Trek to Morgiri and Tung Fort - सफर दुर्गम मोरगिरी आणि तुंगची

सफर दुर्गम मोरगिरी आणि तुंगची..


दरवेळी ट्रेकसाठी नविन ठिकाण कुठे शोधायच, असा प्रश्न हा सहयाद्री पडू देत नाही हेच आमच्यासारख्या भटक्यांचं अहोभाग्य! महिन्यास एक या दराने जरी कोणी उनाड जगला तरी त्याला आयुष्यभर पुरून उरतील हे सह्यकडे.....

ऑफिसकामाचा कंटाळा आलेल मन रमवण्यासाठी आम्ही निवडला 'मोरगिरी'. 'तुंग' किल्ल्याची सफर संपवताना, सचिनने खूप दिवसांपूर्वी हेरून ठेवलेला. मोहीम ठरली पण माहिती कुठेच मिळेना; अगदी गुगलवरही नाही. गडाच्या उंचीबद्दल देखील कुठे वाचायला मिळाल नाही पण सचिनच्या अंदाजानुसार तुंगपेक्षा वरचढच असेल. आडवाटेला असल्यामुळेच बहुतेक  मावळातील या दुर्गम शिखराकडे भटक्यांनी दुर्लक्ष केल असाव. मग काय, म्हटलं बघू त्या रेंज मध्ये गेल्यावर आणि लावली स्याग पाठीला आम्ही दोघांनी...

सकाळी ५ च्या ठोक्याला निघून आम्ही लोणावळा मार्गे 'अॅम्बी व्हालीचा' रस्ता धरला. अॅम्बी व्हालीच्या जवळपास ८ किलोमीटर अगोदर, 'घुसळखांबवरून' डावीकडच्या तुंगसाठीच्या रस्तावर वळलो. थोड पुढे गेल्यावर, तुंगचा रास्ता सोडून 'एस्सार अॅग्रोटेक' फाट्यावरून उजवीकडे वळलो 'मोरवे' गाव गाठण्यासाठी. मोरवे म्हणजे 'मोरगिरीच्या' पायथ्याच गाव. एका मामांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही उजवीकडे वळलो ते एका मोठ्या होल्डिंग समोर, 'उपवन' ची जाहिरात होती ती. समोर दिसत होता तो बेलाग कातळकडा...मोरगिरी....आमची आजची मोहीम. रस्ताच्या डाव्या बाजूला दिसणारे, काँक्रिटच्या कुंपणात बंद 'प्लॉट्स' बघत बघत आम्ही एका 'वीकएंड होम' जवळ थांबलो. खराब झालेला रस्ता जेवढा त्रास देत नव्हता तेवढ वाईट हि कॉंक्रिटगिरी बघून वाटत होत. असो, आम्ही एका काकांना वाट विचारली मोरगिरची आणि त्यांनी ती अगदी बिनचूक सांगितली आम्हाला वर थोडी विचारपूस दोन्ही बाजुंनी झाली आणि आम्ही वाटेला लागलो तेव्हा ९ वाजले होते.


मोरवे गावाच्या धनगरवाडीच्या अगोदर उजव्या हाताला एक डांबरी रस्ता करण्याचा असफल प्रयत्न केलेला दिसतो बहुतेक आजून एका वीकएंड होमसाठी; हाच रास्ता धरून थोड पुढे गलेल्यावर आम्ही मोरगिरीच्या पायथ्याशी आलो. आता ते अजस्त्र रूप आजून रेखीव वाटत होत ते त्याच्या भव्यतेमुळे. उभ्या जागेवरून डोंगर कड्याकडे नजर फिरवली आणि कळलं की ही अंगावरची चढाई आहे...उभी.


