच लेट झालो)
४. पब्लिक ट्रान्सपोर्ट मर्यादित असल्याने प्रायव्हेट ट्रान्स्पोर्टने वनडे आरामात करता येतो.
५. डॅमशेजारी कॅम्पिंग करता येते.
६. जेवण, गाईड, नाईट स्टे आणि इतर माहितीसाठी श्री. प्रकाश झोरे - मो.८१४९३६५२११ यांच्याशी संपर्क करता येऊ शकतो.


- वैभव आणि सचिन.

Comments