वाट डोंगराच्या घळीतून जाते एवढंच आम्ही मनात पक्क केलं आणि घुसलो झाडीत. सुरवातीला दिसणारी पावटी मधेच नाहीशी झाली पायाखालून आणि मग आम्ही लागलो आपली वाट काढायला त्या गर्द वनराईतून. एका ओहोळाची कास धरून आम्ही थोडी उभी चढाई केली आणि अचानक ती पावटी पुन्हा सापडली. मग तिला पकडून आम्ही मार्गस्थ झालो. चालता चालता जाणीव झली कि हि मळलेली वाट गडाला डावीकडे ठेवून फिरून पदरात नेते. वाट संपली आणि आम्ही पोहोचलो एका विस्तीर्ण पठारावर, इथून समोर तुंग, तिकोना, देवगड, पवना धरण आणि आजूबाजूचा मावळप्रांत दिसत होता. यात उभे केलेले फार्म हाऊस, बंगले, वीकएंड होम्स हे या सुंदर चेहऱ्यावरच्या न लपवता येणाऱ्या डागांसारखे भासत होते.....मानवनिर्मित डाग.


 पठारावरून उभा कातळ दिसत होता पण नक्की वाट कुठे आहे हे काही कळत नव्हते. तिला शोधण्यासाठी आम्ही दोघे विरुद्ध दिशेला थोडी चाचपणी करायची ठरवली. सचिन डावीकडे गेला आणि मी उजवीकडे रस्त्याचं काम अर्धवट सोडलेली बाजू पकडली. मला थोड पुढे वर पाहिल्यावर एका सोलर दिव्याचा खांब दिसला आणि वाटल वाट इथेच कुठेतरी असेल. पण सचिनला डावीकडे कन्फर्म मार्किंग मिळाली, आणि आम्ही ती वाट पकडली. हि वाट म्हणजे खरी अंगावरची चढाई होती अगदी उभी आणि त्यात उन्हान सोनपिवळी झालेलं गवत, निसटलेली माती पूर्ण वाटेवर पेरलेली होती. यांनी ही चढाई अजूनच कठीण करून टाकली होती आमच्यासाठी. साधारण अर्धा तास प्राणपणाने चढल्यावर आम्ही गुफेजवळ येऊन पोहोचलो. गुफेत जखमातेच दगडी शेंदूर फासलेल ठाण आहे. पठारावरून दिसलेला सोलर दिवा हा याच गुहेच्या बाजूला आहे. गुफेच्या डाव्या बाजूला एक लहानशी घळ दिसली आणि आम्ही वर जाण्याची वाट चाचपून पहिली, पण इथून वाट नव्हती पण तिच्या टोकावर भगवा मानान फडकत होता. गुफेत एक आणि डाव्या बाजूला दोन अशी पाण्याची टाकी आहेत. त्यातल्या एका टाक्यातल थंडगार पाणी आम्ही प्यायलो कारण हेच फक्त पिण्यासारखं होत.




गुफेच्या डाव्या बाजूने एक कठीण मोठा दगड पार करून वर थोड्या पायऱ्या चढून मोरगीरीचा शेवटच टोक गाठलं।आम्ही. हि दगडी चढाई खूपच जीववरची होती ती उजवीकडच्या खोल दरीमूळे. वर जाऊन हसू का रडू कळत नव्हत आम्हाला कारण खालून दिसणाऱ्या त्या भगव्यावर 'उपवन' अस लिहल होत.




खाली उतरताना पुन्हा तीच जीवघेणी घसरण पार करून जेव्हा गाडीजवळ आलो तेव्हा घड्याळात ११.३० वाजले होते.


उर आणि पाय भरले होते पण मन नाही. मग काय, निघालो 'तुंगच्या' दिशेने. तुंग, हा पण चढायला उभा. १२ वाजता सुरु करून १.३० ला पुन्हा पायथ्याशी पोहोचलो. गड अगदी देखणा; बुरुज, तटबंदी, सदर, थोडं दगडी बांधकाम हे आपल वैभव आजूनपण ताठ मानेने मिरवणारा.






दोन्ही गडांचा अनुभव पुढच्या माहिनाभराठी साठवून आम्ही पुन्हा मुंबईचा रस्ता तुडवायला सुरवात केली आणि बरोबर ४ वाजता घराच दार उघडल.

ता क: ट्रेकर्सनी मोरगिरीसाठी प्रयत्न करताना आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे. नावख्यांनी तर विशेष लक्ष सुरक्षिततेकडे द्यावे व वाटाड्या घेऊनच प्रयत्न करावा.

Comments

Post a Comment